‘आणि’ नव्हे, ‘सर्वस्वी’ काशीनाथ घाणेकर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
>> समीर गायकवाड
डॉ. काशीनाथ घाणेकर अभिनेते म्हणून जितके रहस्यमय होते तितके व्यक्ती म्हणून नव्हते. नाटक संपलं की सिगारेट शिलगावत अत्यंत सहजपणे प्रेक्षकांच्या जवळून जाणारा हा माणूस खऱया अर्थाने हरहुन्नरी, प्रतिभाशाली नट होता आणि एक अवलिया माणूसही होता. त्यामुळेच त्यांच्यावरील सिनेमाचे नाव जरी त्यांच्या कारकीर्दीस अनुसरून ‘…आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर’ असं असलं तरी वास्तव असं होतं की, तो काळच ‘सर्वस्वी डॉक्टर काशीनाथ घाणेकर’ असाच होता.
एक काळ होता जेव्हा मराठी रंगभूमीवरील कोणत्याही नाटकाची जाहिरात करताना त्यातल्या श्रेयनामावलीत प्रमुख अभिनेत्याचे नाव सर्वांआधी असायचे. त्यानंतर दुय्यम भूमिकेतील अभिनेत्याचे आणि तत्सम क्रमाने उर्वरित नावे लिहिलेली असायची. हा एक अलिखित नियम होता. यावरून नाटकात कोण कोण काम करतंय याचा अंदाज येई, पण या परंपरेला छेद दिला डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी. त्यांची प्रमुख भूमिका असलेली नाटकं जेव्हा रंगभूमीवर आली तेव्हा तिच्या जाहिरातीत सर्व अभिनेते-अभिनेत्रींचा उल्लेख भूमिकेनुसार असे. मात्र त्या नामावलीच्या अखेरीस ‘… आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ असं लिहिलेलं असे. असा बोर्ड नाटय़गृहाबाहेर लागलेला दिसला की, तिकीट बारीवर लोकांच्या उडय़ा पडत, झुंबड उडे. बघता बघता तिकिटं संपून जातं आणि ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळके. मराठी रंगभूमीला ‘हाऊसफुल्ल’च्या बोर्डाची ही नशा घाणेकरांनीच मिळवून दिली. कारण त्यांच्यापासूनच याची सुरुवात झाली. याआधी अन्य कुणास ही किमया साधता आली नव्हती.
असं म्हटलं जातं की, जेव्हा नामावलीची घोषणा होत असे तेव्हा स्वतः डॉक्टरच तिथे उपस्थित असत. ‘…आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर’ ही घोषणा होताच नाटय़गृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होई. अनाऊन्समेंटनंतर होणारा टाळ्यांचा हा कडकडाट डॉक्टर आपल्या अंतःकरणात साठवत. त्या कडकडाटाची नशा डोक्यात ठेवूनच ते रंगमंचावर प्रवेश करत. त्यांचा प्रवेश होताच पुन्हा एकदा तसाच टाळ्यांचा गजर होई. हे भाग्य मराठी रंगभूमीवर खूप कमी लोकांच्या वाटय़ास आलेय.
छत्रपती संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतिहासात जे वर्णन आलंय, त्याच्याशी डॉक्टरांचे व्यक्तिमत्त्व तंतोतंत जुळत नसले तरी ते खटकतही नव्हते हेही खरेच आहे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, भेदक नजर आणि भाल्याच्या टोकासारखी अणकुचीदार वाटावी अशी टोकदार संवादफेक याच्या बळावर त्यांनी साकारलेले संभाजीराजे प्रेक्षकांना आपलेसे वाटत. त्यांनी साकारलेला ‘गारंबीचा बापू’ तर एकदम श्री. ना. पेंडसेंनी शब्दबद्ध केलेल्या बापूसारखा वाटे. जणू पुस्तकाच्या पानातून तो रंगमंचावर अवतीर्ण झाला असे वाटे. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मध्ये मा. दत्ताराम शिवाजी करायचे तर डॉक्टर संभाजी साकारत. या दोघांत जबर जुगलबंदी चाले आणि ती अनुभवण्यासाठी नाटय़प्रेमी याची पारायणे करत. डॉक्टर आपल्या घनगंभीर आवाजात अन् धारदार नजरेने असे काही संभाजी साकारत की, नाटक संपलं तरी प्रेक्षकाच्या डोक्यात त्यांच्या भूमिकेची नशा भिनलेली असे.
