जावे त्यांच्या ‘देशा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> समीर गायकवाड

नुकताच 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरा केला गेला. यंदाच्या स्थलांतरितांच्या सर्वंकष परिस्थितीवर प्रकाश टाकणारा संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल घटत चाललेल्या माणुसकीवर प्रश्न उपस्थित करतो. हाच प्रश्न मांडणारा हा लेख.

स्मिता पाटील आणि फारुक शेख यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘गमन’ हा चित्रपट 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता. गुलाम हसन हा उत्तर प्रदेशातील बदायूं शहरानजीकच्या एका खेडय़ातला तरुण असतो. गावातलं तेच रोजचं नीरस आणि संथ जीवन याला तो कंटाळलेला असतो. त्याची तरुण पत्नी आणि वृद्ध आई यांच्या आयुष्याला दैन्य, शिथिलता आणि अस्वस्थता यांची एक डार्क शेड आलेली असते ती गुलाम हसनच्या काळजाला डाचत असते. गावात राहून आपलं काहीच भलं होणार नाही याची त्याला पुरती खात्री झालेली असते.

आपणही गावातल्या अन्य उपेक्षित आणि अंधःकारमय जीवन जगणाऱ्या अन्य लोकांप्रमाणे जगत राहू आणि एके दिवशी तसेच मरून जाऊ, आपल्या आयुष्यात या गावात कधीच बदल होणार नाहीत या विचाराने तो पछाडला जातो. आपल्या जगण्या मरण्याची कुणीच दखल घेणार नाही इतके आपण मोठे नसलो तरी आपल्या जीवनात जे लोक आपल्या वाटय़ास आले आहेत त्यांच्या आयुष्यात आनंद भरणे हे आपलं कर्तव्य आहे असं त्याचं मन त्याला निक्षून सांगतं. तो मनाची तयारी करतो आणि एक कठोर निर्णय घेतो.

गुलाम हसन आपल्या काळजावर दगड ठेऊन आपलं गाव सोडून थेट मुंबई गाठतो. मुंबईत राहत असलेल्या त्याचा बालपणीचा मित्र लालूलाल तिवारी याच्या भरवशावर तो हे पाऊल उचलतो. तिवारी हा मुंबईतला टॅक्सी ड्रायव्हर. गुलाम हसन मुंबईत येतो खरा, पण हे शहर त्याला पेलवत नाही. त्याला इथलं होऊन राहता येत नाही, काही केल्या त्याची नाळ जुळत नाही. इथल्या जगात त्याला घुसमटल्यासारखं होतं. आपल्या पत्नी आणि आईस पत्र पाठवून तो कधी खरी तर खोटी ख्याली खुशाली कळवत राहतो.
तिकडे गावाकडे त्याची वाट पाहून त्याच्या पत्नीचा विरहदाह वाढत जातो, त्याच्या प्रतीक्षेने ती खंगू लागते आणि आपल्या एकुलत्या एक मुलाच्या भवितव्याच्या चिंतेने ती वृद्ध असहाय्य आई पुरती ग्रासली जाते. त्याची स्वप्ने असतात की, आपल्याकडे किमान थोडीफार तरी बऱ्यापैकी रक्कम साठली तर गावाकडच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता येतील, इथं एखादी हक्काची खोली घेता येईल, पण त्याची स्वप्ने पुरी होत नाहीत. त्याच्या खिशाचा आणि खर्चाचा मेळ बसत नाही.
तो निराश होतो. तो जेव्हा कधी रेल्वे स्टेशनच्या परिसरात येतो तेव्हा तिथे ये-जा करणाऱ्या रेल्वेगाडय़ा, तिथल्या प्रवाशांची लगबग, त्यांच्या सामानाची चढउतार, तिथला आवाज, त्यांचा कोलाहल आणि प्रवासाच्या ओढीने भारलेले वातावरण यांनी तो मनातल्या मनात कुढत राहतो. त्यालाही गावाकडे जायची तीव्र इच्छा असते, पण केवळ तिकिटाच्या पैशातच मोठी रक्कम खर्ची पडेल म्हणून तो नुसते सुस्कारे सोडत इतरांचा प्रवास पाहून त्यावरच अव्यक्त होत राहतो. दरम्यान मुंबईत राहून तो टॅक्सी चालवायला शिकलेला असतो, त्याला वाहन चालवण्याचा परवानाही मिळतो. आता थोडेफार बरे दिवस आले आहेत असं वाटत असतानाच त्याचा मित्र तिवारी आणि त्याची लिव्ह इनमधली मैत्रीण यांचा अमानुष खून होतो. निवासाची जागा आणि स्त्री संबंध यातून हे खून होतात. गुलाम हसन पुरता कोलमडून जातो. तो परत परत आपल्या स्वप्नांत जगत राहतो. गावाकडं जाण्याची प्रखर इच्छा असूनही पुढं ढकलत राहतो.

