
>> श्रीनिवास औंधकर
मे महिन्यातील दुसऱया आठवडय़ापासूनच विदर्भ, मराठवाडय़ासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झाली. तसेच उत्तर हिंदुस्थानातील उंच हिमालयीन ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर बर्फवृष्टी चालूच होती. मे महिन्यात हे अपेक्षित नव्हते. यामागील प्रमुख कारणे पाहता हिवाळ्यात वाहणारे पश्चिमी विक्षोपीय वारे अर्थात ध्रुवीय वारे भागात सक्रिय आहेत. हे ध्रुवीय वारे साधारणपणे मार्च महिन्यात कमकुवत होणे अपेक्षित होते. तसेच आता सप्टेंबर महिन्यातच पुन्हा उत्तर हिंदुस्थानात पश्चिमी विक्षोपीय वारे अर्थात ध्रुवीय वारे सक्रिय झाले आहेत. याच वेळी मे महिन्यात इंडियन ओशन डायपोल इंडेक्स हा धन म्हणजे हिंद महासागरातील अरबी समुद्राकडील तापमान बंगालच्या उपसागरापेक्षा जास्त असल्याने निसर्ग चक्रीवादळाची निर्मिती झाली व हिंदुस्थानातच्या पश्चिम किनारपट्टीकडून मान्सून सक्रिय झाला, तर जूननंतर प्रशांत महासागरात अल निनो कमकुवत होत होत सरासरी तापमानापेक्षा कमी झाला व त्याची वाटचाल ला निनाकडे सुरू झाली. म्हणजे हिंदुस्थानी उपखंडातील समुद्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. सोबतच मार्च महिन्यापासून जगभरात लागू झालेल्या लॉक डाऊनच्या परिस्थितीमुळे वातावरणातील प्रदूषणाच्या पातळीमध्ये कमालीची घट झाली होती. या कारणामुळे पावसाळ्याच्या काळात हिंदुस्थानातील अनेक परिमंडळांत वर्षाच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.
डिसेंबर 20 – जानेवारी 21 पर्यंत प्रशांत महासागरात सध्याची ला निना परिस्थिती आणखी घटत जाऊन सुपर ला निना होणार असल्याने मान्सूननंतरही पावसाळ्यासहीत कडाक्याच्या थंडीचा काळ असेल असे संकेत मिळत आहेत.
अद्यापही सूर्य मंदावलेलाच…
सूर्यावरील सौर डागांची संख्या कमी झाल्याने ही सर्व परिस्थिती निर्माण होत आहे. सूर्य पृष्ठभागावर सौर डागांची संख्या साधारण दर अकरा-साडेअकरा वर्षांत शून्य संख्येवरून एका कमाल पातळीपर्यंत पोहोचते व पुन्हा ती शून्यावर येते. याला सौर साखळी असे म्हणतात. सूर्यावरील सौर डागांची संख्या जास्त किंवा कमाल पातळीवर असताना त्यापासून मोठय़ा प्रमाणावर उत्सर्जन अंतराळात फेकले जाते. अर्थात पृथ्वीच्या वरील वातावरणात मोठय़ा प्रमाणात उत्सर्जन पोहोचते. सौर साखळी न्यूनतम पातळीवर असताना वरील घटनेत कमालीची घट पाहायला मिळते. 15 सप्टेंबर रोजी नासा व नोवा या जागतिक संस्थांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत सौर साखळी क्रमांक 24 संपली व सौर साखळी क्रमांक 25 सुरू झाल्याचे जाहीर केले. इ. सन 2025 दरम्यान ही सौर साखळी कमाल पातळीवर असतानादेखील सौर डागांची संख्या सौर साखळी 24 प्रमाणेच मंदावलेली किंवा कमकुवत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या 21 ते 24 या चार सौर साखळ्यांमध्ये सातत्याने घट दिसून आली आहे. तसेच साखळी क्रमांक 26 ते 30 देखील म्हणजे इसवी सन 2080 पर्यंत अतिशय मंदावलेली असण्याची शक्यता आम्ही सौर अभ्यासक वर्तवत आहोत. म्हणजेच सूर्य मंदावत जात आहे.
