स्मृतिगंध – काव्यशास्त्रविनोदाचा ठेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शशिकांत सावंत

नंदा खरे यांनी लिहिलेली पुस्तकं म्हणजे मराठी साहित्याला मिळालेली मोठी देणगीच. पुढील अनेक वर्षे ती मराठी वाचकांच्या मनावर राज्य करतील. ‘काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम’ असं म्हणतात. नंदा खरे यांच्या निधनानंतर त्यांच्या साहित्याचा, काव्यशास्त्रविनोदाचा ठेवा जोपासला गेला पाहिजे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

नंदा खरे यांचा पहिला परिचय झाला तो त्यांच्या घरीच नागपूरला. मी आणि हेमंत कर्णिक अभय बंग यांच्याकडे गेलो होतो अर्थातच व्हाया नंदा खरे यांच्या घरी. एक दिवस तिथेच राहिलो. त्यांचा बंगला होता मला वाटतं, पण मुळात ते स्वतः व्यावसायिक अभियंता असल्यामुळे घर सुंदर बांधलं होतं. आश्चर्य म्हणजे, त्यात एक खोली मोकळी ठेवली होती. यात आमच्यासारखे पाहुणे राहत. दाराच्या शेजारी पुस्तकांची चळत ठेवली होती. आत गेल्या गेल्या नंदा खरे म्हणाले, ज्यांना ही पुस्तकं घेऊन जायची ते घेऊन जाऊ शकतात. मी त्यातली एक-दोन पुस्तकं उचलली.

नंदा खरे यांच्या पत्नीला वाचायची खूप आवड आहे हे दिसत होतं. मी ऍलेस मन्रोचं पुस्तक त्यांच्यासाठी नेलं होतं. त्यानंतर त्यांनी बरीच ऍलेस मन्रोची पुस्तकं मागवली आणि वाचली. खरे बारीकसे, उंच-सावळे होते. नाकावर चष्मा होता. सिगरेट ते अत्यंत आनंदाने पित. प्रत्येक झुरक्यागणिक तो आनंद त्यांच्या चेहऱयावर दिसत असे. अत्यंत मिश्कील स्वभाव, प्रचंड वाचन, विलक्षण सामाजिक जाणीव. आजचा सुधारकसारखा अंक ते काढत.

नंदा खरे यांनी अनेक वर्षे ’खरे आणि तारकुंडे’ कंपनीद्वारे पुलांची बांधणी केली. नागपूरजवळचे सगळे पूल त्यांनीच बांधलेले आहेत. ते आम्हाला म्हणाले, सरकारी पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला लाच द्यावीच लागते. मी थैल्या भरून लाच दिलेली आहे. ’विटेवर वीट’ हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक. त्यात त्यांनी हे मोकळेपणाने लिहिलं आहे. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते कंपनीतून निवृत्त झाले होते. त्यानंतर ते वाचन-लेखन भरपूर करत, भरपूर फिरत, त्यांच्या कंपनीत आम्ही गेलो. त्यांच्यासाठी ‘टाइम’ साप्ताहिक घेतलं जायचं. तो त्यांनी घेतला आणि परत आम्ही त्यांच्या घरी गेलो. नंतर अभय बंग यांच्याकडे गेलो. बंग यांच्या इथल्या बांधकामात नंदा खरे यांची अर्थातच मदत होत होती.

‘कथा मानवप्राण्यांची’ असे सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ‘अंताजीची बखर’ लिहिलं होतं. या भेटीनंतर ‘उद्या’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि ते भरपूर गाजलं. या पहिल्या भेटीनंतर ते कधी कधी मुंबईला यायचे तेव्हा आम्ही गप्पा मारायचो. एकदा ते आणि मेघना भुस्कुटे माझ्या ऑफिसमध्ये आले. त्यानंतर मी आणि ते केतकरांकडे गेलो. केतकर आणि माझा ‘न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकाविषयी संवाद चालू होता. हे साप्ताहिक आपल्याला माहीत नाही याचं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तेव्हा मी पुढच्या नागपूरच्या भेटीत ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकाचे अंक घेऊन गेलो. ‘टाइम’ साप्ताहिकासाठी मला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या पॅकेजवर स्टोरी करायची होती. अर्थातच ‘टाइम’ माझी राहण्याची सोय पंचतारांकित हॉटेलमध्ये करणार होतं. तिथला मायकल शुमन हा पत्रकार मला म्हणाला, ‘‘तू पाहिजे तर आमच्या सोबत सूटमध्ये राहू शकतोस किंवा तुझ्या रूममध्ये रहा’’, पण नंदा खरे मला म्हणाले की, ‘‘तू माझ्या घरी रहा आणि माझ्याच गाडीने फिर.’’ नंदा खरे यांचा सहवास लाभणं, त्यांच्याशी चर्चा करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती.
त्यातील दोन दिवसांत नागपूर येथे विविध ठिकाणी ते मला घेऊन गेले. अर्थतज्ञ खांदेवाले यांची मुलाखत ‘टाइम’साठी मला करायची होती तेव्हा त्यांच्या घरी नंदा खरे मला घेऊन गेले. इतर अनेक ठिकाणी ते आमचे सारथ्य करत होते. मायकेल शुमनला आणि फोटोग्राफरला त्यांच्यासोबत गप्पा मारताना छान वाटलं. नंतर याचे मला डॉलर्समध्ये भरपूर पैसे मिळाले. हे पैसे कुठे खर्च करता येतील याबद्दल मी नंदा यांचाच सल्ला घेतला. जो माझ्या पथ्यावर पडणाराच ठरला.

