दारूला नाही म्हणतोस!

>> शिरीष कणेकर

मी पेपर वाचतो. तुम्ही?

जाऊ दे. स्टार्टलाच ‘तू तू मैं मैं’ नको. सुरुवातीलाच मुद्दय़ावर येतो. गुद्दय़ावर काय, केव्हाही येऊ शकतो. त्यासाठी लोकसभेत किंवा विधानसभेत जायची गरज नाही. असो.

तर मी पेपरात वाचलं (अशी कात्रणे आवर्जून मला पाठवणाऱ्या वाचकांचे धन्यवाद!) की, सोलापूर जिल्ह्यातील घटना. मलकारी याने आपला मित्र धर्मा यास मदिरा प्राशन करण्याचे निमंत्रण दिले. थोडक्यात, ‘‘भावा, ये दारू ढोसायला’’ असे आवताण दिले. बहुतेक नर जातीसाठी याहून गोड (खरं म्हणजे कडू) निमंत्रण असूच शकत नाही. मैत्रीचा तो परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू दारूच्या माळा. सनी लिऑननं रेशनिंगच्या ऑफिसात जाण्यासाठी सोबत म्हणून बोलावलं (सनीचं निमंत्रण मी याहून सौम्य करू शकत नाही. क्षमस्व!) तरी मलकारीच्या ‘‘बसू या’’ निमंत्रणापुढे काहीच नाही. (वारुणी व तरुणी यांच्यात तरुणी सरस ठरेलही, पण तिच्या सवे रेशनिंगच्या ऑफिसात जाण्यासाठी नव्हे), पण धर्मा प्यायला गेला नाही.

मग धर्मा गोरख धोत्रेने हे वाहतं निमंत्रण का नाकारलं असेल? ‘‘तो दारू पीतच नसेल’’ असे अप्रतिम समर्थन एखादी वाचिका करेल (कोलंबीची खिचडी खाण्यासाठी माझा मित्र घरून जेवून आला यावर एका वाचिकेनं मला कळवलं होतं – ‘तो शाकाहारी असेल.’ भयचकित नमावे तुज रमणी!). वास्तविक धर्माने असेल त्या अवस्थेत नेसत्या वस्त्रानिशी धावत जायला हवं होतं. दारूला नको म्हणायला धर्माचं काय डोकं फिरलं होतं? तो काय ‘‘कडबा खायला ये’’ म्हटल्यावर जाणार होता?

दारू ही समाजातील सर्व घटकांना एकत्र व एका पातळीवर आणणारी मूलगामी चळवळ आहे. तिचा मूळ जनक माहीत नसला तरी तो कोणी आद्य बेवडा असला पाहिजे. त्याला कोणी धर्मा न भेटल्यानं त्याची चळवळ अखंडित राहिली. ‘‘पिओ और पीने दो’’ ही सामंजस्याची मृदू भावना फक्त पिवय्यांच्यात आढळते.

माझा मित्र (कै.) डॉ. जीवन मोहाडीकर कॉलेजच्या हॉस्टेलला असताना तिथल्या काही मुलांनी बिअर पार्टी केली. त्यांनी जीवनला बोलावलं नाही. पिणाऱ्यांत आणखी एक वाटेकरी नको म्हणून. जीवनचं डोकं गेलं. त्यानं बिअर मागवून आंघोळीचा अख्खा टब भरला व तमाम होस्टेलला प्यायला बोलावलं. जीवनला वगळणारे किती खजील झाले असतील कल्पना करा. दारू आणि दिलदारपणाची सांगड घालणारे जीवनसारखे विरळा (प्रेस क्लबमध्ये कसली तरी दुर्गंधी येतेय म्हणून जागोजाग सुगंधी उदबत्त्यांचे जुडगे लावणारा एकटा आमचा जीवन्याच).

एका गुत्त्यात दोघं समोरासमोर बसले होते. त्यांना आधीच बऱ्यापैकी चढली होती. एकानं दुसऱ्याला विचारलं, ‘‘तुम्ही कुठं राहता?’’

‘‘गिरगावात’’ दुसरा उत्तरला.

‘‘अरे मी पण गिरगावातच राहतो. गिरगावात कुठे?’’

‘‘मुगभाटात.’’

‘‘कमाल आहे. मी पण मुगभाटातच राहतो.’’

‘‘मुगभाटात कुठे?’’

‘‘सरस्वती निवासमध्ये.’’

‘‘आता कहर झाला. मी पण सरस्वती निवासमध्येच राहतो.’’

जवळ बसलेल्या गिऱ्हाईकाला हे संभाषण असह्य झालं. न राहवून त्यानं वेटरला हाक मारून बोलावलं व विचारलं,‘‘हा काय मामला आहे?’’

‘‘तुम्ही लक्ष देऊ नका, साहेब’’ वेटर म्हणाला, ‘‘हा रोजचा तमाशा आहे. ते बापलेक आहेत.’’

बघा, एका दारूमुळे बापलेक कसे ‘घुल मिल’ जातात ते! नातेसंबंध सुधारण्यासाठी दारू हा जालीम उपाय असू शकेल का? नवराबायको मध्ये बाटली घेऊन बसले तर जास्त लग्न टिकतील का? विवाह समुपदेशक स्वतः ‘टाइट’ होऊन बसला व एकमेकांची डोकी फोडायला निघालेल्या नवरा-बायकोला त्यांनी आल्या आल्या एक एक पेग दिला तर त्यांच्यात दिलजमाई व्हायला वेळ लागणार नाही. मुख्य म्हणजे आपलं स्वतःचं लग्न अयशस्वी आहे हे तो ‘टाइट’ समुपदेशक विसरेल. किती आघाडय़ांवर दारू काम करते नाही?

एका बायकोनं नवऱयाला विचारले, ‘‘मी कशी दिसते?’’

‘‘मी मित्रांकडे जाऊन आल्यावर सांगू का?’’ नवऱयानं विचारलं.

‘‘ते का?’’

‘‘पोटात दारू गेलेली असली की, मी खोटं बोलू शकेन.’’

‘पुस्तक तुमच्या दारी’ योजनेचे प्रणेते विनायक रानडे म्हणतात, ‘‘घरी बाटलीतून दारू आणलेली चालत नाही, पोटातून आणलेली चालते.’’

धर्मानं मलकारीची दारू नाकारल्याची कहाणी इथे ‘साठा उत्तरा सफळ’ होत नाही. धर्माच्या वागणुकीचा राग येऊन मलकारीनं रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं. ‘‘दारूला नाही म्हणतोस, दारूला!’’ असं मारताना मलकारी तोंडानं म्हणाला असावा व ‘‘पुन्हा नाही, पुन्हा नाही, पुढच्या वेळी बादलीभर पिईन’’ असं मार खात धर्मा म्हणाला असेल. अजून तरी दारू पिण्यास नकार देणे हा कायद्याने गुन्हा नाही. मारझोड करणे हा (अजून तरी) गुन्हा आहे.

धर्मा हॉस्पिटलात अॅडमिट आहे का व मलकारी गजाआड (पीत) बसला आहे का? हे काहीच बातमीत दिलेलं नाही. अशा कशा अर्धवट बातम्या देतात?

तरी मी पेपर वाचतो. तुम्ही?…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या