पाकसंस्कृती – वाट्यांची देवाणघेवाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> तुषार प्रीती देशमुख

खाद्य संस्कृतीमध्ये पदार्थांनी भरलेल्या वाट्यांच्या देवाणघेवाणीमध्ये खूप महत्त्व आहे. अशी ही प्रेमाने बनवलेल्या पदार्थांची वाटी जेव्हा आपण एखाद्याच्या हाती सुपूर्द करतो तेव्हा ती स्वीकारताना त्यांच्या चेहऱयावरचा आनंद त्या बनवलेल्या पदार्थाची प्रेमाची खरी पोचपावती असते.

वयाच्या 13 व्या वर्षी स्वयंपाकघरात कुटुंबासाठी संपूर्ण स्वयंपाक करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली तेव्हा जाणले की, स्वयंपाकघर म्हणजे संपूर्ण घराचं अर्थशास्त्र आहे. वडिलांचा पगार व आजोबांची पेन्शन माझ्याकडे सुपूर्द केली गेली की, मग मी आणि आजी महिन्याचं सामान भरून, सर्व खर्च करून बाजूला राहिलेली जमापुंजी एखाद्या बंद बरणीत लॉकर म्हणून स्वयंपाकघरातच ठेवायचो.

महिनाअखेर स्वयंपाकासाठी लागणारे काही घटक संपले की, मग तारांबळ उडायची तेव्हा हक्काने वाटी घेऊन तो घटक आजूबाजूच्या घरांमधून मागून आणायचो. त्यांच्याकडेही तशीच परिस्थिती असूनही ते प्रेमाने मला द्यायचे. आजूबाजूच्या घरांमध्ये एखादा पदार्थ तयार होताना त्याचा सुहास दरवळला की, पाऊले नकळतपणे त्या दिशेने त्या घरातील स्वयंपाकघरापर्यंत पोहोचायची. काकी, मामी, मावशी, काकू, ताई… आज काय बनवलंय? पदार्थाच्या नावाबरोबर त्याची कृती तर त्या सांगायच्याच, पण अनेकदा त्यांच्या घरी पदार्थ तयार झाले की, त्या भरलेल्या वाट्या आमच्या घरी यायच्या. तेवढ्याच हक्काने व प्रेमाने मी बनवलेले पदार्थदेखील चाखण्यासाठी आवर्जून त्या वाटी भरून घेऊन जायच्या तेव्हा मला खूप आनंद व्हायचा.

पूर्वी चाळ संस्कृती असल्यामुळे कधीच परकेपणा जाणवला नाही. आपल्या घरात काही कमी पडतंय म्हणून बाजूच्या घरांमधून आपण मदत मागायचो किंवा आपण त्यांना मदत करायचो. आताचा काळ हा ऑनलाइनचा असल्यामुळे आपल्या बाजूच्या घरात कोण राहतंय, हेदेखील आपल्याला अनेकदा माहीत नसतं आणि माहीत असलं तरी आपण त्यांच्याकडे काही मागण्यासाठी लाजतो. हाच तर फरक आहे पूर्वीच्या चाळ संस्कृती आणि आजच्या फ्लॅट संस्कृतीमधला. पूर्वी फराळ करताना एकत्र जमून प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात एक पदार्थ हसत खेळत केला जायचा. त्यामुळे तो फराळ कितीही वेळखाऊ असला तरी सगळ्यांच्या एकत्रितपणामुळे झटपट तर व्हायचाच, पण तितकाच रुचकर बनायचा. पूर्वी स्वयंपाक करण्याची अजून एक पद्धत मी या सगळ्यांकडून शिकलो ती म्हणजे आपल्या घरातल्यांसाठी स्वयंपाक करताना अचानक आपल्याकडे कोणी आलं तर तो उपाशी परत जाऊ नये यासाठी दोन व्यक्तींचा स्वयंपाक नेहमी जास्त करावा, जेणेकरून आपल्या घरी कोणीही आलं तरी उपाशीपोटी परत जाऊ नये, तर आपण त्यांना प्रेमाने खाऊ घालून आनंद द्यावा.

सध्याच्या काळात आपल्या घरी अचानक पूर्वसूचना न देता कुणी आलं तर आपल्याला चालत नाही. जास्तीचा स्वयंपाक तर लांबचीच गोष्ट. त्यातून आपण स्वतसाठी तरी घरी स्वयंपाक करतो का? हेदेखील एक मोठं प्रश्नचिन्ह आहे? ‘मुलांना आवडत नाही’ या नावावर आपण अनेकदा बाहेरून पदार्थ मागवत असतो. ज्यामुळे आपलादेखील स्वयंपाक करण्याचा वेळ वाचतो, नाही का? पूर्वीही असेच असायचे, पण आजूबाजूच्या घरातील पदार्थांच्या वाट्या एकमेकांकडे येत-जात असल्यामुळे मुलांची चंगळ असायची. कारण त्यांना आपल्या घरी बनवलेल्या पदार्थाबरोबरच अनेक पदार्थ चाखायला मिळायचे. खाद्य संस्कृतीमध्ये पदार्थांनी भरलेल्या वाट्यांच्या देवाणघेवाणीमध्ये खूप महत्त्व आहे. कारण प्रेमाने बनवलेला पदार्थ जेव्हा आपण वाटीत भरतो तेव्हा त्या प्रेमाचा गोडवा त्या पदार्थात उतरतो व पदार्थ तितकाच रुचकर बनतो. अशी ही प्रेमाने बनवलेल्या पदार्थांची वाटी जेव्हा आपण एखाद्याच्या हाती सुपूर्द करतो तेव्हा ती स्वीकारताना त्यांच्या चेहऱयावरचा आनंद त्या बनवलेल्या पदार्थाची प्रेमाची खरी पोचपावती असते. चाळ संस्कृतीमध्ये लहानाचा मोठा झाल्यामुळे मला ‘वाट्यांची देवाणघेवाण’ ही संस्कृती अनुभवण्याचे भाग्य लाभले.

या स्वयंपाकघरातील खाद्य संस्कृतीमधील वाट्यांच्या देवाणघेवाणीबद्दलची माहिती, ज्यामुळे आपले संबंध दृढ होत असतात हे या पिढीपर्यंत पोहोचवणं व त्यांच्याकडून ते आचरणात आणणं हे आपलं कर्तव्य आहे. ते आपण निभावलंच पाहिजे, नाही का?

[email protected]
(ाsखक शेफ व युट्यूबर आहेत.)