
>> स्वरा सावंत
शतकभरापूर्वी एक साप्ताहिक सुरू झाले. स्थानिक पातळीवरच्या घडामोडीच नाही, तर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही या साप्ताहिकाने मोठे योगदान दिले. ‘किरात’ असे या साप्ताहिकाचे नाव. एकेकाळी भरभराटीचे बंदर असलेल्या पश्चिम किनाऱयावरील वेंगुर्ले या शहरातून ‘किरात’ची मुहूर्तमेढ 1922-23 दरम्यान रोवली गेली. अनंत वासुदेव मराठे या संस्थापक संपादकांच्या मार्गदर्शनाखाली पुढे याचा वटवृक्ष बहरला. ‘किरात’ने लेखकांना उत्तेजन देत अनेक प्रश्नांना वाचा फोडली. त्यामुळे ‘किरात’ची वाटचाल आजही दमदारपणे सुरू आहे. आता ‘किरात’ हे केवळ वेंगुर्ल्याचेच नव्हे, तर कोकणचे मुखपत्र बनले असून सरकारी स्तरावरही ‘किरात’च्या कामाची उल्लेखनीय नोंद आहे. यंदाचे हे ‘किरात’चे हे शताब्दी वर्ष. यानिमित्ताने गेल्या शतकभर कामगिरीचा घेतलेला हा आढावा.
वेंगुर्ले हे दक्षिण कोकणातील स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र होते. अ. वा. मराठे हे व्यासंगी लेखक होते. त्या काळी वेंगुर्ल्यात छापखान्याची सोय नव्हती. लहानमोठय़ा छपाईच्या कामासाठी 17 मैलांवर असलेल्या सावंतवाडी संस्थानच्या छापखान्यात जावे लागे. यासाठी मराठे यांनी मुंबईतील ओळखीतून स्वतःच्या जबाबदारीवर एक छोटासा परिपूर्ण छापखाना विकत आणला. पुढे काय? हा प्रश्न होताच. स्वातंत्र्य चळवळीला पोषक आणि लोकप्रबोधन करणारे असे वृत्तपत्र आपणही सुरू करण्याचे मराठे यांनी ठरविले आणि 1922 साली त्यांनी ‘किरात’ हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. वेगवेगळ्या विषयातील तज्ञ व्यक्तींनी त्या काळी ‘किरात’मध्ये विविध विषयांवर लेख लिहून लोकप्रबोधन केले आहे. त्यावेळी संपादक म्हणून द. गो. काळे, ना. वि. जोग अशा शिक्षकांनीही काही काळ ‘किरात’च्या संपादनाची धुरा सांभाळली होती.
साप्ताहिक ‘किरात’ अविरत सुरू राहावा या उद्देशाने 2011 मध्ये ‘किरात ट्रस्ट’ची स्थापना केली गेली. श्रीधर मराठे यांच्यानंतर त्यांचा मुलगा श्री.शशांक मराठे यांनी ‘किरात’ची धुरा 2016 पर्यंत सांभाळली. साप्ताहिक ‘किरात’ व ‘किरात’ मुद्रणालयाची व्यवस्थापकीय धुरा मेघःश्याम केशव मराठे हे समर्थपणे सांभाळत आहेत. सध्या सीमा शशांक मराठे या ‘किरात’च्या संपादकपदी कार्यरत आहेत. ‘किरात’ ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून ‘श्रीधर मराठे स्मृती जागर विचारांचा’ हा प्रबोधनात्मक उपक्रम गेली सात वर्षे करत आहेत.
‘किरात’च्या कारकीर्दीला पुरस्कारांची दाद
‘किरात’च्या दिवाळी विशेषांकांना अनेक राज्यस्तरीय प्रदर्शनांतून उत्कृष्ट अंक म्हणून तसेच उत्तम संपादनाबद्दल पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचबरोबर ‘किरात’च्या संपादकांना, श्रीधर मराठे यांना अनेक राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे प्रतिवर्षी उद्योजक डहाणूकर पुरस्कृत राज्यस्तरीय पत्रकारिता स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत 1986 साली ‘किरात’मधील ‘कोकण विकास आणि पुणे परिषद’ या संपादकीय अग्रलेखाला काकासाहेब खाडिलकर स्मृती प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले होते. त्याचबरोबर वसई येथील पै. भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठानचा कोकण विभागीय पुरस्कार, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, विश्वसंवाद पेंद्र या संस्थेचा महर्षी नारद पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा कोकण वैभव पुरस्कार ‘किरात’चे संपादक श्रीधर मराठे यांना मिळालेले आहेत. हे पुरस्कार म्हणजे ‘किरात’च्या कार्याचीच पावती आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत ‘किरात’ने दिलेले योगदान
– समाजासाठी विघातक असलेल्या गोष्टींवर भाष्य करणाऱया ‘किरात’ने स्थानिक विषयांना प्राधान्य देत कोकणाच्या समस्या आणि राष्ट्रीय विषयावर लेखही प्रसिद्ध केले. अ. वा. मराठे उत्कृष्ट लेखक, संपादक होतेच. त्याबरोबरच त्यांनी अनेक समकालीन लोकांना विविध विषयांवर लिहिण्यास प्रवृत्त करून नवे लेखक घडविण्याचे काम केले.
