लांबलेल्या मान्सूनच्या निमित्ताने…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. रामचंद्र साबळे

यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होऊनही त्याचा प्रवास रेंगाळला आहे. जगभरात प्रचंड प्रमाणात केलेल्या जंगलतोडीमुळे आज तापमानवाढीचा राक्षस आपल्यापुढे उभा आहे आणि यामुळे होणाऱया हवामान बदलांनी खूप मोठे आव्हान उभे केले आहे. मान्सूनचा वाढता लहरीपणा ही त्याचीच फलनिष्पत्ती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामानावर आधारित कृषी व्यवस्थापन ही संकल्पना आपण राबवली पाहिजे. स्थानिक पातळीवर हवामानाचा अचूक अंदाज सांगणारी यंत्रणा विकसित केली पाहिजे. सरासरी अंदाज चांगला वर्तवल्यास शेतकरी मृग नक्षत्रावर पेरणी करतो, पण पावसाने ओढ दिल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावते आणि त्याचे अर्थकारण फसते.

मान्सूनचे आगमन आणि मान्सूनची प्रगती अशा प्रकारे साधारणतः मान्सूनचे अवलोकन केले जाते. यंदाच्या वर्षी अंदमानमध्ये मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी झाले आणि पुढे केरळमध्येही मान्सून वेळेपूर्वी आला, परंतु त्या पुढील टप्प्यावर मान्सूनची वाटचाल रेंगाळली. सामान्यतः कर्नाटक, तळकोकण, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राचा भाग यामध्ये मान्सूनची प्रगती होत असते, पण या वर्षी मान्सूनच्या प्रगतीत अडथळे येतील आणि जूनमध्ये मान्सूनचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज आम्ही 1 जून रोजी दिला होता. आमच्या मान्सून मॉडेलनुसार जून महिन्यातील पावसातला खंड सांगता येऊ शकतो. हे मॉडेल लांबपल्ल्याचा स्थानिक ठिकाणचा पावसाचा अंदाज देणारे असून त्याचे पेटंट माझ्याकडे आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, मराठवाडय़ातील जालना, परभणी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, राहुरी, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, पाडेगाव, कराड, कोल्हापूर आणि कोकणातील दापोली अशा 15 स्थानिक ठिकाणच्या जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाचा अंदाज या मॉडेलद्वारे सांगितला जातो. कारण पावसामध्ये प्रचंड विविधता असते. कोकणामध्ये सरासरी 3300 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडतो; तर महाबळेश्वरला सुमारे 5000 मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. तेथून 60 ते 80 किलोमीटर अंतरावर असणाऱया पुण्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 565 मिलिमीटर पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये नऊ हवामान विभाग आहेत.

या विभागांमधील पावसाचे प्रमाणही वेगळे आहे. त्यामुळे सर्वसाधारण अंदाज वर्तवल्यास त्यातून स्थानिक ठिकाणच्या पावसाचे अवलोकन होत नाही, परंतु आपल्याकडे सामान्य लोक सरासरीइतका पाऊस होईल असे म्हटले की आनंदी होतात. वास्तविक, महाराष्ट्रातला धुळय़ाचा काही भाग, नंदुरबारचा काही भाग, नाशिकचा काही भाग आणि संपूर्ण नगर जिल्हा, पुणे जिह्याचा पूर्व भाग, सांगली-सातारा जिह्यांचे पूर्व भाग, लातूर, धाराशीव, बीड आणि संभाजीनगरचा काही भाग हे 12 जिल्हे दुष्काळी जिल्हे म्हणून ओळखले जातात.

