भटकंती : सत्कृत्याची आदरांजली – दुर्योधन मंदिर

>> वर्षा चोपडे

दुर्योधन अत्यंत वाईट वृत्तीचा आणि षडयंत्री होता. त्याने पाच पांडवांना अपमानित करण्याची एकही संधी सोडली नाही. पण तो शूर, साहसी, हुशार, दयाळू आणि धैर्यवान राजा होता. दिलेल्या शब्दाला जागणारा होता. केरळमध्ये गावकऱयांनी आदर म्हणून त्याचे पोरुवाझी पेरुविरुथी मलानाडा मंदिर बांधले.

असे म्हणतात की, अमाप सत्कृत्ये करणाऱयाच्या पाठीशी देव असतो, पण थोडे सत्कृत्य केले तरी मनुष्याची पूजा केली जाते. सत्कर्माचे मोजमाप होते. दुर्योधनाची ही माहिती वाचली की, त्याची प्रचीती येते. महाभारत वाचले की जाणवते, दुर्योधन अत्यंत वाईट वृत्तीचा आणि षडयंत्री होता. शकुनीमामाच्या सल्ल्याने त्याने पाच पांडवांना अपमानित किंवा त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही. त्याला पिताश्री धृतराष्ट्राचा भक्कम आधार होता हेही खरे असले तरी तो शूर आणि साहसी होता हे मान्य करावेच लागेल. त्याने जे काही योग्य-अयोग्य निर्णय घेतले ते बघून असे वाटते की, तो खंबीर आणि निडर होता. जरी तो महाकाव्यातील सर्वात घृणास्पद पात्रांपैकी एक असला तरी तो एक हुशार, दयाळू आणि धैर्यवान मनुष्य असल्याचे जाणवते. कौंतेय पुत्र कर्णाला सूतपुत्र म्हणून हिणवले जायचे, त्या काळात सगळ्यांचा विरोध असूनही त्याने कर्णाला एका प्रांताचा राजा बनवले. त्याला अत्यंत आदर दिला. उदार कर्ण आपल्यासाठी जिवाची बाजी लावेल याची त्याला खात्री होती. कर्ण शूर असला तरी दुर्योधनाने त्याच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली हेही महत्त्वाचे. नाण्याच्या दोन बाजू असतात हेही सत्य आहे, पण दोन्ही बाजू मानवतेसाठी फायदेशीर आहेत का, याचाही विचार करणे गरजेचे आहे.

अशा या शूर दुर्योधनाचे केरळात सुंदर मंदिर आहे. आश्चर्य वाटले ना! पण जाणून घेऊया दुर्योधनाच्या पोरुवाझी पेरुविरुथी मलानाडा मंदिराबद्दल. ज्याला पेरुविरुथी मालनदा किंवा मलानाडा असेही म्हणतात. हे दुर्योधनाला समर्पित हिंदुस्थानातील एकमेव मंदिर आहे. केरळमधील कोल्लम जिह्यातील पोरुवाझी गावात वसलेले हे मंदिर नकारात्मक पद्धतीने चित्रित केलेल्या पात्राच्या चांगुलपणाचे प्रतीक आहे. दुर्योधन हा एक इर्षावान भाऊ होता, वहिनी द्रौपदीला आणि पांडवांना वाईट वागणूक देऊनही दुर्योधनामध्ये काही प्रशंसनीय गुण होते. पण ते केवळ त्याने स्वार्थापोटी वापरले असे महाभारत सांगते. काम, ाढाsध, मोह, मत्सर यांचे मिश्रण म्हणजे दुर्योधन. त्याने कधीही कुणाचीही पर्वा केली नाही. त्याला जे हवे ते तो करायचा. पुत्रप्रेमाने आंधळे झालेले त्याचे आईवडील त्याला बळ देत होते हेही खरे.

पांडव वनवासात असताना दुर्योधन त्यांना शोधण्यासाठी गेला होता अशी आख्यायिका आहे. केरळच्या दक्षिणेकडील जंगलात शोध घेत असताना आज जिथे मंदिर आहे त्या ठिकाणी पोहोचला. त्याला खूप तहान लागली आणि त्याने एका वृद्ध महिलेकडे थोडे पाणी मागितले. एका खालच्या जातीतील एका वृद्ध महिलेने त्याला ताडी फळाचे पाणी दिले. दुर्योधनाने ते पाणी बिनदिक्कतपणे घेतले. कारण तहानच तशी लागली होती आणि तो भेदभाव मानत नव्हता.

