
>> संदीप विचारे
तीन-साडेतीन लाखांचं सैन्य घेऊन शाहिस्तेखान स्वराज्य बुडवायला दक्षिणेत आला. पुण्याच्या लालमहालात आराम फर्मावल्यावर त्याने संग्रामदुर्गावर आक्रमण केलं. संग्रामदुर्ग म्हणजे चाकणचा भुईकोट. भुईकोट कसला गढीच म्हणा ना! फिरंगोजी नरसाळय़ांच्या नेतृत्वाखाली मूठभर मराठय़ांनी औरंग्याच्या सैन्याला तब्बल छप्पन दिवस झुंजवले. 15 ऑगस्ट 1660 रोजी बुरुजाखाली सुरुंगाच्या दारूचा मोठा स्फोट घडवून मोगली सैन्य किल्ल्यात शिरलं. फिरंगोजीच्या पराक्रमावर निहायत खूश होऊन शाहिस्तेखानाने त्यांना जिवदान दिलं. दिलेर मरहट्टा फिरंगोजी नरसाळा राजगडावर श्रीशिवछत्रपतींसमोर मुजऱयाला हजर झाला आणि इतिहास लिहिता झाला. ‘संग्रामदुर्गचे युद्ध म्हणजे चिवट मराठय़ांचा तिखट प्रतिकार. पुणे, नाशिक रस्त्यावरील चाकणमध्ये संग्रामदुर्ग ऊर्फ चाकणची गढी आजही आपण पाहू शकतो. बलाढय़ मुघलिया सल्तनीला टक्कर देणाऱया चाकणच्या गढीला अवश्य भेट द्यावी.
दिवाळीच्या वसूबारसेचा मुहूर्त साधत श्रीशिवरायांनी कल्याण काबीज केले आणि कल्याणच्या खाडीत दुर्गाडीच्या साक्षीने मराठा आरमाराची स्थापना केली. पुढे या मराठा आरमाराचा दरारा रूमशाय पर्यंत पोहोचला. उंच, फिरंगी, टोपीकर, सिद्दी यांना वचक बसला. पण मुंबईच्या इंग्रजांच्या कुरापती चालू होत्या. हे इंग्रज व्यापार करण्यासाठी आले नसून इथे राज्य स्थापावे ऐसा त्यांचा मनसुब आहे हे महाराजांनी बरोबर ओळखले. मुंबईच्या इंग्रजांना शह देण्यासाठी थळच्या समुद्रात खांदेरी बेटावर एक जलदुर्ग उभारण्याचा मनसुबा महाराजांनी पक्का केला. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, दौलतखान, मायनाक भंडारी यांनी व्यूहरचना केली आणि ऑगस्ट 1679 ला अवघ्या चारपाच तोफा आणि काही धारकरी, कामकरी घेऊन सुभेदार मायनाक भंडारी खांदेरी बेटावर उतरले. सातासमुद्रावर संचार करणाऱया प्रगत इंग्रजी आरमाराला मायनाक भंडारींनी आव्हान दिले आणि अवघ्या सहा महिन्यांत तह होऊन इंग्रजांनी खांदेरी बेटावरचा आपला हक्क सोडून दिला. खांदेरीवर मराठय़ांचा भगवा फडकला. आलम दुनियेने बघितलं मराठा ‘दर्याभवानीचं’ ऐश्वर्य.
मुंबईजवळील अलिबाग येथील थळच्या दर्यात खांदेरी जलदुर्ग दीपगृह आणि तटा-बुरुजांचे शेला पागोटे सांभाळीत आजही मराठय़ांच्या मर्दुमकीची ग्वाही देत उभा आहे. थळहून बोटीने येथे जाता येते. मराठय़ांचा आरमारी पराक्रम बघून इंग्रज इतिहासकार लिहिते झाले. ‘ऐसे चपळ मराठा आरमार आपल्याकडे हवे होते.’ मराठय़ांच्या आरमाराची साक्ष देणारा ‘खांदेरी जलदुर्ग’ खरोखरच पाहण्यासारखा आहे.
श्रीशिवछत्रपतींचे हिंदवी स्वराज्य बरखास्त करण्याकरिता खासा औरंगजेब दक्षिणेत आला. मराठय़ांच्या दुसऱया छत्रपतींची म्हणजे शंभूराजांची क्रूर हत्या करून औरंगजेबाची छावणी वढू-कोरेगावला पडली. ऑगस्ट 1689 च्या आसपास संताजी घोरपडेंच्या नेतृत्वाखाली मराठी मर्दांचा छापा या छावणीवर पडला आणि औरंगजेब मरता मरता वाचला. या छाप्याने गर्भगळीत झालेला औरंगजेब दूर मंगळवेढय़ाजवळील ब्रह्मपुरी गावात साडेचार वर्षे राहिला. संताजीच्या वधानंतरच ब्रह्मपुरीच्या छावणीतून औरंगजेब बाहेर पडला आणि त्याने त्याचा रोख पुन्हा स्वराज्याकडे केला. येथून जवळच असलेल्या खवासपूर (सांगोला) येथील छावणीत माण नदीचे पाणी घुसले आणि त्या पाण्यात वाहून जाताना औरंगजेब वाचला. पण तो एका पायाने कायमचा अधू झाला. ब्रह्मपुरीच्या छावणीचे वर्णन करताना इतिहासकार लिहितात. ‘चोपन्न पातशाहीचा धनी बलाढय़ मुघल सम्राट मराठय़ांना घाबरून त्याच्या कुटुंबकबिल्यासह साडेचार वर्षे ब्रह्मपुरीत तळ देऊन होता.’ श्री विठूमाऊलीच्या दर्शनास पंढरपुरास जाल तेव्हा मंगळवेढा आणि ब्रह्मपुरी पाहता येऊ शकते. मराठय़ांच्या या सुवर्णपानातील एका पानास उजाळा देण्याकरिता खांदेरी युद्धाचे महत्त्व अधोरेखित करणारे महानाटय़ ‘दर्याभवानी’ गुरुवार 29 ऑगस्ट 2019 रोजी रात्री 8.30 वा. गडकरी रंगायतन येथे सादर होत आहे. त्यासही अवश्य उपस्थित राहा.
ही चाकणची गढी, हा थळचा खांदेरी,
ही वढू-ब्रह्मपुरांची छावणी!
मराठय़ांच्या मर्दुमकीची गातील गाणी!!






























































