
>> शिरीष कणेकर
नाना पाटेकर ‘मोठा’ कसा? माझा मित्र जर मोठा तर मी इतका छोटा कसा राहिलो?… नानालाच विचारायला हवं! तो ख्यॅक ख्यॅक करून हसेल किंवा चार शेलक्या शिव्या हासडेल. मध्यंतरी माझा एक लेख वाचून त्यानं मला फोन केला व विचारलं, ‘‘तू वात्रट आहेस की हलकट रे?’’
‘‘हलकट?’’ मी फोनमधून किंचाळलो, ‘‘नाना, तू हलकट म्हणावंस म्हणजे माझा बहुमानच आहे.’’
नाना ख्यॅकd ख्यॅक करून हसला. हे असं हसणं तो कुठे शिकला कोण जाणे. त्यानंच ‘डेव्हलप’ केलं असावं. हिंदी सिनेमावाल्यांना मात्र नानाचं हसणं व एकूणच ‘नानागिरी’ पसंतीस उतरल्येय. त्याचा अभिनयाचा वेगळा बाजही सिनेमावाल्यांना व प्रेक्षकांना सारखाच आवडलाय. नानाचा अविर्भाव असा असतो की, आवडलाय म्हणजे, त्यांच्या बापाला आवडेल. नानाची गुर्मी (लांबून) बघण्यासारखी आहे. नानाचं नाव हे त्याचं टोपणनाव किंवा संबोधण्याचं नाव नाही. तेच त्याचं नाव आहे. सगळंच विचित्र.
एकदा मी त्याच्या घरी चकाटय़ा पिटत बसलेलो असताना बोलता बोलता त्यानं अमिताभ बच्चनला फोन लावला. मी उगीचच खुर्चीत सावरून बसलो. फोन जयानं घेतला.
‘‘जरा नवऱयाला फोन दे.’’ नाना शुद्ध मराठीत सहजगत्या बोलला. अमिताभ फोनवर यायच्या आत मी नानाकडून बाहेर पडलो. जे ऐकायला लागेल ते पचेल की नाही याबद्दल मी साशंक होतो. ‘जयाच्या नवऱया’ला तो असा फोन करू शकतो तर बाकी आम्हा गण्यागंप्यांची काय कथा!
एकदा त्याचा फोन आला. म्हणाला, ‘‘पोरगा काय करतो रे?’’
‘‘अरे, तो यंदा डॉक्टर झाला.’’ मी उत्साहानं म्हणालो.
‘‘तुला खूप हे झालं असेल ना?’’
‘‘काय, आनंद?’’ मी त्याच उत्साहात विचारलं.
‘‘नाही, आश्चर्य. बुवा आपला मुलगा एवढा हुशार कसा? ख्यॅ ख्यॅ ख्यॅक…’’
आता तुम्हीच ठरवा, कोण वात्रट आणि कोण हलकट.
बोलण्याच्या बाबतीत त्याची आई त्याचा बाप होती. नाना तिला फार मानायचा. मध्यंतरी तिचं निधन झालं. नाना मला म्हणाला, ‘‘अडुसष्ट वर्षे तिच्या समवेत काढली रे. आता ती नाही तर घरी जाववत नाही.’’ त्यामुळेच असेल कदाचित तो रिकामा वेळ पुण्याजवळ सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या त्याच्या फार्म हाऊसवर काढतो. त्या वातावरणात, शेतात तो रमतो. चित्रपटांपेक्षा इथे तो जास्त रमतो असा मला दाट संशय आहे.
नाना हिंदी चित्रपटसृष्टीच्या उंबरठय़ावर उभा होता तेव्हाची गोष्ट. एका निर्मात्याला त्यानं (त्या वेळच्या मानानं) अव्वाच्या सव्वा पैसे मागितले. निर्माता उडाला. नवीन माणूस इतके मागतो? तो ‘‘नाही’’ म्हणून जायला निघाला तेव्हा नाना त्याला म्हणाला, ‘‘उद्या पुन्हा आलात तर डबल पैसे, परवा आलात तर तिबल पैसे याच प्रमाणात वाढत जाणार.’’
नानानं हा किस्सा मला सांगितला तेव्हा मी हबकलो व नानासाठी धास्तावलो. ‘‘नाना,’’ मी भयभीत होऊन म्हणालो, ‘‘अरे, तो पुन्हा आलाच नाही तर?’’
‘‘झकत येईल. जातो कुठं?’’ नाना आत्मविश्वासानं म्हणाला. मी बघतच राहिलो.
खरोखरच तो निर्माता परत आला. जातो कुठं? ख्यॅ ख्यॅ ख्यॅ…
नाना पाटेकर आज मोठा स्टार असला तरी त्याच्या वागण्यात, बोलण्यात व राहण्यात काडीचाही फरक नाही. आजही तो पायजमा घालून फिरतो. त्याचा फ्लॅट श्रीमंतांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱया लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये असला तरी तो अगदी मध्यमवर्गीयाला साजेसा आहे. त्यात चकाचक काही नाही. नानानं त्याची जुनाट ‘लँब्रेटा’ स्कूटर अजून ठेवली असेल तरी मला आश्चर्य वाटणार नाही. स्कूटर हाकत तो शूटिंगला जाऊ शकतो. युनिटवालेही आदबीनं म्हणतील, – ‘‘नानाजी की स्कूटर दिखायी नहीं दे रही!’’
जुन्या मित्रांशीही तो संपर्क ठेवून आहे. आजवर छप्पन्न (‘अब तक छप्पन्न!’) पाहिले ही मस्ती त्याच्यात नावालाही नाही. तरीही ‘डेंजरस नाना’ असा त्याचा लौकिक का आहे कळत नाही. लवकरच तो मला त्याच्या ‘फार्म हाऊस’वर घेऊन जाणार आहे. (माझी पण सुकी लाकडं त्यानं रचून ठेवलीत का?) मी त्याच्या तोंडावर त्याला गळ घालणार आहे, ‘‘ए नाना, एकदा ते ख्यॅ ख्यॅ ख्यॅ हसून दाखव ना…’’