साहित्यजगत – ग्रंथाली दिनाचा सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश कुलकर्णी

शास्त्रज्ञ रीचर्ड फेनमन, असाच रात्रीच्या गाढ झोपेत होता आणि त्याचा फोनखणाणला.
‘अभिनंदन’
‘कशाबद्दल?’
‘तुम्हाला यंदाचं नोबेल पारितोषिक मिळालं आहे, पुनश्च अभिनंदन!’
तेव्हा शास्त्रज्ञ महाशय म्हणाले, ‘भल्या गृहस्था, तू ही गोष्ट सकाळी सांगू शकला नसतास का? तरी पण थँक्यू!’ असं म्हणून तो परत झोपी गेला.
तर सांगायचा मुद्दा हा की, आपल्याकडेसुद्धा वेळेचं भान नाही. मग भले त्यामागच्या इच्छा, भावना कितीही चांगल्या असल्या तरी झोपलेल्याला मनस्ताप होतोच.
साहित्यातलं वारं पडलं आहे असं म्हणायची आपल्याला सवय झाली आहे, पण बघावं तर इतके कार्यक्रम होत असतात, त्यात पुस्तक प्रकाशनं आली. लेखकांचे सत्कार, मुलाखती, परिसंवाद असं कितीतरी, पण त्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे इथं कुणीही वेळ म्हणून पाळत नाही. कुठलाही कार्यक्रम वेळेत सुरू होत नाही की वेळेत संपत नाही. हे असं का तर म्हणे, प्रेक्षक, श्रोते यांची वाट पाहण्यात आयोजकांचा वेळ जातो…
काही कार्यक्रमांना पर्याय नसतो. उदाहरणार्थ, ग्रंथालीचा वाचक दिन! ग्रंथालीने सांस्कृतिक वातावरण जागतं ठेवण्याचं मोठं काम केलं आहे. अजूनही ते चालूच आहे. माझ्यासारखे अनेक जण कुळाचार असल्यासारखे न चुकता ग्रंथाली दिनास निदान हजेरी तरी लावणारच. त्यानिमित्ताने एरवी कधीही न भेटणारे पण भेटतात. ग्रंथालीतर्फे सातत्याने पुस्तके प्रकाशित होत असतातच, पण वाचक दिनाला बरीच पुस्तपं एकदम प्रकाशित होत असतात हा विशेष. या वेळी सहा पुस्तके प्रकाशित झाली ती अशी –
– ‘तिरकस चौकस’ लेखसंग्रहाचे लेखक आहेत सॅबी परेरा. नावातच स्पष्ट अर्थ असलेले लेख ‘मार्मिक’मध्ये प्रकाशित होत असतानाच वाचकांचे लक्ष वेधून घेत असत. आता ते ग्रंथबद्ध झाल्याने त्याची मजा अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. त्या लेखासोबत चित्र आहेत नीलेश जाधव यांची. गाणाऱयाला जशी वादकांची साथ रंगत आणते, तसं परेरा यांच्या लेखात नीलेश जाधवांची चित्रं रंगत आणतात.
– फक्त ‘ती’च्यासाठी – संघर्ष गर्भपाताच्या हक्कासाठी. लेखिका डॉ. स्मिता दातार. डॉ. निखिल दातार यांनी प्रस्थापित गर्भपात कायद्यातील त्रुटी लक्षात घेऊन त्याविरुद्ध लढा देऊन कायदा बदलला. हा लढा शब्दबद्ध केला आहे डॉक्टरांच्याच पत्नी स्मिता दातार यांनी. डॉ. निखिल म्हणजे जिद्दी आणि हुशार व्यक्तिमत्त्व. त्याबाबत सौ. दातार म्हणतात, ‘एपंदरीत आपण एका वादळाशी लग्न केलंय याची तिला जाणीव झाली. त्या वादळाचे तडाखे तिलाही अधूनमधून बसत होते.’
असा दोन पातळय़ांवरचा संघर्ष इथे वाचायला मिळतो.
– ‘जिणं शोषितांचं’ – लेखिका वृषाली मगदूम. लेखिका म्हणते, ‘कचरावेचक भगिनींच्याबरोबर गेली बावीस वर्षे वाटचाल करताना त्यांचे व्यथित, घायाळ करणारे जीवन जवळून पाहिले, अनुभवले’ अशा वंचित आणि शोषित समाजाच्या या कहाण्या नव्हे, दाहक अनुभव मन विदीर्ण करणारे आहेत.
– ‘ढगाखाली’ – लेखक चांगदेव काळे. ही कथासंग्रहाची अर्पणपत्रिका आहे – ‘शेत, शेतकरी आणि पाऊस हे आहेत रक्ताच्या नात्याने आपले, असं ज्याला ज्या दिवशी वाटेल त्या दिवसाला आणि तसं वाटणाऱया प्रत्येकाला….’ तर ढगाने पाहिलेलं भूमीवरचं आयुष्य लेखकानं प्रत्ययकारी मांडलं आहे.
– ‘जागो, मैं खुदा हूं’ – नाटककार आहेत किरण येले. बेबाक दुनिया का बादशहां अशी ज्याची ख्याती होती तो उर्दूतला लेखक सआदत हसन मंटो यांच्या ‘टोबा टेक सिंह’ व ‘खोल दो’ कथा म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेवर टाकलेला जळजळीत प्रकाश. फाळणीची पार्श्वभूमी या कथांना आहे. अशा दोन गोष्टींचं एक नाटक किरण येले यांनी समर्थपणे उभं केलं आहे.