त्याच्या शाही पोशाखाकडे पाहून वृद्ध स्त्राrला तो कोणीतरी राजा असल्याचे समजले. आपल्यासारख्या अस्पृश्य स्त्राrने दिलेले पाणी दुर्योधनासारख्या राजाने प्यायले हे पाहून तिला वाईट वाटले, पण दुर्योधनाचा जाती व्यवस्थेवर कधीच विश्वास नव्हता. उलट त्याने त्या अस्पृश्य स्त्राrस समजावले आणि पाणी दिले त्याबद्दल आभार मानले, तिला नमस्कार केला. त्यानंतर त्या वृद्ध महिलेने दुर्योधनाचा आदर सत्कार केला. त्या अस्पृश्य वृद्धेच्या पाहुणचाराने तो खूपच प्रभावित झाला होता. मग त्या वृद्धेकडे त्याने भोजन केले आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो तेथे एका टेकडीवर बसला. त्याने गावात राहणाऱया लोकांच्या कल्याणासाठी भोलेनाथ शंकराची प्रार्थना केली. एवढेच नाही तर गावकऱयांना शेतजमीनही दिली. दुर्योधनाच्या दूताकडून मिळालेल्या सोने आणि पैसेरूपी दानाने हर्षित होऊन गावकऱयांनी दुर्योधनाचा जयजयकार केला. एकूण काय तर दुर्योधनाने गावकरी मंडळींच्या जीवनात आनंद निर्माण केला.

असे म्हणतात की, दुर्योधनाने कुरुक्षेत्राच्या युद्धात यश मिळाल्यास परत त्या गावात येण्याचे वचन गावकऱयांना दिले होते. कुरुक्षेत्राच्या युद्धात कौरवांचा पराभव झाला. दुर्योधन मारला गेला आणि पुन्हा भेटू शकला नाही, पण आपला शब्द पाळण्यासाठी दुर्योधन बांधील होता. एका रात्री गावातील एका वृद्धाने दुर्योधनाला स्वप्नात पाहिले. दुसऱया दिवशी सकाळी त्याला त्याच्या घरासमोर वडाचे रोप दिसले. त्या म्हाताऱयाने ते रोप लावले आणि तिथे पूजेची वेदी बांधली. त्यानंतर दुर्योधनाची पूजा सुरू झाली.

दुर्योधनाने ज्या ठिकाणी ध्यान केले होते त्याच ठिकाणी गावकऱयांनी आदर म्हणून पोरुवाझी पेरुविरुथी मलानाडा मंदिर बांधले. विशेष म्हणजे हे मंदिर दरवर्षी दुर्योधनाच्या नावावर मालमत्ता करदेखील भरते. यावरून गावकऱयांचे त्याच्याबद्दलचे प्रेम आणि आदर दिसून येतो. खरंतर मंदिराचे आजपर्यंतचे पुजारी कुरव समाजातून आलेले आहेत. या मंदिरात मूर्ती नाही. विशेष म्हणजे या मंदिरात इतर हिंदू मंदिरांप्रमाणे दुसऱयाही मूर्ती नाहीत. तुम्ही आत गेल्यास तुम्हाला मंडपम किंवा अल्थारा असे एक उंच व्यासपीठ मिळेल, जेथे भक्त प्रार्थना आणि ध्यान करतात. दगडी मंडपावरही भाविक उभे राहून प्रार्थना करू शकतात. अशा या दुर्योधन मंदिरात भक्त दुर्योधनाला रेशमी वस्त्र, ताडीची दारू किंवा मदिरा, मांसाहारी नैवेद्य व इतर वस्तू अर्पण करतात. यावरून असे दिसून येते की, त्याच्या सत्कृत्याचे स्थानिक लोक पिढय़ान्पिढय़ा आभार मानत आहेत.

लोक या दंतकथा सांगतात. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. यावरून वाचकांच्या एक गोष्ट लक्षात येईल की, वाईट विचाराचा असला तरी राजघराण्यातील व्यक्तीला प्रजा किती पूजनीय मानते. त्याने केलेले गुन्हे माफ करून त्याने केलेली मदत लक्षात ठेवून त्याची पूजा केली जाते. पांडव द्रौपदीबाबत चुकले, पण सकारात्मक विचार करणाऱया मुरली मनोहर कृष्णाचे भक्त होते. त्यामुळे पूर्वीही ते आदरणीय होते आणि आजही आदरणीय आहेत. केरळला आलात तर या मंदिरास नक्की भेट द्या.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)