लोकसंस्कृती – शीतलादेवी

>> सोनाली शहा

शीतला देवतेची योजना मानवाला झालेल्या देवी, उष्णतेने निर्माण झालेले पह्ड, गोवर, कांजिण्या अशा सांसर्गिक रोगांवर उपाय म्हणून केलेली दिसते. यात तापाचे प्रमाण भरपूर चढते व ताप उतरवण्यासाठी थंड पाण्याच्या पट्टय़ांचा वापर करतात तेव्हा या तापाच्या उग्र स्वरूपाला शीतल करण्यासाठी ज्या देवतेची पूजा केली त्या देवतेचे शीतला, सितळा, शितळा असे नामकरण झाले असणे असंभवनीय नाही.

जोपर्यंत रोगांची भौतिक कारणमीमांसा मानवाला माहीत नव्हती, तोपर्यंत हे रोग अतिमानवी योनीतील शक्तीच्या कोपामुळे उद्भवतात अशी त्याची धारणा होती. एखादा रोग समाजात येतो, बळावतो, तो उग्ररूपी स्त्र्ााrदेवता वा पुरुषदेवतेच्या अवपृपेमुळे या धारणेद्वारे उत्पन्न झालेल्या भयाचे निराकरण करण्यासाठी रोगदेवतांची निर्मिती केली गेली. सर्वसामान्य मानव अनेक क्षुद्र, गौण देवतांना रोगनिवारक मानून त्याची आराधना करू लागला. देवतेला पशुबळी देणे, उपासना, स्तोत्रे, मंत्रोपचार, विशिष्ठ देवतेचे महत्त्व सांगणाऱया कथा, म्हणजेच प्रस्तुत देवता श्रेष्ठत्ववाद, व्रतवैकल्ये अशी त्याची व्याप्ती वाढत गेलेली दिसते. खरेतर हा मानवी मनाचे समाधान करण्याचा एक उपाय होता. ज्यायोगे या मानवनिर्मित देवता पुढे मानवी मनाच्या आधारस्तंभ बनल्या. यातूनच पुढे आलेली आणि हिंदुस्थानात बहुतेक भागात दिसणारी लोकदेवता, काम्यदेवता म्हणजे शीतलादेवी होय.

शिवापासून उत्पत्ती झालेला ज्वरासुर मानवाला बाधतो, त्याचे तापमान वाढवतो, अंगावर फोड, पू तयार करतो. सर्वत्र दुर्गंधी पसरते. रक्ताचे विकार सुरू होतात. या संकटातून मुक्त होण्यासाठी शिवाकडे याचना केली असता, स्वतःपासून उत्पन्न केलेल्या ज्वरासुराचा नाश करण्यासाठी तो असमर्थता दर्शवितो. अशावेळी ज्वरासुराच्या उष्णप्रकृतीवर उतारा म्हणून देवी पार्वती शीतल रूप घेते व मानवाला संकटमुक्त करते.

साहित्याच्या अनुषंगाने विचार करता, उत्तरकालीन स्पंदपुराणातील प्रभासखंडात (इ.स.8 वे ते 12 वे शतक) शीतलातीर्थ व अवंतीखंडातील मर्पटेश्वर स्थान हा उल्लेख या देवतेचे स्थान म्हणून येतो. बंगालमध्ये शीतलामंगल खंडकाव्य (इ.स. 15 वे शतक) रचले गेले. हिंदुस्थानभर विविध भाषांमध्ये शीतलेची गाणी तयार झाली.