खरं तर गुलाम हसन प्रवास पुढं ढकलत नसतो तर वास्तवाला स्वीकारत नसतो. आपली स्वप्ने कधीच पुरी होणार नाहीत या विचारांच्या लाह्यात होरपळून निघण्यापेक्षा आपण ती तशीच रेंगाळत ठेवायची ही त्यामागची नीती असते. चित्रपट संपतो तेव्हा गुलाम हसन नेहमीप्रमाणे रेल्वे स्टेशनवरून प्रवासाची चित्रे मनाच्या पटलावर अधुरी चितारून माघारी फिरतो आणि गावाकडे त्याचे कुटुंबीय अधिकाधिक अगतिक होत राहतात.
मुजफ्फर अलींच्या ‘गमन’ने स्थलांतरितांचा प्रश्न हाताळला होता. चित्रपटाच्या शेवटी ते कोणतेही भाष्य करत नाहीत. सर्व काही प्रेक्षकांवर सोडून देतात. प्रेक्षक मात्र अस्वस्थ होऊन जातो आणि गुलाम हसन आणि त्याच्या कुटुंबाचे पुढे काय होईल याची विवंचना करत बाहेर पडतो. ‘सीने में जलन आंखों में तुफान सा क्यों हैं, इस शहर में हर शक्स परेशान सा क्यों हैं..’ हे मर्मभेदी देखणं गीत याच चित्रपटात होतं.

हे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे नुकताच 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरा केला गेला. यंदाच्या स्थलांतरितांच्या सर्वंकष परिस्थितीवर प्रकाश टाकणारा संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवालही नुकताच प्रकाशित झालाय. अहवाल अंगावर काटे आणणारा आणि घटत चाललेल्या माणुसकीवर प्रश्न उपस्थित करतो. जगभरातली अशांतता, अस्थिरता, युद्धखोरीचा वाढता सोस यावर कटाक्ष टाकतो. मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनांनी हा अहवाल भरला आहे. विविध वर्गीकरणातून अत्यंत दाहकपणे स्थलांतरितांचे चित्र आपल्यासमोर मांडण्यात आलंय. बालके, स्त्रिया, वृद्ध यांना याची सगळ्यात जास्त झळ बसतेय. वाढती बेरोजगारी, घटत्या संधी, नापिकी, अत्याचार, युद्धग्रस्तता, रोगराई, अनारोग्य, वाढती लोकसंख्या, आवाक्याबाहेर जाणाऱ्या घरांच्या किमती, जमिनीची क्षतिग्रस्तता यांनी जगाला भंडावून सोडले आहे. याच्या जोडीला धर्मांधता, जातीयता, प्रांतवाद, राष्ट्रवाद, भाषावाद यांच्या अस्मितांनी जगास पोखरून टाकले आहे. या खेरीज वर्णवाद, वर्गवाद या जुन्या समस्याही आहेत. याचा परिपाक म्हणून माणसं अधिकाधिक चांगल्या व श्रेष्ठ जीवनशैली असलेल्या देशांकडे वळत आहेत.

देश सोडून विदेशात जाणं यालाच स्थलांतर म्हणणं चुकीचं ठरेल. नोकरीच्या आणि उज्ज्वल जीवनमानाच्या संधींच्या शोधात केलेलं देशांतर्गत, प्रांतार्गत केलेलं स्थलांतरदेखील विचारात घेतलं पाहिजे. जिथलं जीवनमान ढासळत जातं, जिथे प्रगती आणि विकासाच्या संधी कमी होत जातात, अनागोंदी वाढत जाऊन व्यवस्थेच्या नावाखाली शोषण सुरू राहतं तिथून लोक स्थलांतरित होत राहतात. मानववंश शास्त्राचा अभ्यास करताना लक्षात येतं की, अश्मयुगापासूनचा प्राथमिक अवस्थेतला माणूस स्थलांतरित होत गेला. आफ्रिकेतून त्याचा प्रवास सुरू झाला आणि जगभरात तो पोहोचला. सुरुवातीला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत घटकांच्या शोधात फिरणारा मनुष्य आताच्या काळात शांतता, स्थैर्य, प्रगती आणि उन्नती या कारणांपायी स्थलांतर करतो आहे.

