Health Tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)

प्रत्येक ऋतूत बदल झाला की, वातावरण बदलत असतं. त्याच बरोबर आपल्या शरीराला ऋतुबदलामुळे अनेक सांसर्गिक रोगांपासून धोका असतो. त्यातून सध्या कोरोनाच्या संकटामुळे सारेच स्वतःला त्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणून हल्ली सर्वांचा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे प्रयत्न आहे.

संतुलित आहार – संतुलित आहार घेतल्याने शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्त्वं मिळतात. त्यामुळे आरोग्य उत्तम राहते. उपयुक्त कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांनी शरीरात ऊर्जा निर्माण होते, त्याच बरोबर प्रथिने ताकद देतात. जीवनसत्त्व आणि खनिजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. आहारात योग्य प्रमाणात धान्य, कडधान्य, दूध व दुधाचे पदार्थ, ताजी फळे आणि भाज्या, प्रमाणात तेल आणि तूप यांचा समावेश गरजेचा. सुका मेव्याचा समावेश रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. खात असल्यास मांसाहारी पदार्थांचा समावेश प्रमाणात करावा.

गुणकारी आणि औषधी पदार्थांचा समावेश – आपल्या स्वयंपाकघरातील अनेक गुणकारी आणि औषधी गुण असलेल्या पदार्थांचा समावेश आहारात केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि शरीर निरोगी राहतं. आलं, लसूण, लवंग, दालचिनी, मेथी, हळद, लिंबाचा रस, पुदिना, तुळस, मध अशा अनेक पदार्थांचा समावेश गरजेचा असतो.

नियमित व्यायाम – व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत होते. नियमित झेपेल तितका आणि बेताचा व्यायाम रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. त्याच बरोबर शरीराची फ्लेक्सिबिलिटी टिकवण्यासाठी योग करावा किंवा सोपे व्यायाम करावेत. व्यायामाचा समावेश लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांसाठी गरजेचा आहे.

वेळेवर आणि पुरेशी झोप – वेळेवर आणि शांत झोपणे हे आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर पुरेशी झोप मिळणेही तितकेच गरजेचे. अनेक जणांना कामानिमित्त किंवा काही मानसिक तणावामुळे पुरेशी झोप मिळत नाही. मग याचा परिणाम आरोग्यावर होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. अपुरी झोप किंवा शांत झोप न लागल्यामुळे मानसिक तणाव अजून वाढतो

आणि हे आरोग्याला घातक ठरतं.
मानसिक स्वास्थ्य – सध्याचा घाईगडबडीच्या व अनिश्चित काळात अनेकांचा मानसिक तणाव वाढला आहे. याचा थेट परिणाम आरोग्यावर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. त्यामुळे मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्राणायाम, योगासारखे उपाय केले पाहिजेत. त्याच बरोबर कोणतेही आवडते छंद जोपासावे. याने नक्कीच मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. या सर्व टिप्स आपल्या जीवनात आत्मसात कराव्यात. त्याच बरोबर धूम्रपान, मद्यपानासारख्या घातक सवयी सोडून द्याव्यात.