पृथ्वीवरील परिणाम…
सूर्यावरील सौर साखळी न्यूनतम पातळीवर असताना म्हणजेच सौर डागांची संख्या कमी झाली की, अंतराळातून येणाऱया वैश्विक किरणांचा मारा पृथ्वीवर वाढतो. चालू वर्षीच्या नोंदीनुसार वैश्विक किरणांच्या प्रमाणात कमालीची वाढ दिसून आली आहे. ही वैश्विक किरणे पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या पृष्ठभागापासून तीन -चार किमी उंचीवर पावसासाठी आवश्यक ढगांच्या मोठय़ा प्रमाणात निर्मितीस मदत करत आहेत. या ढगांच्या पट्टय़ास इंटरट्रॉपिकल कन्वर्झन झोन (आयटीसीझेड) असे संबोधले जाते. या आयटीसीझेड बेल्टमधील विषुववृत्ताच्या भागात मोठय़ा प्रमाणात ढगांची निर्मिती झाल्याने मंदावलेल्या सूर्याकडून येणारी उष्णता या ढगांमध्ये शोषली जात आहे. त्यामुळे गेल्या हिवाळ्यात उत्तर गोलार्धातील अनेक देशांमध्ये तीव्र बर्फवृष्टी सुरू होती व उन्हाळा संपत आला तरीही उत्तर हिंदुस्थानसह अनेक उत्तर गोलार्धातील देशात पश्चिमी विक्षोपीय वारे अर्थात ध्रुवीय वारे अद्यापही सक्रिय आहेत.
गेल्या वर्षीपासून विषुववृत्ताच्या भागात ढगांची मोठय़ा प्रमाणात निर्मिती होत असल्याने आपल्या महाराष्ट्रात पावसाळा संपल्यानंतरही हिवाळ्यात अनेक ठिकाणी पाऊस धुमाकूळ घालणार असे दिसते आहे. एकूणच सूर्य मंदावत असल्याने येत्या काळात जगभर उत्तर गोलार्धातील अनेक ठिकाणी चक्रीवादळांची संख्या वाढणार आहे. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी तयारी सर्वांना करावी लागणार आहे.
हिवाळ्याची सुरुवात कडाक्याच्या थंडीने…
मागे वळून पाहिले तर सौर साखळी सुरू होण्याच्या काळात हिवाळ्यात पहिल्या व मध्यम टप्प्यांत म्हणजे ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत थंडीचा प्रकोप वाढलेला दिसून आला आहे. सन 1965-66, 1976-77, 1984-85, 1996-97 कालावधीत ऐतिहासिक घटना याला साक्षीदार आहेत. त्यामुळे याही हिवाळ्यात पहिल्या व मध्यम टप्प्यांत म्हणजे ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत थंडीचा प्रकोप वाढलेलाच असण्याची शक्यता आहे. सन 2007 म्हणजे गेल्या तेरा वर्षांपासून आपल्या पृथ्वीवरील येणारा काळ ‘जागतिक तापमान घसरण’ अर्थात ग्लोबल कुलिंगचा असणार आहे. एकीकडे सर्व जग जागतिक तापमानवाढ असा दावा करत असताना मी मात्र जागतिक तापमान घसरण अर्थात ग्लोबल कुलिंगच्या माझ्या मताशी ठाम राहिलो. आता त्याचा परिणाम दिसून यायला लागला आहे. कदाचित हा काळ 2080 पर्यंत लांबेल व हा काळ मॉडर्न मिनिमम किंवा ऐड्डी मिनिमम नावाने ओळखला जाईल.
– [email protected]
(लेखक संभाजीनगरच्या एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक आहेत)


























































