साहित्यजगत – श्रेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश कुलकर्णी

आजकाल प्रत्येकाला केलेल्या कामाचं श्रेय हवं असतं. त्यात गैर ते काय? पण कधी कधी न केलेल्या कामाचं श्रेय उपटण्याचे उद्योग अनेक जण करताना आपण पाहतो.
अर्थात दोन्ही प्रकारची माणसं आपण बघतो. जग हे असंच आहे. ते असो.
हे सगळं सांगायचं कारण हल्ली गीतकारांना श्रेय दिलं जात नाही अशी पार येऊ लागली आहे. त्यात तथ्य नाही असं नाही, पण कधी कधी पेच निर्माण होतो. कसा ते पहा…
शांता शेळके आपल्या चित्रपटातील गाण्यांचा संग्रह काढण्याच्या दृष्टीने जमवाजमव करत होत्या. तशी तयारीही झाली, पण एक दिवस राम पटवर्धन यांना त्या म्हणाल्या,
“अ आ आई, म म मका,
मी तुझा मामा, दे मला मुका…
हे गाणं मी घेऊ शकते का?”
तेव्हा पटवर्धन म्हणाले, “म्हणजे काय?” तेव्हा शांताबाई म्हणाल्या, “या गाण्याचा मुखडा मधुसूदन कालेलकरांचा आहे, पण पुढच्या ओळी मी लिहिलेल्या आहेत.”
तेव्हा पटवर्धन म्हणाले, “परंतु चित्रपटात गाण्याचं श्रेय कालेलकरांना आहे ना?”
तेव्हा शांताबाई म्हणाल्या, “हो.” यावर पटवर्धन म्हणाले, “हे गाणं देऊन त्याखाली तुम्हाला टीप द्यावी लागेल की, मुखडा वगळता हे गाणं तुम्ही लिहिलेलं आहे.” शांताबाईंनी हे गाणं संग्रहात घेतलं नाही आणि तेवढय़ापुरता हा विषय संपला.
पण तसं झालं नाही. कालेलकरांचे सहाय्यक दत्ता केशव यांनी आपल्या आत्मकथेत म्हटलं आहे की, मुखडा कालेलकरांचा, त्यानंतरच्या ओळी शांता शेळके यांच्या आहेत. या गाण्यात आणखी एक कडवं घालायचं ठरलं. मात्र त्यावेळी कालेलकर आणि शांता शेळके दोघेही उपलब्ध नव्हते. प्रश्न पडला, आता काय करावं? लगेच
रेकॉर्डिंग करणं गरजेचं होतं. तेव्हा संगीतकार म्हणाले, “दत्ताभाऊ, आता हे काम तुम्हीच करून टाका.” अर्थात वेळ महत्त्वाची होती म्हणून शेवटचं कडवं दत्ता केशवांनी लिहिलं.
गाणं मात्र कालेलकरांच्या नावावर आहे! तेव्हा सिनेमाच्या क्षेत्रात काय घडेल ते सांगता येत नाही.
आता दुसरी हकीगत सांगतो.
राज खोसला यांचा हिंदी चित्रपट चाललेला होता. एक गाणं राजा मेहंदी अली खान यांचं होतं.
तुम बिन जीवन कैसे बीता,
पूछो मेरे दिल से,
पूछो मेरे दिल से…
त्यांनी गाण्याचा मुखडा लिहिला, पण दुर्दैवाने त्यानंतर त्यांचं निधन झालं. मग प्रश्न पडला, आता काय करायचं? अर्थात सिनेसृष्टीत कोणाचंही, कशानेही अडत नसतं.
तिथे मार्ग निघतोच. त्याप्रमाणे एका नवोदित शायरकडे हे काम दिलं गेलं. त्यानेही हे गाणं पटकन पूर्ण केलं. हा चित्रपट होता ‘अनिता’.
कोणत्याही गाण्याचं श्रेय ते गाणं पूर्ण करणाऱयाकडे जाणं साहजिक होतं, पण या शायरने त्याला नकार दिला. एवढंच नव्हे तर त्या गाण्याचं मानधनही घ्यायला नकार दिला. अर्थात हे व्यवहारापलीकडचं होतं. निर्माते राज खोसला आश्चर्यचकित झाले, पण तेव्हापासून खोसला फिल्म्सच्या सगळ्या चित्रपटाची गाणी या शायरकडे आली! हा शायर म्हणजे गीतकार आनंद बक्षी.
तर श्रेयाचं असंही घडतं. म्हणूनच म्हणतात, मिळायचं असेल तर कसंही मिळतं आणि मिळायचं नसेल तर हातात येऊनसुद्धा ओंजळ रिकामीच राहते.
याला ज्याचं त्याचं नशीब असं म्हणावं का?