
>> सोनम परब
सरोगसीद्वारे बाळाला जन्म हा विषय फारसा नवा राहिला नसला तरी त्याबाबत वेगवेगळे मत व्यक्त केले जाते. नुकतंच प्रियंका चोप्रा या बॉलीवूड अभिनेत्रीने सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला आणि याबाबत उलटसुलट मतं व्यक्त होऊ लागली. तथापि, बॉलीवूडशी संबंधित अनेकांनी सरोगसीच्या मदतीने अपत्यप्राप्ती केली आहे आणि त्या प्रक्रियेची पाठराखण करणारी मतेही वेळोवेळी मांडली आहेत. सेलिब्रिटी वर्तुळात त्यांचे स्वागत करणारेच अधिक आहेत.
सरोगसीद्वारे बाळाला जन्म देणार असल्याची घोषणा सेलिब्रिटींनी केली की, याबाबत उलटसुलट मत व्यक्त केलं जातंच. नुकतीच प्रियांका चोप्राही या कारणामुळे चर्चेत आली. सोशल मीडियावर याविषयी उलटसुलट टिप्पणीही झाली. सरोगसीच्या बाबतीत समाजात असलेले मतप्रवाह यानिमित्ताने पुढे आले. प्रख्यात लेखिका तस्लीमा नसरीन यांनी ट्विट करून त्यांची मते शेअर केल्यानंतर वादाला तोंड फुटले. “सरोगसीद्वारे ‘तयार केलेले’ बाळ पाहून मातेच्या भावना काय असतात? ज्या थेट बाळांना जन्म देतात त्या मातांसारख्याच भावना या मातांना होतात का? तुमची वैशिष्टय़े घेऊनच बाळ जन्माला आले पाहिजे, हा तुमचा अहंकार आहे,’’ असे मत मांडल्यानंतर तस्लीमा खूप ट्रोल झाल्या.
योगायोगाने सरोगसी नियमन विधेयक तसेच एआरटी (असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी रेग्युलेशन) विधेयक राज्यसभेने डिसेंबर 2021 मध्ये संमत केले. सरोगसीच्या माध्यमातून लिंग निवडीचे गैरप्रकार आणि सरोगेट मातेचे शोषण टाळणे हा त्यामागील हेतू होता. तज्ञांचे आणि सेलिब्रिटींचे या तंत्राविषयी काय मत आणि अनुभव आहे, हे यानिमित्ताने पाहायला हवे. बॉलीवूड सेलिब्रिटींनी सरोगसीचा पर्याय निवडल्याची अनेक उदाहरणे आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये प्रीती झिंटा आणि जीन गुडइनफ यांनी सरोगसीद्वारे जिया आणि जय या जुळ्या मुलांचा जन्म झाल्याची घोषणा केली. फेब्रुवारी 2020 मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी सरोगसीद्वारे समिशा या मुलीच्या जन्माची घोषणा केली. आपले दोन गर्भपात झाले असून, सरोगसीचा पर्याय निवडण्यापूर्वी आपण अनेक पर्यायांचा विचार केला होता, असे शिल्पाने स्पष्ट केले. 2019 मध्ये श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांना लग्नानंतर 14 वर्षांनी सरोगसीद्वारे आद्या ही मुलगी झाली. आजन्म कर्करोगाच्या विविध औषधांचे सेवन करणारी लिसा रे 2018 मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई बनली.
2017 मध्ये निशा नावाच्या मुलीला दत्तक घेणाऱ्या सनी लिओनीने नोह आणि अशर या जुळ्या बाळांना 2018 मध्ये सरोगसीद्वारे जन्म दिला. करण एकल पिता (सिंगल पॅरेन्ट) होण्याचा निर्णय घेतला आणि सरोगसीचा पर्याय निवडला. त्याने रुही आणि यश या जुळ्या मुलांना सरोगसीद्वारे घरात आणले. तुषार आणि एकता कपूर या भावंडांनीही अशाच प्रकारे एकल पालकत्वाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या आईवडिलांना आश्चर्याचा धक्काच बसला. तुषारने जून 2016 मध्ये लक्ष्य या मुलासाठी सरोगसीचा पर्याय निवडला. त्यानंतर त्याचेच अनुकरण करीत एकताने जानेवारी 2019 मध्ये रवी या मुलाला सरोगसीद्वारे जन्म दिला. शाहरुख खान आणि गौरी खान यांनी 2013 मध्ये सरोगसीद्वारे अबराम या तिसऱ्या मुलाला जन्म दिला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. आमिर खान आणि किरण राव हे दांपत्य 2011 मध्ये सरोगसीद्वारे आझाद या मुलाचे आईबाबा झाले. किरणचा गर्भपात आणि गर्भाशयातील गुंतागुंतींमुळे या दांपत्याने हा मार्ग निवडला.
