चल खेळ खेळू या दोघं!

>> शिरीष कणेकर

आमच्या दोघांच्याही हातात पिस्तुलं होती. कदाचित खेळण्यातली. खरीखुरी एके 47 अंगाखांद्यावर खेळवायला मी संजू (बाबा) असतो तर राजकुमार हिराणीनं माझ्यावरही ‘शिस्त’ नावाचा चित्रपट काढला असता. तो बघायला काळं कुत्रंही गेलं नसतं. त्यातून माझी भूमिका करू शकला असता तो मुक्रीही आज आपल्यात नाही.

पिस्तुलं हातात नाचवणारे आम्ही दोघं होतो आजोबा शिरीष मधुकर कणेकर व नातू आयुष अमर कणेकर. तो अमेरिकेत जन्मला होता आणि तिथंच वाढत होता. मी इथेच जन्मलो होतो आणि इथेच दिवस मोजत होतो. आमच्या वयात जेमतेम सत्तर वर्षांचे अंतर होते.

“मी गुड मॅन’, तू ‘बॅड मॅन’ तो पिस्तुल माझ्या छातीवर रोखून म्हणाला.

एवढय़ा लहान वयात त्याला चांगला माणूस व वाईट माणूस हा भेद कळला होता. तो चांगला असल्यानं मला वाईट होणं क्रमप्राप्त होतं. देवानं त्याच्याबरोबर माझ्याही हातात पिस्तुल देऊन तुल्यबळांच्या युद्धात सत्चा असत्वर विजय होणार होता. पुढे मोठं झाल्यावर त्याला कळणार होतं की समोर उभा आहे तो माणूस चांगला आहे की वाईट हे ठरविण्यात आयुष्य जातं आणि तरी कळत नाहीच. सगळ्याच लहान मुलांना चांगलं व्हायचं असतं तर मग मोठे झाल्यावर त्यांच्यातले कितीतरी वाईट का होतात?

आमच्या द्वंद्वयुद्धात चांगल्या माणसानं गोळी झाडली आणि वाईट माणूस खाली कोसळला. मी उठलो कारण मला पुन्हा कोसळायचं होतं. चांगल्या माणसाचं समाधान होईपर्यंत मला गोळ्या खायच्या होत्या. प्राक्तन, दुसरं काय?

मी माझ्या नातवंडांशी खेळत होतो, त्यांना खेळवत होतो. मला जमत नव्हतं, झेपत नव्हतं. माझी सवय सुटून बरीच वर्षे लोटली होती. त्यांच्या आईला व बापाला मी खेळवत होतो तेव्हा मी तरुण होतो – शरीरानं व त्याहीपेक्षा जास्त मनानं. आम्ही रबरी चेंडूनं कॅच – कॅच करत होतो. मी परत परत सांगूनही माझा नातू चेंडू भलतीकडेच फेकत होता. जाणूनबुजून मला जागेवरून उठून जाऊन तो आणावा लागत होता. माझा पारा चढत होता. मग एकाएकी माझ्या लक्षात आलं की मी खेळत नव्हतो तर खेळवत होतो. जिंकणं हे नाही तर त्याला रमवणे हे माझे उद्दिष्ट होते. निदान हे उद्दिष्ट असायला हवं होतं. मी म्हातारचळ लागल्यासारखं वागून कसं चालणार होतं? पण त्यानं तरी भलतीकडे चेंडू का फेकावा? माझी पाठ आणि गुडघे दुखत असताना मला तो मिनिटा मिनिटात उठून पळायला का लावत होता? म्हणजे त्याला चेंडूशी खेळण्यात रस नव्हताच तर, मला छळण्यात रस होता. ‘डॅम इट’ मी महेश कोठारेसारखी उजवी मूठ डाव्या तळहातावर मारून म्हणालो.

“पप्पा दमले. आता दुसरा खेळ.’’ शेवटी माझी कणव येऊन माझा मुलगा त्याच्या मुलाला म्हणाला.

त्यानं माझ्याकडे एक तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकला व तो इंग्लिशमध्ये म्हणाला, ‘ग्रँडपा, यू गेट टायरड् व्हेरी अर्ली. यू मस्ट टेक सम टॉनिक.’’

“अरे, पण तू कुठं घेतोस कुठलं टॉनिक?’’ त्याच्या ‘डॅड’नी विचारलं.

“आय डोंट नीड एनी टॉनिक. आय एम स्ट्राँग. आय डोंट गेट टायरड् ऍट ऑल. ग्रँडपा इज हंड्रेड.’’ माझ्या वयात पंचवीस वर्षांची स्वखुशीनं वाढ करीत तो म्हणाला. मी पुन्हा दमलो असतो तर त्यानं मला दीडशेचा केला असता.

तो फक्त इंग्रजीत बोलत असल्यानं त्याच्या आजीच्या बोलण्यावर आपसूक मर्यादा येत होत्या. घरात येणारे सगळे व फोनवर बोलणारेही केवळ इंग्रजीत बोलणारे (व ऐकणारे) होतील तर काय बहार येईल, असा रम्य विचार माझ्या मनात इंग्रजीतून डोकावला. बायकांचं स्वरयंत्र (कोणी कोणी त्याला तोंड असंही म्हणतात.) बंद करण्याचे मार्ग ज्याचे त्याने शोधून काढावेत. माझा एक मित्र गेली अनेक वर्षे बहिरा असल्याचे नाटक करतोय. या माता – भगिनी – भार्या चऱहाट वळायला जन्मतःच कुठे शिकून येतात?…

आम्ही दुसरा खेळ सुरू केला. मी उंचावरून चेंडू टाकायचा व त्यानं समोरून ‘हेडर’ मारायचा. काही काळ बरं चाललं. मग चेंडू त्याच्या नाकावर लागला.

“बघा, मला वाटत होतं की त्याला लागेल. काय पपा!’’ त्याचा बाप कळवळून म्हणाला.
“अरे, त्या रबरी बॉलनं काय लागणार?’’ मी म्हणालो.

“पपा, लहान आहे तो.’’ मोठा झालेला माझा मुलगा म्हणाला.

मला एकाएकी आठवलं. माझा मुलगा अमर त्याचा मुलगा आयुषच्या वयाचा होता. तो खेळताना पत्र्याच्या खेळण्यावर पडला. त्याच्या ओठातून रक्त यायला लागलं. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. मी त्याला उचललं व धावत डॉक्टरांकडे घेऊन गेलो. मलमपट्टी करवून मी त्याला तसाच उचलून घेऊन घरी घेऊन आलो. मी घामानं ओलाचिंब झालो होतो. छाती धडधडत होती. कसल्या तरी अनामिक भीतीनं माझे ओठ कोरडे पडले होते आणि आता आयुषला लागलं असू शकेल या नुसत्या शंकेनं अमर कासावीस झाला होता.

मुलानातवंडांसमवेत आम्ही सगळे हॉटेलात जेवायला गेलो होतो. मी माझ्या सुनेला म्हटलं तर गमतीत म्हटलं तर गंभीरपणे म्हणालो, “तसं माझं आयुषकडे लक्ष आहे. मी त्याला आग्रह करीनच पण प्रामुख्यानं ‘तू त्याच्याकडे बघ. मी माझ्या मुलाच्या सरबराईत दंग असेन… अमर नीट जेव. पोटभर जेव. या चवीचं तुम्हाला तिकडे अमेरिकेत मिळणार नाही…’’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या