त्यानंतर आम्ही भेटलो ते सतीश तांबे यांनी आयोजित केलेल्या अलिबाग येथल्या ‘गुड फ्रायडे’ ग्रुपमध्ये. दर गुड फ्रायडे ते रविवार असा तीन दिवस हा गट वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचो. नंदा खरे हे मांडणी करताना खूप भावाकुल होऊन बोलले की, ‘‘किती अन्याय होतोय नागपूरवर आणि एकूणच समाजात!’’ बोलता बोलता त्यांचे डोळे भरून आले आणि कंठ दाटून आला. ते जितके संवेदनशील होते तितकेच मिश्कीलही.

ते सतत वाचत बसायचे. जेव्हा आम्ही पंतप्रधानांच्या पॅकेजवर स्टोरी करत होतो तेव्हा त्यांनी कितीतरी इनपुट दिले. उदाहरणार्थ अनेक देशांत शेतकरी आत्महत्या करत नाहीत, पण त्यांना भरपूर सबसिडी द्यावी लागते हे त्यांनी सांगितलं. आजचा सुधारकचे अंक म्हणजेच डार्विनवर काढलेला अंक असेल किंवा इतरही अंक संग्राहय़ होते. मी गॅलपोगस बेटावर काम करणाऱया शास्त्रज्ञ जोडगोळीचं पुस्तक नेलं होतं. डार्विनने तिथून फिंच नावाचे सात-आठ पक्षी आणले होते. त्या सगळ्या पक्ष्यांची मोजदाद तिथे राहून करायची हे काम एका जोडप्याने स्वीकारले. तेव्हा नंदा खरे म्हणाले, ‘‘या विषयावर मला ‘आजचा सुधारक’साठी लेख लिहून दे’’, पण ते काम माझ्याकडून झालेच नाही.

आम्ही सतत पुस्तकांवर गप्पा मारत असू. वुडहाऊसच्या कथा त्यांनाही आवडत आणि मलाही. ते त्या छान नक्कल करून दाखवत. वुडहाऊसच्या एका कथेत एक माणूस लपतो आणि डुक्कर ओरडतो. तेव्हा तो जर्मनमध्ये काहीतरी म्हणाला, हे त्यांनी साभिनय करून दाखवलं. त्यावर आम्ही खूप हसलो. ते म्हणाले, माझा एक पुण्याचा एका मित्र वुडहाऊसचा अगदी वेडा आहे. मी म्हणालो, ‘‘तोच का ज्याने ‘अंतर्नाद’मध्ये भलामोठा सोळा पानांचा लेख लिहिला होता.’’ ते म्हणाले, ‘‘हो, तोच!’’ तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली, ‘‘तुमच्या तोंडून सतत नावं, आठवणी ऐकायला खूप छान वाटतं.’’

‘काव्यशास्त्र्ाविनोदेन कालो गच्छति धीमताम’ असं म्हणतात. मलाच नाही, माझ्यासारख्या अनेकांना नंदा खरे यांचा काव्यशास्त्र्ाविनोदाचा ठेवा मिळाला. त्यांच्या निधनानंतर तो ठेवा जपणं एवढंच आपल्या हाती आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तकं साहजिकच मराठी साहित्याला मोठी देणगी आहे. पुढील अनेक वर्षे ती मराठी माणसांच्या मनावर राज्य करतील यात शंकाच नाही.

– [email protected]