– कोकण रेल्वेचे उद्गाते म्हणून ओळखले जाणारे अ. ब. वालावलकर त्यापैकीच एक. वालावलकर हे जॉर्ज इंग्रजी शाळेत मराठे यांचे विद्यार्थी. रेल्वे खात्यात नोकरीला लागल्यानंतर त्यांनी कोकण रेल्वेचा आराखडा आणि आवश्यकता याविषयी अभ्यासपूर्ण लेख लिहिले.
– राशिभविष्य लेखनाने ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ‘धनुर्धारी’ हे मासिक लोकप्रिय केले आणि वृत्तपत्रांतून राशिभविष्य देण्याची प्रथा सुरू केली ते मालवणचे होरारत्न ज्योतिषी वसंत लाडोबा म्हापणकर यांना ‘किरात’ने ओळख दिली.
– अशक्यप्राय वाटणारी कोकण रेल्वे सुरू झाली आणि तीस वर्षांपूर्वी जिह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला. पश्चिम किनारी सागरी महामार्गाचा आराखडा, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आणि कोकण विकासाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व सांगणारा लेख 50 वर्षांपूर्वी ‘किरात’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केला. आज तो मार्ग बहुतांशी पूर्ण झाला आहे.
– त्यावेळी रत्नागिरी जिल्हा हा मंडणगड ते दोडामार्ग असा लांबलचक पसरलेला होता. प्रशासनाच्या आणि जनतेच्या दृष्टीनेही तो गैरसोयीचा होता. या जिह्याची फाळणी करून दोन जिल्हे करावेत आणि दक्षिण रत्नागिरी जिह्याचे नाव ‘सिंधुदुर्ग’ असे ठेवावे अशा स्वरूपाचा लेख सर्वप्रथम ‘किरात’मधून प्रसिद्ध झाला होता. जिह्याचे मुख्यालय ‘वेंगुर्ले’ येथे ठेवावे अशीही सूचना त्या लेखात करण्यात आलेली होती. त्यावेळी बाबा मराठे यांचे सहकारी विष्णुपंत नाईक, सुरेश शर्मा अशा कितीतरी लोकांनी लेखन केलेले आहे.
‘किरात’ ठरला प्रबंधाचा विषय
एका महाविद्यालयीन प्राध्यापकांनी ग्रंथपाल पदवीसाठी ‘किरात’च्या कार्याचा आढावा घेणारा प्रबंध सादर केला आहे. त्याचबरोबर पीएच.डीसाठीही प्रबंधाचा विषय म्हणून साप्ताहिक ‘किरात’ची निवड करुन किरातच्या समग्र वाटचालीचा आढावा घेणारे संशोधनकार्य एका प्राध्यापकांनी सुरू केले आहे. तसेच 2020 मध्ये रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी ‘किरात’च्या जुन्या अंकांचा अभ्यास करून प्रबंध सादर करणार आहेत. यावरून ‘किरात’चे आजचे जनमानसातील स्थान अधोरेखित व्हावे. गेल्या 12 वर्षांत ‘किरात’ने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून मोठी झेप घेतली आहे. नियमित आठ पृष्ठांचा, रंगीत छपाई व आकर्षक मांडणी असलेला अंक प्रसिद्ध होत आहे. सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर नवनवीन सदरे सुरू केलेली आहेत, त्यांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘किरात’ फेसबुक पेज www.kiratonline.in या वेबसाईटद्वारे ‘लोकल टु ग्लोबल’ अचूक लक्षवेध करणाऱया खात्रीशीर बातम्या, विशेष लेख हे ‘किरात’चे वैशिष्टय़ राहिले आहे.




























































