सेलेब्रिटी चॉइस -अनुभवांच्या पल्याड…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रोहन गुजर

 

शाळेत असताना मराठी साहित्य, पुस्तकं हे केवळ अभ्यासापुरतं वाचलं; मात्र नंतर कळू लागलं की, हे वाचायला हवं होतं. यात अगदी सुरूवातीला  वपुंचं ‘पार्टनर’ वाचलं आणि त्यानंतर ठरवून युगंधर, राधेय, मृत्युंजय, शाळा अशी अनेक पुस्तकं वाचली. या वाचनप्रवासात पुढे आवडलेलं पुस्तक म्हणजे अंबरीश मिश्र यांचं ‘शुभ्र काही जीवघेणे’. अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे. पुढे रामायण, महाभारतावर आधारित अनेक पुस्तकं वाचायची आवड लागली. यातलं विश्वास दांडेकर यांचं ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ हे अत्यंत आवडलेलं पुस्तक. या पुस्तकात महाभारतातील प्रत्येक पात्राचं आणि कृष्णाचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. ‘असुरा’ हे रावणाविषयीचं,  दास मारुती नव्हे, वीर हनुमान हे पद्माकर वर्तक यांचं सैद्धांतिक दृष्टिकोन मांडणारं पुस्तक ही आवडती पुस्तकं आहेत.

असं वेगळं वाचन होत असताना गुलजारांची, ईस्मत चुगताई यांची पुस्तकंही एका बाजूला वाचत होतो. गुलजारांच्या लेखनात आपण गुंतून जातो. आपलं असणं बाजूला पडतं ते वाचताना.

तसंच मंटो, ईस्मत चुगताई यांचं काळाच्या पुढचं लेखन विचार करायला भाग पाडतं. सआदत हसन मंटो यांच्या ‘मंटो हाजिर हो’ मधील ठंडा गोश्त, धुआँ, काली सलवार या माझ्या आवडत्या कथा. कथावाचनासाठी माझे कायम आवडते लेखक म्हणजे विद्याधर पुंडलिक. त्यांचं ‘पोपटी चौकट’ हे माझं अत्यंत आवडतं पुस्तक. असेच आवडते लेखक ज्यांचं लेखन वाचताना आपण रमून जावं असे जीए कुलकर्णी. त्यांचं लेखनातून दृश्यात्मकतेचा प्रत्ययकारी अनुभव देण्याचं कसब वाचकाला खिळवून ठेवतं.

वेगवेगळ्या विषयांचं वाचन करताना सद्य परिस्थितीचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करणारी, अवांतर मांडणी असणारी पुस्तकं  वाचायलाही खूप आवडतं. यात गिरीश कुबेरांची तेल नावाचा इतिहास, युद्ध जीवांचे ही पुस्तकं, अग्नीपंख, महात्मा गांधीजींचे सत्याचे प्रयोग, मुरलीधर खैरनारांचे शोध, मणिरत्नम यांचं चरित्रपर पुस्तक ही पुस्तकं माझी आवडती आहेत. नुकतंच वाचलेलं आणि अत्यंत आवडलेलं पुस्तक म्हणजे अरुणा ढेरे यांचं ‘कृष्णकिनारा’. त्यांची इतर पुस्तकं आवडतातच.

माझ्या अभिनयाच्या क्षेत्रासाठी म्हणून मी काही खास वाचन केलं. ज्यात गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, मोहन राकेश यांच्या नाटकांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. ज्यांच्यामुळे माझा नाटक, साहित्य, संहिता समजून घेण्याचा प्रवास अधिक सोपा झाला. कोणतंही पुस्तक आवडीचं होण्याआधी मला वाचायला आवडणारा भाग म्हणजे त्या पुस्तकाची प्रस्तावना आणि लेखकाचे मनोगत.

पुस्तक वाचण्याआधी त्या पुस्तकाचे प्रयोजन, वैचारिक पार्श्वभूमी आणि लेखकाचं म्हणणं, त्याचे प्रयत्न हे सगळं जाणून घेणं मला फार महत्त्वाचं वाटतं. प्रस्तावना वाचल्यानंतर त्या लेखनातला गाभा, ते सौंदर्य अगदी असोशीने आपल्यापर्यंत पोहोचतं असं मला वाटतं.

पुस्तकांचा पैस विस्तारलेला असतो. आपल्या अनुभवांच्या पल्याडचं ते अवकाश फक्त आपलं असतं आणि हे अद्वैत, हे नातं आपल्यासोबत कायम राहतं. पुस्तकांचं हे जग म्हणूनच वेगळं असतं.

शब्दांकन : शुभांगी बागडे