‘अश्रूंची झाली फुले’मध्ये त्यांनी साकारलेला लाल्या अजूनही रसिक प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान टिकवून आहे. डॉक्टरांनी साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखा नेटक्या आणि नेमक्या होत्या, पण त्यातही लाल्या सर्वाधिक भावणारा होता. या लाल्याला पाहताच प्रेक्षकांचे होश उडत. त्याच्या संवादावर शिट्टय़ा वाजत. मराठी रंगभूमीवर आपल्या संवादफेकीच्या जोरावर शिट्टय़ांचा पाऊस पाडणारे डॉक्टर घाणेकर हे पहिले अभिनेते ! या भूमिका त्यांनी अशा काही साकारल्या होत्या की, त्यानंतर अनेकांनी या भूमिका केल्या, पण प्रेक्षकांनी नाटकातलं पात्र पाहण्याऐवजी त्या भूमिकेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर कुठे डोकावतायत का याचाच शोध जास्त घेतला. त्यामुळे ही नाटके अन्य अभिनेत्यांसाठी जणू आव्हान ठरली. कारण तुलना होऊन डॉक्टरांनी साकारलेल्या भूमिकेचे मापदंड लावले जात. प्रभाकर पणशीकर, वसंत कानेटकर ही त्यांची खास मंडळी. त्यांनी कुणाला कमी लेखले नाही असं म्हणता येणार नाही, पण ते सर्वोच्च स्थानी असताना त्यांनी कुणाला जवळ फिरकू दिले नाही हेही खरे!
आजवरच्या सर्वाधिक लोकप्रियतेचे धनी ठरलेले घाणेकर पेशाने डेंटल सर्जन होते. वैद्यकीय शिक्षण त्यांनी घेतलं खरं, पण त्यांचं मन रुळलं ते रंगमंचावरच. वरळी येथील डेंटल क्लिनिकचा व्याप पाहत ते नाटकात काम करत असत. नाटक हा त्यांच्यासाठी व्यावसायिक बाब नव्हती, तर ती त्यांची आवड होती, ते त्यांचं सब कुछ होतं. रंगभूमी हे त्यांचं प्रथम प्रेम होतं, त्यानंतर ते चित्रपटाकडे वळले. त्यांच्या पहिल्या पत्नी इरावती घाणेकर याही पेशाने डॉक्टरच होत्या. जुन्या पिढीतल्या हिंदी-मराठी चित्रपटांतील ख्यातनाम अभिनेत्री सुलोचनादीदींची कन्या कांचन यांच्याशीही त्यांनी विवाह केला तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. डॉक्टरांच्या निधनानंतर कांचनजींनी लिहिलेल्या ‘नाथ हा माझा’मध्ये डॉक्टरांच्या बहुआयामी पैलूंवर प्रकाश टाकण्यात आलाय. त्यातदेखील डॉक्टरांच्या रंगभूमीवरील अफाट प्रेमाचा उल्लेख आहे. अर्थात डॉक्टरांच्या जीवनात अनेक स्त्रिया डोकावत होत्या हेही त्यात नमूद आहे. तरीदेखील त्यांचे नाटय़प्रेम आणि त्यातून आलेली झिंग हाच खरा जगण्याचा कैफ होता हे त्यात स्पष्ट होते.