शब्दकल्पदृमातील पुढील श्लोकावरून शीतलेच्या ध्यानाची कल्पना येते.
नमामि शीतलां देवीं रासभस्थां दिगम्बरीम्।
मार्जनीकलशोपेतां शूर्पालङ्पृतमस्तकाम् ।।

अर्थात गर्दभारुढ, केरसुणी, सूप, पाण्याचा कलश धारण केलेल्या शीतलादेवीला माझा नमस्कार असो. अवपृपा झाल्याने देवी उग्ररूप धारण करते व रोग, रोगजंतू केरसुणीनेच पसरविते. शांत झाल्यावर, रक्षकदेवतेचे कार्य हाती घेतल्यावर तेच रोगजंतू केरसुणीने सुपात भरून, रोग नष्ट करते, असे केरसुणीचे प्रयोजन असावे का? असा एक विचार. थंड पाणी, जल, आप या अनुषंगाने देवीने जलकलश धारण केला आहे. तसेच या देवीला शीतल पदार्थ, शिळे पदार्थ आवडतात. चैत्र, आषाढ, श्रावणातील सप्तमीला केलेले पदार्थ, नैवेद्य म्हणून दुसऱया दिवशी अष्टमीला देवीला दाखवतात व भक्त स्वतःही तेच खातात. या सप्तमीला शिळा सप्तमी म्हणतात. इथे आपल्याला देवीच्या नैमित्तिक पूजेचे स्वरूप दिसते

हिंदुस्थानात शीतलादेवीची ठाणी महाराष्ट्र, गुजरात्, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, बंगाल व दक्षिण हिंदुस्थानात अशा अनेक भागांत आहेत. दक्षिण प्रांतात या रोगावर नियंत्रण म्हणून मारी, मरिअम्मन, मारिअम्मा अशी देवतानिर्मिती केली गेली. बंगालमध्ये तर या देवतेचे कोणतेच स्वरूप न मांडता एक लहानसा चौक शेणामातीने सारवतात. त्यावर अग्नी प्रज्वलित करून त्यात तुपाचे हवन करतात व या सर्व स्वरूपालाच शीतला देवीचे स्वरूप मानतात. वसंत ऋतूची म्हातारी देवता बसत बुराही, वसंतकाळाची क्रूरदेवता बसतचडी म्हणजे वसंत ऋतू मध्ये उत्पन्न होणाऱया रोगांची कारक देवता.

आजही अनेक मंडळींच्या कुलाचारात शीतलापूजन केले जाते. आधी उल्लेखलेल्या शब्दकल्पदृमातील दिगंबर, नग्न कल्पिलेली शीतला, अभिजनांनी स्वीकार केल्यानंतर तिला वस्त्र्ाs चढविण्यात आली असावीत असा कयास. पुण्यातील शितळादेवी चौकातील मंदिरात असलेल्या देवीचे शिल्प (इ.स. 1932) हे साडी नेसविलेले आहे.
हिंदूंमधील शीतलादेवीला समांतर अशी देवी, बौद्ध वज्रयान पंथात पर्णशबरी या नावाची दिसते. कार्य तेच. विषबाधा दूर करणे आणि उष्णतासंबंधीत रोगांवर उपाय करणे. तर जैन तीर्थंकर शीतलनाथ गर्भात असताना मातेने ज्वरपीडित पतीच्या अंगाला करस्पर्श केला व त्यामुळे त्यांचा ज्वर उतरला अशी शीतलनाथ नावाची व्युत्पत्ती जैन पुराणांमध्ये येते.
सामान्य माणसाच्या मनात शतकानुशतके रुजलेल्या संकल्पनांमध्ये फारशी ढवळाढवळ न करता पुराणांनी वैदिक देवतांना आकार दिले. त्याला पूरक व पटतील अशी मिथके तयार केली. त्याद्वारे देवतेची भक्ती रुजवली. जीवनातील विवंचनेवर मात करून दुर्दम्य आशावाद व निस्सीम श्रद्धा यातून कथा व प्रतिमा घडत गेल्या. या प्रतिमांचे स्वरूप कधी भयकारक, कधी प्रेमळ, कधी आश्वस्त करणारे होते. याच प्रतिमांद्वारे भक्ताच्या श्रद्धेचा भयापासून सुरू झालेला प्रवास भक्ती पर्यंत जाऊन पोचलेला दिसतो.
(संदर्भः देवीकोश, भारतीय संस्कृती कोश)

आपली प्रतिक्रिया द्या