सीरिया, जॉर्डन, ओमान, इराक, इराण, सोमालिया, सुदान, नायजर, कोंगो या देशांतील लोक इतक्या मोठय़ा संख्येने विस्थापित होताहेत की, उर्वरित जगासाठी एक समस्या बनून गेलीय. या शिवाय कट्टरतावाद्यांचा अंमल असणाऱ्या बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, इजिप्त, अशा अनेक छोटय़ा मोठय़ा देशांतून लोकांचे स्थलांतर सुरूच आहे. आपल्या देशातही त्याचे पडसाद उमटत आहेत. या सर्व घटनांकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहणे नितांत गरजेचे आहे. हे लोक हौस, मौज म्हणून त्यांचं घरदार टाकून आलेले नसतात. वर्चस्ववादाच्या बहुपदरी लढाईत परिस्थितीपुढे हतबल होऊन आपलं सर्वस्व टाकून देऊन केवळ जिवंत राहण्याच्या आशेने आलेले असतात. पण त्यामुळे इतरांच्या जगण्याच्या हक्कावर मानवतावादी भूमिकेतून पाहणे गरजेचे आहे.
लेखाच्या प्रारंभी ‘गमन’चे उदाहरण यासाठीच दिलेलं आहे. आपल्या देशातदेखील जी राज्ये वा प्रांत कमी विकसित आहेत, आर्थिक-सामाजिकदृष्टय़ा मागासलेली आहेत तिथलेच लोक आपली जन्मभूमी सोडून नवी कर्मभूमी निवडतात. यातून भूमिपुत्रांचा हक्क डावलला जातो असाही काहींचा आक्षेप असतो, पण ते ही आपलेच भाऊबंद आहेत त्यांना आपणच सांभाळून घेतलं पाहिजे हा व्यापक कल्याणकारी विचार शीर्ष मानून धोरणे ठरवणं अनिवार्य आहे. या मुद्दय़ांवर राजकारणही केलं जातं आणि लोकभ्रम निर्माण केला जातो, पण हे असेच चालू राहिले तर निम्म्याहून अधिक भागात याचे पडसाद उमटत राहतील. कारण जेव्हा आपण कुणावर तरी आक्षेप घेत असतो तेव्हा आपल्याच इथले काहीजण कुठे न कुठे स्थलांतरित झालेले असतात. संपूर्ण जगानेच जर स्थलांतरितांना नाकारायचे ठरवले तर अनेकांचे जगणं मुश्कील होऊन जाईल. हे जग सर्वांचे आहे, आपण सर्वांना समजून घेतलं पाहिजे, जिथे कठोर होणं निवडीचे आहे तिथे कठोर होत अन्यत्र मवाळ भूमिका स्वीकारत मानवतेचा नवा मार्ग जगाला दाखवला तर आपण आपल्या महापुरुषांचे सच्चे पाईक ठरू. असं जर झालं तर उत्तर प्रदेशातील कुण्या गुलाम हसनला मुंबईत घरोबा वाटेल आणि पुण्या-मुंबईतून अमेरिकेत गेलेल्या चिन्मय तन्मयला तिथे अधिक सेफ वाटेल.

स्थलांतर होऊ नये यासाठी योग्य ती धोरणे आखून त्यानुरूप वाटचाल करून स्थलांतर रोखणे या प्रक्रियेस किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही, पण निदान तोवर तरी माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे ‘आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे || जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ या दिव्यपंक्तींचा जागर करणे हितैषी राहील. काहींना ही सगळी अतिशयोक्ती किंवा अतिकारुण्य वाटेल, पण हे सर्व तेव्हा कळेल जेव्हा आपण या स्थलांतरितांच्या गावी जाऊ. त्यांचं जिणं अनुभवू, तो धुत्कार पाहू आणि ते क्षण जगू!

जावे त्यांच्या ‘देशा’ तेव्हा कळे! ‘गमन’ केल्याशिवाय ‘उंबरठा’ ओलांडता येत नाही आणि स्थलांतर केल्याशिवाय जग कळत नाही!
समीर गायकवाड
[email protected]