डॉक्टरांकडे अभिनयासोबतच अनेक बलस्थाने होती. त्यातही सर्वात जास्त भाव खाऊन जायची त्यांची डायलॉग्जची शैली. काहीशा घाईत आणि किंचित जोशात केलेली संवादफेक काळजाला भिडे. संगीत नाटकांनी जसे नाटय़पदांचे आणि संगीताचे वेड लावले होते तसे घाणेकरांनी संवादांचे वेड लावले होते. त्यांची एन्ट्री होताच जशा टाळ्या पडत तशाच टाळ्या त्यांच्या धारदार संवादांना पडत. बऱयाचदा हे संवाद प्रेक्षकांना पाठ झालेले असत. मग काही प्रसंगी डॉक्टर तो संवाद म्हणण्याआधी खरं तर फेकण्याआधी काही सेकंद पॉझ घेत आणि प्रेक्षकांकडे रोखून बघत. त्यांना अपेक्षित असलेली प्रतिक्रिया प्रेक्षकातून आलेली असे. प्रेक्षकच तो संवाद एकसुरात म्हणत, मग किंचित स्मित उमटवत घाणेकर तो संवाद आपल्या जीवघेण्या शैलीत म्हणत. नाटय़गृहात नुसता शिट्टय़ांचा कल्लोळ होई.  म्हणूनच डॉक्टर स्वतःला जे एकमेव सुपरस्टारचं बिरूद लावत ते इथं खरं वाटे !
डॉक्टर रंगभूमीशी जितके एकरूप झाले तितके सिनेमाच्या माध्यमाशी एकरूप झाले असं म्हणणं धाडसाचे ठरेल. किंबहुना या माध्यमात त्यांचा जीव रमला नाही असं म्हणता येईल. कारण डॉक्टरांना समोर दाद देणाऱया जिवंत प्रेक्षकांच्या तुडुंब जथ्याचे जे व्यसन लागले होते त्याची इथे वानवाच होती. 1953 मध्ये ‘धर्मपत्नी’ या चित्रपटातून ते रुपेरी पडद्यावर आले. त्यानंतर ‘पाठलाग’सारख्या (1960)  चित्रपटांतून त्यांनी खास अंदाजात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. ‘मधुचंद्र’ या चित्रपटात आपल्या कुरळ्या करडय़ा केसांची झुलपं उडवत नायिकेकडे (उमा भेंडे) प्रेमाची नेत्रपल्लवी करणारा प्रेमिकही त्यांनी ज्या सहजतेने साकारला त्याच सहजतेने भालजी पेंढारकरांच्या ‘मराठा तितुका मिळवावा’मध्ये (1964) घोडय़ावर बसून ‘शूर आम्ही सरदार…’ असं चढय़ा आवाजात गाणारा मराठमोळा मावळाही साकारला.
1966 मध्ये त्यांनी अशोक कुमार व बीना रॉय यांच्या प्रमुख भूमिका असणाऱया ‘दादी माँ’द्वारे हिंदी चित्रपटातही शिरकाव केला. यातल्या ‘ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी…’ या प्रसिद्ध गीतात ते उठून दिसतात. ‘अभिलाषा’ (1968) या चित्रपटात ते बेबी नंदासोबत चमकले! पण नाटकांनी जी अफाट लोकप्रियता त्यांना मिळवून दिली होती तशी लोकप्रियता त्यांना 1976 साली आलेल्या ‘हा खेळ सावल्यांचा’ या गूढरम्य मराठी चित्रपटाने मिळवून दिली. तसं पाहिलं तर रूढार्थाने ही त्यांची अखेरची भूमिका. त्यातलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय…’ हे अभिनेत्री आशा काळेबरोबरचं त्यांचं युगुल नृत्यगीत इतकं गाजलं की, त्या वर्षीच्या हिंदी गाण्यांना त्याने टक्कर दिली.
डॉक्टर रंगमंचाशी इतके एकरूप होऊन जात की, काही भूमिका साकारताना त्यांना ताण आला तरी ते पर्वा करीत नसत. अशा वेळी प्रेक्षकांना त्यांची मोठी चिंता लागून राही. काही किस्से असेही सांगितले जातात की, अनेकदा नाटय़गृहात जुन्या पिढीतील अभिनेत्यांनी डॉक्टरांना इतकं भूमिकांत शिरून काम करायचं नसतं असंही बजावलं होतं म्हणे, पण ऐकतील ते डॉक्टर कसले!  1986 मध्ये नाटकाच्या दौऱयावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे अकाली निधन झाले.
डॉक्टरांची एक्झिट चटका लावून गेली हे जितके खरे आहे, किंबहुना तितकेच हेदेखील खरे आहे की, डॉक्टर गेले आणि मराठी रंगभूमीवरील नाटकांनी कात टाकली. एक नवा बहुआयामी आणि काहीसा समाजसापेक्ष रंग तिने मुखवटय़ावर चढवून घेतला.