
>> सुजाता बाबर
पूर्वी लोक पर्यटनासाठी बाहेर पडत ते एखाद्या संन्याशासारखे! हळूहळू आधुनिक वाहने आली, पर्यटनाचा व्यापारी हेतू प्रबळ झाला. पर्यटन खर्चिक आणि महाग होऊ लागले! आता तर अंतराळ पर्यटन सुरू झाले आहे. काही वर्षांपूर्वी अंतराळ पर्यटन हवे का, असा प्रश्न विचारला जायचा! आता तो प्रश्नही मागे पडलाय. अंतराळ पर्यटन कंपन्या निघाल्या आहेत. जगातील गर्भश्रीमंत हौशी अंतराळ पर्यटक प्रसिद्ध होऊ लागले आहेत!
सध्या चर्चेत आहेत जेफ बेझोस! हे नाव आपल्याला फारसे नवीन नाही. ऍमेझॉन कंपनीचे संस्थापक आणि मालक! जगातील सर्वात श्रीमंत माणूस. त्यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ नावाच्या एअरोस्पेस कंपनीतर्फे 20 जुलै रोजी ते अंतराळ पर्यटनाला निघणार आहेत! ही बातमी बाहेर पडताच ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ या स्पेस फ्लाईट कंपनीचे संस्थापक सर रिचर्ड ब्रॅन्सनदेखील पर्यटनाला निघणार आहेत अशा बातम्या पसरू लागल्या.
आजपर्यंत अंतराळात प्रवास हा केवळ विज्ञान आणि संशोधन या उद्देशाने केला जात असे. अवकाशात स्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाऊन प्रयोग करणे हे मुख्य उद्दिष्ट असायचे, परंतु आता मात्र खासगी कंपन्यांसाठी हे स्थानक खुले झाल्याने अंतराळ पर्यटनामध्ये स्पर्धा लागणार यात काही शंका नाही. ज्यांना परवडू शकते ते नक्कीच याचा लाभ घेतील. आजपर्यंत केवळ सात व्यक्ती पर्यटक म्हणून अंतराळात गेले आहेत.
असा अंदाज आहे की, 2020 ते 2030 च्यादरम्यान अंतराळ पर्यटनामधून आठ अब्ज डॉलर्सचा महसूल जमा होऊ शकतो. नासाने खासगी अंतराळवीरांसाठीचे दर नुकतेच वाढवले आहेत. अंतराळ पर्यटनामध्ये वेगवेगळी ‘पॅकेजेस’देखील आहेत. वेगवेगळ्या वेगाने आणि वेगवेगळ्या उंचीवरून असणाऱया सफरी यात होऊ शकतात. याचे तीन प्रकार म्हणजे ऑर्बायटल, सबऑर्बायटल आणि पॅराबोलिक. ऑर्बायटल सफरीमध्ये पृथ्वीभोवतीच्या कक्षेत राहून वेगाने प्रवास करता येतो. सबऑर्बायटल सफरी वेगाने कमी असतात आणि ऑर्बायटल सफरीप्रमाणे पृथ्वीभोवती कक्षेत मात्र जात नाहीत. पॅराबोलिक सफरींसाठी सर्वाधिक बुकिंग झालेली आहे. ही त्यामानाने सोपी सफर आहे. यात तात्पुरता ‘फ्रीफॉल’चा अनुभव घेता येतो. म्हणजे अंतराळवीर ज्याप्रमाणे अंतराळात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामधील वजनरहित अवस्थेचा अनुभव घेतात तसा अनुभव येऊ शकतो.
या क्षेत्रात सुमारे वीस कंपन्या उतरल्या आहेत. त्यात ऍमेझॉनची ब्लू ओरिजिन, रिचर्ड ब्रॅन्सन यांची व्हर्जिन गॅलॅक्टिक आणि एलन मस्क यांची स्पेसएक्स या तीन कंपन्या अग्रगण्य मानल्या जातात. भविष्यात ही तीन नावे अत्यंत वलयांकित असतील यात शंका नाही. यासाठी वापरण्यात येणारी अंतराळयानेदेखील अनेक सोयींनी युक्त आहेत. यामध्ये खिडक्या मात्र खासकरून मोठय़ा आणि पारदर्शक आहेत, जेणेकरून पर्यटक अंतराळाचा आनंद लुटू शकतात. सध्या स्पेसएक्स जास्त लोकप्रिय ठरत आहे.
अंतराळात स्थानके बांधण्यामध्ये चीनने यशस्वी पाऊल टाकले आहे. चीनचे टियांगॉन्ग-3 हे अंतराळ स्थानक अवकाशात स्थित झाले आहे. काही वर्षांमध्ये अंतराळात अनेक स्थानके असतील आणि या व्यवसायामध्ये अजून कंपन्या उतरतील.
खरे तर अंतराळावर कोणा एका देशाची मत्तेदारी असू शकत नाही. यासाठी पूर्वी आंतरराष्ट्रीय करार झाले आहेत, परंतु व्यवसायाचे वाढते स्वरूप पाहता त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. हे पर्यटन केवळ स्थानकांपर्यंत नाही, तर हळूहळू चंद्र, मंगळ यांच्यापर्यंत पोहोचेल. पर्यटनाने पृथ्वीवर जे मुद्दे निर्माण केले आहेत तेच अंतराळात निर्माण होतील. ते अधिक घातक असतील. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. सध्या तरी अंतराळात जाण्यासाठी अनेक हौशी पर्यटकांनी नंबर लावले आहेत. तुम्हाला जायचे असेल तर करोडो रुपये हाताशी ठेवा!





























































