लेख – किशोरवयीन मुलांमधील वाढता स्क्रीनटाइम

>> स्नेहा अजित चव्हाण, [email protected]

मुलांमधील वाढता स्क्रीनटाइम चिंताजनक ठरतोय. अभ्यास आणि करमणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर वाढल्याचा हा परिणाम आहे. अभ्यासाबरोबरच करमणुकीच्या कारणासाठी मुलांचा स्क्रीनटाइम वाढत असून त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी ते धोकादायक आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून त्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. भाषिक काwशल्यांत मुले जास्त वेळ स्क्रीनपुढे राहण्यामुळे अडचणी येतात.

मोबाइल म्हणजे स्मार्टफोनशिवाय जगणे शक्य नसल्याची सध्याची स्थिती आहे. आपली अनेक कामे तो करत असल्याने जीवन सुलभ झाल्याचे मान्य केले तरी कशाचाही अतिरेक शेवटी धोकादायक ठरतो हे विसरून चालणार नाही. प्रौढांबरोबरच मुलांमधील वाढता ‘स्क्रीनटाइम’ हे त्याचे उदाहरण. अभ्यास आणि करमणुकीसाठी किती वेळ फोनचा वापर करावा याची मर्यादा निश्चित करण्याची वेळ आली आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात ‘Exam Warriors’बद्दल बोलताना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होत असलेल्या धोक्याचा उल्लेख केला आणि ‘स्क्रीनटाइम’ कमी करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कशाचाही अतिरेक वाईट असतो, मीसुद्धा गरज असेल तेव्हाच मोबाइल फोन वापरतो. तुम्हीही तुमचा स्क्रीनटाइम कमी करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला पंतप्रधानांनी या वेळी दिला. आपल्या मुलांच्या मोबाइलचे पासवर्ड पालकांना माहीत असावेत, गॅजेट्सचा वापर करताना त्यात त्याच्या वापराच्या वेळेची मर्यादा (टाइम ट्रकिंग) निश्चित करणारी टूल्स असावीत. तुमचा स्क्रीनटाइम किती आहे हे तुम्हाला समजले पाहिजे अणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करण्याची बुद्धी आपल्याकडे असायला पाहिजे.

स्मार्टफोन, टॅब्लेट, कॉम्प्युटर किंवा स्मार्ट वॉचच्या स्क्रीनपुढे जास्त वेळ असणाऱया मुलांचे प्रमाण वाढत असणे चिंताजनक आहे . अनेक पालक त्यांची लहान मुले इलेक्ट्रॉनिक गॅजेटसच्या आहारी गेली आहेत. मुलगा टीव्ही सहा – सात तासांपर्यंत कार्टून नेटवर्क पाहतो, तर दहा वर्षांचा मोठा मुलगा आईच्या स्मार्टफोनवर इन्स्टाग्रामवरील रील पाहण्यात रमलेला असतो. ‘करमणुकीसाठी टीव्ही आणि मोबाइल आवश्यक असले तरी माझी मुले त्यांच्या आहारी गेली आहेत आणि त्यांना त्यापासून दूर करण्याचा मार्ग मला सापडत नाही, अशा शब्दांत पलाक हताशपणा व्यक्त करतात.

मुलाच्या विकास आणि वाढीच्या वर्षांत स्क्रीनपुढे जास्त वेळ घालविल्यामुळे शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, लक्ष केंद्रित होऊ शकत नाही आणि अशी मुले शारीरिक हालचाली करणे टाळायला लागतात. ही मुले आभासी जगात रमत असल्याने त्यांना वास्तवाची जाणीव राहत नाही आणि त्यामुळे त्यांचा मूड सतत बदलतो. स्क्रीनपुढेच जास्त वेळ जात असल्याने समाजात मुलगी आणि मुलाच्या भावी आयुष्यातील विकासासाठी पहिली तीन वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात हे पालकाने लक्षात ठेवले पाहिजे. बालपणातील प्रारंभीचा काळ मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचा असतो आणि जास्त वेळच्या स्क्रीनटाइममुळे त्यावर परिणाम होतो. जगण्यासाठी आवश्यक काwशल्य न शिकता येणे त्यातून होऊ शकते. पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुले पालक अथवा इतरांच्या ओठांच्या हालचालींवरून भाषा शिकतात. मात्र स्क्रीनपुढे जास्त वेळ असलेल्या मुलांना शिकण्यास वेळ लागतो. लहान वयात मुले डिजिटल डिवाइसपुढे येत असल्याने ती समाजापासून एकाकी पडत आहेत आणि लॉक डाऊनच्या काळात सुरू झालेल्या ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांमधील विकार वाढत आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा स्क्रीनटाइम वाढून त्यांच्या वर्तणुकीवर परिणाम होत आहे. घरीच बसावे लागल्यामुळे मुलांचे समाजात वावरणेही थांबले होते. स्क्रीनच्या अति वापराचे परिणाम मुलांच्या वर्तणुकीवर होत असल्याचे तज्ञांचे निरीक्षण आहे. त्यात ‘आभासी आत्मकेंद्रितपणा’ (virtual autism) जास्त असून आभासी जगात जास्त रमणाऱ्यासाठी ही संज्ञा वापरली जाते. आभासी जगात वावरण्यामुळे मुलांना वास्तव जग समजत नाही.

सतत स्क्रीनपुढे असलेल्या मुलांना संभाषण करणेही कठीण जात असल्याचे जाणवते. मुलांना लहान वयात तरी स्क्रीनपासून लांब ठेवणे हा आदर्श मार्ग असला तरी आताच्या काळात ते शक्य नाही.
(लेखिका या श्रमिक विद्यालय, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथे सहशिक्षिका आहेत. महाराष्ट्र शासन व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, मुंबई येथे करीअर समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)
किशोरवयीन मुलांबाबत …

– मुलांचा गॅजेट वापराचा वेळ निश्चित करा, छंद जोपासण्यास प्रोत्साहन द्या, घरात संवाद ठेवा.
– या वयाच्या मुलांनी गॅजेट किती वेळ वापरावे त्याची मर्यादा ठरवून द्या.
– मुलांना छंद जोपासण्यास प्रोत्साहन द्या आणि स्क्रीनशिवाय इतर खूप काही असल्याचे सांगा.
– मुले ऑनलाइन असताना त्यांना आलेले अनुभव ऐका.
– समस्या असतील तर मार्गदर्शन करा.
– निर्बंधापेक्षा मुलांना समजावून सांगा.
– मानसिक आरोग्याचे महत्त्वही त्यांना पटवून द्या.
– मैदानी खेळ खेळण्यास तसेच विधायक आवड जोपासण्यास मुलांना प्रोत्साहन देणे कधीही चांगले.
– मुलांचा स्क्रीनटाइम कमी करण्यासाठी त्यांच्या टीव्ही, मोबाइल आणि कॉम्प्युटर वापरायच्या वेळा पालकांनी निश्चित कराव्यात आणि त्या वेळांचे काटेकोर पालन करावे.
– तुम्ही ठरवून दिलेल्या वेळांचे पालन करणे मुलगी-मुलाने सुरू केल्यावर त्यांना काहीतरी बक्षीस द्या.
– मुलांना गॅजेटचा वापर करण्यासाठी घरात सर्वांना दिसेल अशी एक जागा निश्चित करा.
– मुलांना सहज दिसतील अशा पद्धतीने घरात गॅजेट ठेवू नका.
– मुलांना उपयुक्त असलेले कार्यक्रम त्यांना टीव्ही अथवा कॉम्प्युटरवर पाहू द्या.