छोटीशी गोष्ट – आंबट द्राक्षे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुरेश वांदिले

एकदा कोल्होबा जंगलातून जात होते. वाटेत त्यांना द्राक्षाचे झाड लागले. ती द्राक्षे बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांनी ती द्राक्षे तोडण्याचा प्रयत्न केला. जमेल तितकी उंच उडी मारली, पण द्राक्षाची एकही फांदी त्यांच्या तोंडात येईना. उडय़ा मारून मारून कोल्होबा थकले. त्यामुळे ते झाडाखाली डोळे मिटून बसले. काही वेळाने त्या ठिकाणी माकडोबा आले. डोळे मिटलेल्या कोल्होबांना बघून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोल्होबांना हाक मारली. काय झाले ते विचारले. कोल्होबांनी द्राक्ष तोडण्याची संपूर्ण कथा सांगितली.
“झालं ते बरंच झालं, असं नाही का वाटत कोल्होबा तुम्हास?” माकडोबाने विचारले.
“म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय माकडोबा?” कोह्याने विचारले.
“अहो, ही द्राक्षं जर आंबट असतील तर तुम्हाला खोकला नसता का झाला?” माकडोबाच्या या उत्तरावर कोल्होबा हसले.
“कोल्होबा का बुवा हसलात तुम्ही? मी खरंच ते सांगितलं.वाटल्यास आपण वनातील कैद्यांना विचारू या.” माकडोबा म्हणाला.
“माकडोबा तुम्ही खरंच बोललात, पण मला माझ्या आजोबांच्या आजोबांची कथा आठवली. त्याचं हसू आलं.”
“त्या कथेत द्राक्ष होती का?”
“हो ना…!”
“मग ते नक्कीच आंबट असणार.” माकडोबा म्हणाला.
यावर कोल्होबा पुन्हा हसले.
“अहो, तुम्ही हसता का? मी खरं तेच सांगतोय.”
“नाही हो माकडोबा, तसं नाही. आमच्या आजोबांचे आजोबा असेच जंगलातून जात असताना त्यांना असंच एक द्राक्षाचं झाड दिसलं. माझ्यासारखंच त्यांच्याही तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी द्राक्षे तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते जमलं नाही. आपणास द्राक्षे खायला मिळाली नाहात म्हणून इतरांनाही खायला मिळायला नको, असा दुष्ट विचार त्यांच्या मनी आला.”
“अरे बापरे, मग काय केलं त्यांनी?”
“अहो, ते द्राक्षाच्या झाडाखाली उभं राहून जाणाऱया-येणाऱयाला द्राक्षे आंबट आहेत, खाऊ नका हं, खोकला होईल असं सांगत राहिले. रात्र पडायला लागल्यावर घरी निघून आले.”
“अहो कोल्होबा, यात त्यांचं काय बरं चुकलं? ते तर योग्यच सांगत होते.”
“माकडोबा, योग्य का अयोग्य याची खात्री केल्याशिवाय कसं काय ठरवणार आपण? त्यासाठी त्यांचं तोंड फांदीपर्यंत पोहोचायला तर पाहिजे होतं ना! बरोबर. ते शक्य झालं नाही तर त्यांनी चूप राहायला हवं होतं.”
“अहो कोल्होबा, तुम्ही तुमच्या आजोबांची निंदा करत आहात असं नाही का वाटत तुम्हाला?”
“निंदा नाही हो माकडोबा, सत्य तेच सांगतोय. त्यांनी एकतर चूप राहायला हवं होतं किंवा स्वत:चा अहंकार बाजूला ठेऊन कुणाच्या तरी मदतीने द्राक्षे मिळवायला हवी होती.”

“अच्छा तर, आम्ही तुम्हास मदत करावी अशी अपेक्षा आहे म्हणायची!” “हो, का नाही? मला बुवा द्राक्षे खाण्याची इच्छा झालीय. फुकाच्या अहंकाराने किंवा खोटं बोलून माझं पोट थोडंच भरणार. तुम्ही झाडावर झरदिशी चढू शकता. झाडावर चढून तुम्ही एक द्राक्षं खाली टाका. आंबट असेल तर लगेच लक्षात येईल. नसेल तर दोघेही किंवा जे कोणी इथे येतील त्यांच्यासह खाऊ. मज्जा करू.”
माकडोबाने ते मान्य केले. झाडावर चढता चढता ते कोल्होबास म्हणाले…
“तुम्हाला तुमच्या आजोबांच्या आजोबांचा दुर्गुण लागला नाही हे बरं झालं.”
“अहो माकडोबा, आपण काळासोबत बदलायला हवं. अन्यथा त्यांच्यासारखंच मलाही द्राक्ष चाखण्यापासून वंचित राहावं लागेल.” कोल्होबा हसत म्हणाले.