समाजातील एका मोठय़ा वर्गाला सरोगसीची संकल्पना मान्य नाही. हा वर्ग सरोगसीचा पर्याय निवडणाऱया सेलिब्रिटींवर टीका करतो. सरोगेट मातांच्या चांगल्या-वाईट बाजूंचे चित्रण करणाऱ्या ‘मिमी’ चित्रपटाचे लेखक रोहन शंकर म्हणतात की, काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत सरोगसीबद्दल असलेला आकस कमी झाला आहे. महिलांना मूल व्हायला हवे, ही आपली संस्कृती आहे, परंतु अशा अनेक जणी असतात, ज्या गर्भधारणा करू शकत नाहीत. अशा जोडप्यांसाठी सरोगसी हे एक वरदान आहे. काही स्त्रिया करीअर ओरिएन्टेड आणि महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना मूल होऊ द्यायचे नसते. पाश्चिमात्य समाजात ही गोष्ट फार महत्त्वाची मानली जात नाही. आपल्या समाजात मात्र ही स्वीकारार्हता फार कमी आहे. सरोगसीचा मार्ग स्वीकारणाऱयांना ट्रोल्सचा त्रास होतो आणि बऱयाच वेळा ट्रोल्स पुरुष असतात हे मुद्दाम नमूद करण्याजोगे आहे.
सिद्धार्थ-गरिमा ही बॉलीवूडमधील प्रख्यात पटकथा लेखक जोडी लवकरच दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे. गुजरातमधील आनंद नावाच्या गावात सुमारे पाचशे कुटुंबे सरोगसीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करतात. या गावातील व्यावसायिक सरोगसीवर आधारित ‘गरिमा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दोघे करणार आहेत. ते सांगतात, “पूर्वी वैद्यकशास्त्राने फारशी प्रगती केली नव्हती तेव्हा सर्वकाही सरळसाधे होते. ज्यांना मूल होत नसे ते आजूबाजूच्या सर्वांना मुले होताना पाहत असत आणि आपल्याला एखादे मूल दत्तक घेता येईल का, असा विचार करीत असत. या प्रक्रियेतून थोडा परोपकारही होत असे. कारण त्यांच्यामुळे एका बालकाचे जीवन सुधारत असे. त्या वेळचे जग अधिक चांगले होते. आता लोकांकडे पैसा भरपूर आहे आणि वैद्यकीय शास्त्रानेही प्रगती केली आहे. त्यामुळे काही कारणांनी मूल न होणारी दाम्पत्ये असा विचार करतात की, तंत्रज्ञान आहे, पैसा आहे मग आपलेच गुण असणारे मूल का असू नये? यात गैर काही नाही. ही जन्मजात मानवी भावना आहे.’’
एकंदरीत बॉलीवूडशी संबंधित अनेकांनी सरोगसीच्या मदतीने अपत्यप्राप्ती केली आहे आणि त्या प्रक्रियेची पाठराखण करणारी मतेही वेळोवेळी मांडली आहेत. निक आणि प्रियांका जोडीने जे केले, त्यावर समाजातील विशिष्ट वर्गाकडून कडाडून टीका होत असली तरी सेलिब्रिटी वर्तुळात त्यांचे स्वागत करणारेच अधिक आहेत.





























