1972 मध्ये 85 तालुके दुष्काळी होते, पण 2012, 2015 आणि 2018 च्या दुष्काळामध्ये ही संख्या वाढत गेली आणि आज ती 133 वर पोहोचली आहे. मान्सूनचे प्रमाण आणि त्याचे वितरण याच्याशी महाराष्ट्राचीच नव्हे संपूर्ण देशाची शेती व्यवस्था जोडली गेलेली आहे. आज हवामान बदलांमुळे मान्सूनचा लहरीपणा वाढला आहे. पावसाचे वितरण असमान पद्धतीने होत आहे. पावसातील खंड वाढत चालले आहेत. कमी काळात अधिक पाऊस पडण्याच्या घटना वाढत आहेत. या सर्वांच्या मुळाशी जागतिक तापमानवाढ आहे. हवेतील कार्बनचे वाढते प्रमाण तापमानवाढीचा मुख्य कारक आहे. हा कार्बन शोषून घेणारी यंत्रणा म्हणजे झाडे आणि वनस्पती. दुर्दैवाने, आज आशिया खंडातील 55 दशलक्ष हेक्टर जंगलाचा मानवाकडून ऱहास करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील 65 दशलक्ष हेक्टर जंगल तोडले गेले आहे. अमेरिकेतील 85 दशलक्ष हेक्टर जंगलाची तोड करण्यात आली. जगाचा आढावा घेतल्यास गेल्या काही वर्षांत 400 दशलक्ष हेक्टरवरील जंगल तोडण्यात आले आहे. जी यंत्रणा आपल्या खोडांमध्ये, फांद्यांमध्ये, मुळांमध्ये कार्बनडाय ऑक्साईड साठवत होती तिच्यावरच मानवाने असंख्य प्रहार केले असून आज ती संपुष्टात येतेय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. दरवर्षी 10 दशलक्ष हेक्टर जंगलतोड होत असल्याने कार्बनचे हवेतील प्रमाण वाढत चालले आहे. आज सरासरी 0.36 टक्के एवढे हवेतील प्रमाण असून ते वाढत चालले आहे. कार्बनडाय ऑक्साईड सूर्याकडून येणारी उष्णता भरून ठेवतो. परिणामी हवेचे दाब कमी होताहेत. त्यामुळे तिथे पाऊस होतो आणि जिथे उष्णता कमी मिळाली आहे तेथे पाऊस कमी होतो.

2030 सालापर्यंत पावसाच्या वितरणातील फरकामध्ये आणखी वाढ होत जाणार आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, ढगफुटी, महापूर यांसारख्या संकटांची वारंवारिता वाढत जाणार आहे. 2019 चे उदाहरण पाहिल्यास कोल्हापूर, सांगली, सातारा भागात प्रचंड पाऊस झाला, परंतु तेथून काही किलोमीटर अंतरावर असणाऱया मराठवाडय़ात मात्र दुष्काळ होता. एकाच राज्यातील विसंगत असे हे चित्र मान्सूनचा लहरीपणा वाढल्याचे स्पष्ट करणारे आहे.
या वर्षी आमच्या मॉडेलमध्ये जून महिन्यात पावसात खंड पडेल आणि सरासरीइतका पाऊस पडणे शक्य नाही हे दिसून आले होते. त्यामुळे त्याचा परिणाम पेरण्यांवर, शेतीवर आणि पिण्याच्या पाण्यावर होणार आहे. वर उल्लेख केलेल्या 15 स्थानकांमध्ये मार्च-एप्रिल महिन्यात वाऱयाचा वेग 1 ते 2 किलोमीटर प्रतितास इतका आढळला होता. प्रत्यक्षात तो सात ते आठ किलोमीटर असायला हवा होता. वाऱयाचा वेग कमी असल्यास मान्सूनचा रस्ता तयार होण्यास अडथळे निर्माण होतात. आपल्या भूपृष्ठावर हवेचे दाब अधिक राहिले तर मान्सून पुढे सरकत नाही. त्याला वेळ लागतो. त्यामुळेच जून महिन्यात पाऊस कमी राहील, खंड पडतील असा अंदाज आम्ही वर्तवला होता आणि आज तशीच परिस्थिती दिसून येत आहे. म्हणूनच आम्ही अंदाज वर्तवताना तत्काळ पेरण्या न करण्याचा सल्ला दिला होता. कारण बरेचदा थोडा पाऊस सुरू झाला की शेतकरी पेरण्या करतात, पण नंतर बी मोडवते, थोडेसे उगवते आणि पाणी न मिळाल्याने मरून जाते. दुबार पेरणीमुळे शेतकऱयांना डबल खर्च करावा लागतो. आमच्या अंदाजानुसार 15 जुलैनंतर पावसाचे प्रमाण चांगले राहील. 15 ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहू शकतो. त्यानुसार आपल्या शेतीचे नियोजन शेतकऱयांनी केले पाहिजे. अलीकडील काळात कपाशीचे दर वाढल्यामुळे महाराष्ट्रात कापसाचा पेरा वाढतो आहे, परंतु ते करत असताना भारी जमिनीमध्ये, बागायत शेतीमध्येच कपाशीचे पीक घेतले पाहिजे आणि हलक्या व मुरमाड जमिनीत इतर पिके घेतली पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे दुष्काळी पट्टय़ातील 12 जिह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस पडतो. असे दिसून आले की, 9 ते 10 दिवसांतच हा पाऊस होतो. अशा वेळी रब्बी ज्वारीची लागवड केली पाहिजे.