प्रश्न एवढाच, ते व्यावसायिकरीत्या सादर करायला किती नाटक कंपन्या पुढे येतील?

– ‘शब्दांचा झुला’ या लेखसंग्रहाच्या लेखिका आहेत, मोनिका गजेंद्रगडकर. लेखिकेने मनोगतात म्हटलं आहे, ‘कथा लिहिण्यापासून माझी लेखिका म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर मी कादंबरीही लिहिली. दरम्यान, काही व्यक्तिचित्रात्मक आणि इतरही स्फूट असं लेखन मी करत होतेच. त्यातले काही लेख निवडून त्यांचा संग्रह करावा असं मनात आलं, पण ते लेखन वाचताना, एकत्र करताना लक्षात आले, ते लेखाच्या रूढ व्याख्येत सामावले जाईल असे नाही. ही छोटय़ा अवकाशातली शब्दचित्रं आहेत. माझ्या मनाचे जसे हिंदोळे! झोपाळय़ाचा एक हिंदोळा वर जाताच निमिषभरात खाली येऊन दुसऱया टोकाला जातो. हे निमिषपण माझ्या या शब्दचित्रात आहे. या अर्थाने पाहिलं तर ही क्षणचित्रंही म्हणता येतात.

– ‘नोबेल नगरी 2022’ याचं लेखन केलं आहे, सुधीर थत्ते आणि नंदिनी थत्ते यांनी. नोबेल पुरस्कार विजेत्या शोधांची गोष्टीरूपाने वैज्ञानिक माहिती कथारूपाने देणारा 1996 पासून चाललेला जगातला हा एकमेव उपक्रम आहे.

या पुस्तकात एक परिच्छेद मराठीत आणि त्याच्या खाली त्याचा इंग्रजी तर्जुमा वा अनुवाद आहे. शास्त्र्ााrय परिभाषा मराठीत जाणून घेण्यासाठी, समजण्यासाठी केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.

एरवी एक पुस्तकाचा प्रकाशन समारंभ असला तरी एका लेखकाचे सगेसोयरे समारंभात येतातच असा अनुभव जमेस धरता 7 पुस्तकांच्या प्रकाशनाला निदान त्यांची म्हणून माणसं येतातच. त्यात भर पडते आमच्यासारख्या वाचकांची. त्यामुळे कार्यक्रम भरगच्च दिसतो. सांस्कृतिक वातावरण टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे.