लेख – डी.एड.बंदी – परिणाम आणि नवे प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संदीप वाकचौरे

नव्या शैक्षणिक धोरणानुसार बी. एड. अभ्यासक्रम एकात्मिक सुरू होत असल्याने सध्याचा बारावीनंतरचा दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम ( डी. एड. ) बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना सध्याच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे का? हा खरा प्रश्न आहे. तसेच राज्यात ग्रामीण क्षेत्रातील आणि आर्थिकदृष्टय़ा मागास असणाऱया गटातील विद्यार्थिनींमध्ये डी.एड. अभ्यासक्रम निवडण्याचे प्रमाण अधिक आहे, पण येणाऱया काळात या मुलींना चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

केंद्र सरकारने नवीन ‘शैक्षणिक धोरण जाहीर केले. त्या धोरणाने अनेक प्रकारचे मूलभूत बदल सुचविले आहेत. त्यातून देशात नव्याने काही संस्था उभ्या राहणार आहेत. अभ्यासक्रम, शिक्षक भरती, पात्रता, बढती, मूल्यमापन यांसारख्या अनेक गोष्टीत बदल सूचित केले आहेत. खरे तर कोणतेही धोरण येते तेव्हा ते धोरण देश व समाजासमोर असलेली नवीन आव्हाने पेलणारे आणि गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल असते. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत असताना शिक्षण क्षेत्राच्या आमूलाग्र बदलाच्या दृष्टीने विविध स्तरांवर भूमिका घेण्यात आलेल्या आहेत. या धोरणात बऱयाच गोष्टी नव्याने सूचित केल्या आहेत. अनेक भूमिका स्वागतार्ह आहेत. शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणशास्त्र पदविका ( डी. एड. ) अभ्यासक्रम बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या धोरणात बी. एड. अभ्यासक्रम एकात्मिक स्वरूपात असणार असल्याचे सूचित केले आहे. पारंपरिक अभ्यासक्रम पदवी चार वर्षांची असणार आहे. ती घेताना एखादा विद्यार्थी पदवी पूर्ण न करता मध्येच प्रवाहातून बाहेर पडला तर त्याला प्रत्येक टप्प्यावर एक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जेथे विद्यार्थ्याचे शिक्षण थांबेल त्यानुसार प्रमाणपत्र, पदविका प्रमाणपत्र, पदवी मिळणार आहे. त्यामुळे स्वतंत्र अध्यापक विद्यालये बंद होणार असली तरी नव्याने प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्रे प्राप्त होतील. मात्र पदविका प्रमाणपत्र हाती मिळाले तरी त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील का? असा प्रश्न निर्माण होतो.

सध्या प्रचलित असलेला बी. एड. अभ्यासक्रम हा कोणत्याही शाखेची पदवी धारण केल्यानंतरचा दोन वर्षांचा आहे. नव्या धोरणानुसार बारावीनंतर विद्यार्थी एकात्मिक शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील. विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रम बी. ए., बी. कॉम, बी. एस्सी यांसारख्या विविध शाखांना प्रवेश घेऊन पदवी प्राप्त करतात. त्यानंतर काही विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची निवड करतात. मात्र धोरणानुसार एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण क्षेत्रातच अभिरुची असेल, त्याला त्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायचे असेल तर तो विद्यार्थी एकात्मिक बी. एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकणार आहे. त्यामुळे पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच शिक्षणशास्त्राचा परिचय होण्यास मदत होईल. विद्यार्थी आपल्या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमासोबत शिक्षणशास्त्राचे विषय शिकेल असे मानले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी चौथ्या वर्षी पारंपरिक शाखेच्या अभ्यासक्रमाच्या पदवीबरोबर बी.एड. पदवी प्राप्त करेल. विद्यार्थ्याने पारंपरिक अभ्यासक्रमाची पदवी तीन वर्षांत पूर्ण केली तर संबंधित विद्यार्थ्याला दोन वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची संधी असेल. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा पदव्युत्तर पदवी धारण केली असेल तर संबंधित विद्यार्थ्यांना एक वर्षाचा बी. एड. अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. ही पदवी प्राप्त करताना अध्यापनशास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाचा व नवसंशोधनाचा समावेश अभ्यासक्रमात असणार आहे. त्याच वेळी या विद्यार्थ्यांना आंतरवासिता कालावधी असणार आहे. बी. एड. अभ्यासक्रम एकात्मिक सुरू होत असल्याने सध्याचा बारावीनंतरचा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम ( डी. एड. ) बंद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या या अभ्यासक्रमाचे भविष्य फार उज्ज्वल असल्याचे चित्र नाही.

सध्या शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी बारावीनंतर दोन वर्षे कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. राज्यात दशकभरापूर्वी अध्यापक विद्यालयांची संख्या वेगाने उंचावली होती. दरवर्षी साधारणपणे एक लाख विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता राज्यात अस्तित्वात होती. मात्र गेली काही वर्षे राज्यात शिक्षण क्षेत्रातील नोकरीच्या संधी दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. भरती प्रक्रिया अधिक कठीण होत आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांचा पदविका अभ्यासक्रमाकडे असलेला ओढा आटत चालला आहे. राज्यात अनेक पदविका अध्यापक विद्यालयांना कुलूप लावण्यात आले आहे. शासकीय अध्यापक विद्यालये विद्यार्थी उपलब्ध होत नसल्याने पूर्वीच बंद केली आहेत. खासगी संस्थांनादेखील पसंती नाही. विद्यार्थ्यांनीदेखील या अभ्यासक्रमाकडे काणाडोळा केला आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने प्रवेश घेतलेली अध्यापक विद्यालये बोटांवर मोजावी एवढीच आहेत.
देशात प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती देताना डी. एड.बरोबर बी. एड. उमेदवार चालणार असेल तर कोणीही संस्थाचालक डी. एड. पदविकेला प्राधान्य देण्याची शक्यता नाही. नोकरी मिळत नाही म्हणून डी. एड. अभ्यासक्रमास प्रवेश नाही असे चक्र सुरू राहते. त्यामुळे स्वतंत्र डी. एड. अभ्यासक्रम विद्यार्थ्यांअभावी बंद झाले तर नवल वाटायला नको.

शिक्षणक्षेत्रात होणारे परिवर्तन, शिक्षणाशी संबंधित विविध क्षेत्रांत मोठय़ा प्रमाणावर होणारी संशोधने, नवतंत्रज्ञानाचा वाढता उपयोग लक्षात घेता उच्च पदवी धारण केलेल्या शिक्षकांची अपेक्षा चुकीची नाही. जितके अधिक शिकलेले उमेदवार शिक्षणक्षेत्रात येतील तितकी गुणवत्ता उंचावेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या खासगी शाळा व्यवस्थापनदेखील डी. एड. उमेदवारांना प्राधान्य देताना दिसत नाही. अर्थात हे अभ्यासक्रम बंद झाले तरी खरी अडचण पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना सध्याच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे का? जर प्राथमिक स्तरावर बी. एड. पदवीधारक उमेदवारच पात्र ठरणार असतील तर डी. एडच्या उमेदवारांचे बेकारीचे प्रमाण वाढणार आहे.

शिक्षणक्षेत्रात पदविकापात्र उमेदवार नाकारले गेले तर सर्वात मोठा परिणाम ग्रामीण, आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थिनींच्या शिक्षणावर होणार आहे. राज्यात डी. एड. अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱया विद्यार्थिनी या ग्रामीण क्षेत्रातील आहेत. यामध्ये आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या विद्यार्थिनींचे प्रमाण अधिक आहे. केवळ दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीची हमी मिळत असल्याने अनेकदा विद्यार्थिनीचे पालक या अभ्यासक्रमाला पसंती देतात. विद्यार्थिंनीच्या हाती पदविका प्रमाणपत्र दिले की, तिचे जीवन स्थिर होण्यास मदत होईल, ती स्वावलंबी होईल यादृष्टीने पदविका अभ्यासक्रमाकडे पाहिले जात होते. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील शिक्षणक्षेत्रात सुमारे 43 टक्के महिला शिक्षक कार्यरत आहेत. आता नोकरी हवी असेल तर विद्यार्थिंनीना पदवी घ्यावी लागेल. पदवी प्राप्त करण्यासाठी कालावधी वाढणार आहे. त्यातून शिक्षणाचा खर्चही वाढेल. शिक्षणासाठी विद्यार्थिंनीचे वय आणि खर्च वाढल्यास अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱया ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचे प्रमाण कमी होण्याचा धोकाही आहे. विद्यार्थिनींसाठी हा अभ्यासक्रम आणि नोकरी अधिक सुरक्षित मानली जात होती; पण आता पदवी, पदविका, शिक्षक पात्रता परीक्षा,अभियोग्यता आणि पुन्हा पोर्टलव्दारे होणारी भरती हे सारे आव्हानात्मक बनले आहे. सध्या स्वतंत्र अध्यापक विद्यालये बंद होणार असली तरी त्याचा परिणाम विद्यार्थिनींच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे. या सामाजिक परिणामांचा विचारदेखील करावा लागणार आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर बी. एड. पात्रता आहे. येत्या काळात बी. एड. अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची संख्या उंचावेल. मात्र सध्याचा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करताना पहिल्या वर्षात महाविद्यालय सोडल्यास प्रमाणपत्र प्राप्त होईल. दोन वर्षे पूर्ण केल्यास पदविका प्रमाणपत्र, तीन वर्षे पूर्ण केल्यास पदवी आणि चौथे वर्ष पूर्ण केल्यास रिसर्च पोस्ट पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे याप्रमाणे एकात्मिक अभ्यासक्रमातही पदविका प्रमाणपत्र मिळेल का ? येत्या काळात नेमके काय आणि कसे बदल होत आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आहेत.)