या सर्व पार्श्वभूमीवर हवामानावर आधारित कृषी व्यवस्थापन ही संकल्पना आपण राबवली पाहिजे. गेली अनेक वर्षे मी सातत्याने याविषयी बोलत आहे. त्यासाठी तज्ञांची फळी आपल्याकडे असली पाहिजे. दुसरीकडे हवामानाच्या अंदाजांची अचूकतही वाढवली पाहिजे. मागील काळात हवामानतज्ञांची एक परिषद संभाजीनगरमध्ये झाली होती. त्या बैठकीला केंद्रीय हवामानशास्त्र्ा विभागाचे डायरेक्टर जनरल रमेश उपस्थित होते. त्यांच्याकडेही मी हा मुद्दा मांडला होता. हवामान विभागाने पाऊस येतोय म्हणून सांगितल्यानंतर शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसतो, पण पाऊस पडला नाही की त्याची निराशा होते. यासाठी स्थानिक ठिकाणचा पावसाचा अंदाज देणारी व्यवस्था विकसित केली गेली पाहिजे आणि त्याच्या अचूकतेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. किती पाऊस होईल आणि कोणत्या भागात पाऊस पडेल हे सांगितले गेले पाहिजे. 1990 च्या दरम्यान मी अमेरिकेमध्ये मिशिगन केन्सास युनिव्हर्सिटीमध्ये प्रशिक्षणासाठी गेलो होतो. त्या काळात तेथील हवामान अंदाजांची पद्धत ही आजच्या आपल्याकडील अंदाज पद्धतीपेक्षा प्रगत होती. कोणत्या भागात किती वाजता पाऊस होणार आहे, हे तेथील हवामान विभागाकडून अचूकपणाने सांगितले जायचे. आपण याबाबत खूप मागे आहोत. यंत्रसामग्री, तंत्रज्ञानात वाढ करून या क्षेत्रात आपण पुढे जाणे आवश्यक आहे. तसेच हवामान बदलांच्या अनुषंगाने वृक्ष लागवडीवर आपला पह्कस असला पाहिजे.

यंदा महाराष्ट्रातील 8 जिह्यांमध्ये जूनच्या पहिल्या आठवडय़ात 100 टक्के कमी पाऊस झाला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर, नांदेड, भंडारा आणि मुंबईमधील काही भागांचा यामध्ये समावेश आहे. 8 जूनपर्यंत रायगड, रत्नागिरी, नाशिक, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशिम आणि बीड अशा 16 जिह्यांमध्ये 90 ते 99 टक्के कमी पाऊस झाला आहे. पुणे, सोलापूर, सातारा, नगर, हिंगोली, यवतमाळ, लातूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा जिह्यांत 80 ते 90 टक्के कमी पाऊस झाला आहे. सांगली आणि धाराशीव जिह्यांत 36 ते 54 टक्के कमी पाऊस झाला आहे. एकूण सर्वच महाराष्ट्रातील सर्वच जिह्यांमध्ये जून महिन्यातील पहिल्या-दुसऱया आठवडय़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. संपूर्ण हिंदुस्थानचा विचार केल्यास महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत 59 टक्के कमी पाऊस झाला आहे.

या सर्व परिस्थितीचा खरीप हंगामावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. पेरणी चांगली होण्यासाठी 65 मिलिमीटरपर्यंत ओलावा जमिनीमध्ये असावा लागतो. म्हणजे दोन ते तीन फूट खोल माती भिजलेली असली पाहिजे, तरच ती पेरणी करण्याला अर्थ आहे. कमी ओलीवर पेरण्या केल्या आणि नंतर पावसाने दडी मारली, उघडीप पडली की दुबार पेरणीचे संकट येते आणि शेतकरी संकटात येतात.

(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ञ आहेत.)
(शब्दांकन ः हेमचंद्र फडके)