परीक्षण – मुक्तिबोधांचे अभ्यासपूर्ण आकलन

>> श्रीकांत आंब्रे

कविता, कादंबरी, समीक्षा या साहित्य प्रकारात आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या साहित्याची आणि साहित्य विचारांची त्यांच्या काळापासून आजपर्यंत जी उपेक्षा झाली ती अभूतपूर्व होती. 2021 या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात तरी या उपेक्षित साहित्यिकाला समजावून घ्यावे आणि इतरांना ते समजावून द्यावे, या हेतूने ‘शरदचंद्र मुक्तिबोध: शतकोत्तर आकलन’ या लेखसंग्रहाचे संपादन करून डा. श्रीपाद भालचंद्र जोशी व डा. अजय देशपांडे यांनी त्यांना न्याय देण्याचा केलेला प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे. त्यांच्या सर्वच लेखनातून त्यांच्या संवेदनक्षम, तरल सौंदर्यदृष्टी असलेल्या मनाचा प्रत्यय येतो. त्यांनी ‘मानुषता’ हे जीवनाचे आणि साहित्याचेही प्रयोजन मानले. मानुषता म्हणजे निव्वळ माणुसकी असा मर्यादित अर्थ न घेता मानुषता म्हणजे माणसांचे स्वत्व व माणसाचे सामाजिक अस्तित्व म्हणजे एक्झिस्टन्स असा विचार त्यांनी मांडला. डा. अजय देशपांडे यांनी मुक्तिबोध त्यांच्या साहित्यातून त्यांना जाणवलेले सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरणाचे स्वरूप गंभीरपणे मांडत होते, हे स्पष्ट केले आहे. आजच्या मानवमुक्तीच्या संघर्षाच्या टप्प्यावर त्यांचे विचार प्रेरक ठरू शकतील, असे मत डा. श्रीपाद भालचंद्र जोशी व्यक्त करतात. शरदचंद्र मुक्तिबोध यांचे पुत्र प्रदीप मुक्तिबोध यांनी वडिलांविषयी व्यक्त केलेल्या हृद्य भावना आणि आठवणी यातून त्यांचा जीवनमरणाचा संघर्ष आणि लिखाणाचा ध्यास किती जबरदस्त होता हे सांगितले आहे. डा. वि. स. जोग यांनी त्यांच्या वैयक्तिक आठवणींबरोबरच त्यांच्या सर्व साहित्यातून त्यांच्या रूपाने ‘ताठ कण्याचा माणूस’ कसा दिसतो व मार्क्सवादाचे व्यापक रूप कसे डोकावते हे सांगताना त्यांच्या विचारांची व्यापक दृष्टी आणि सडेतोड वृत्ती अतिशय लवचिक विचारसरणीसह कशी प्रत्ययास येते हे दाखवून दिले आहे. प्रा. यशवंत मनोहर यांनी मुक्तिबोधांनी आपली प्राध्यापकी अभ्यास, चिंतन, मनन आणि लेखन या गुणांनी कशी समृद्ध केली आणि आपल्या प्राध्यापकीला सर्वोच्च ज्ञानव्यवहाराचे आदर्श साधन कसे मानले हे पटवून दिले आहे. अशोक कृष्णाजी जोशी हे अस्तित्ववाद व मार्क्सवाद या दोन विरोधी विचारप्रणालींशी सांगड घालण्याचा मुक्तिबोध यांचा प्रयत्न होता, असे विश्लेषण करतात. अनंत देशमुख त्यांच्या साहित्याचा आणि समीक्षा विचारांचा आढावा घेताना त्यांच्या आणि मर्ढेकरांच्या सौंदर्यविचारांच्या मांडणीतील फरक अधोरेखित करतात. सुहासिनी कीर्तिकर त्यांचे जुन्या-नव्याचे समन्वयक आणि सौंदर्य व साहित्यमूल्य यांची उचित सांगड घालणारे प्रामाणिक साहित्यिक असे वर्णन करतात. प्रा. वसंत पाटणकर यांनी त्यांच्या कवितेची ठळक वैशिष्टय़े अभ्यासपूर्वक नमूद केली आहेत. शुभांगी पाथुरकर यांनी त्यांच्या मुक्तछंदात्मक कवितांचा वेध घेतला आहे, तर अविनाश सप्रे यांनी त्यांच्या कादंबरीतून प्रतीत होणाऱया विचारप्रवाहांवर चिकित्सक भाष्य केले आहे. ‘क्षिप्रा’ या त्यांच्या कादंबरीच्या शैलीविषयी रमेश धोंगडे यांनी त्या कादंबरीमधील काही वाक्ये, संवाद सादर करून त्यांचे वेगळेपण दाखविले आहे. त्यांचे दलित साहित्यातील अभिजाततेशी असलेले नाते ताराचंद्र खांडेकर यांनी विस्ताराने उलगडून दाखविले आहे, तर भारती सुदामे यांनी त्यांचा समष्टीविषयक विचार मांडताना त्यांचे समष्टीविषयी असलेले नाते त्यांच्या दृष्टिकोनातून स्पष्ट केले आहे. त्यांचे जीवन आणि साहित्याचा मागोवा अजय देशपांडे यांनी घेतला आहे. या सर्व अभ्यासकांनी त्यांच्या साहित्य विचारातील प्रगल्भतेबरोबरच त्यातील त्रुटीही दाखवल्या आहेत. आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या विदर्भातील या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकाच्या साहित्याला आणि साहित्य विचाराला त्यांचे स्वत:चे स्वतंत्र अधिष्ठान आहे, हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न मराठी साहित्यातील एका दुर्लक्षित आणि उपेक्षित अशा महत्त्वाच्या टप्प्याला निश्चित उजेडात आणणारा आहे.
शरदचंद्र मुक्तिबोध : शतकोत्तर आकलन
संपादक : डा. श्रीपाद भालचंद्र जोशी,
???डा. अजय देशपांडे
प्रकाशक : ग्रंथाली, मुखपृष्ठ : सतीश भावसार
पृष्ठे : 193, मूल्य : 350 रुपये