
>> विद्या कुलकर्णी, [email protected]
आपल्या पिलांवर जीवापाड प्रेम करणारा हा झोळीवाला येशूचे प्रतीक मानतात…
झोळीवाला हे नाव ऐकताच त्याला पाहण्याची उत्कंठा वाढली व आपसूकच माझे पाय भरतपूरच्या दिशेने वळले! आपल्या झोळीदार चोचीने मासेमारी करून मत्स्यलोकांत दबदबा निर्माण केलेला पक्षी म्हणजे झोळीवाला. आकाराने हा गिधाडापेक्षा किंचित मोठा असतो. हा पक्षी मिळून मिसळून राहणारा असून आपल्या सवंगडय़ांवर अतिशय प्रेम करतो.
झोळीवाला या पक्ष्याच्या मादीला ‘आईच्या निःस्वार्थ प्रेमाचे’ द्योतक मानतात कारण दुष्काळामध्ये ती स्वतःच्या अंगाला टोचून आपल्या रक्ताने पिल्लांचे पोषण करते. पेलिकन पक्षी हा ख्रिश्चन धर्मामध्ये येशूचेही प्रतीक मानतात कारण त्याने स्वतःचे जीवन अर्पण करून लोकांचा उद्धार केला.
झोळीवाला हे सारे पक्षी पाशगल कुळातले आहेत. हे पक्षी आकाराने मोठे व बोजड असून पाय जाडे व बुटके असतात. पायाची बोटे पडद्यांनी जोडलेली असतात. प्रचंड मोठय़ा चोचीच्या खाली अन्न साठवण्यासाठी एक मोठी लवचिक पिशवी जोडलेली असते. हे पक्षी मोठे तलाव, सरोवरे, नद्या व समुद्रकिनाऱयांच्या ठिकाणी छाटय़ा समूहाने किंवा एकेकटे वावरताना दिसतात. हे पक्षी प्रचंड आकाराचे असले तरी त्यांची हाडे पोकळ असतात, त्यामुळे ते लांब अंतरापर्यंत उत्तम उडू शकतात. हवेतील प्रवाहावर आरूढ होऊन पंख न हलविता शांतपणे उंच आकाशात विहार करताना ते नेहमी आढळतात.
पांढरा झोळीवाला – प्रचंड मोठय़ा आकाराचा व अतिशय देखणा पक्षी असून गळ्यालगत फिक्कट पिवळी झोळी असते. पंखांचा पिसारा 226 – 360 सें.मी. इतका प्रचंड असून सर्व पक्ष्यांमध्ये हा मोठा आहे. नराचे वजन 11.45 किलो तर मादीचे 7.6 किलो असते. नराच्या मानेला बाक असतो, मादीची मान थोडी छोटी असते. पिसारा मुख्यतः पांढऱया शुभ्र रंगाचा असून त्याला काळी किनार असते. सर्वच अंगावर गुलाबीसर छटा असते. चोच राखाडी निळ्या रंगाची असून लालसर टोक असते. या पक्ष्यांचे डोळे तपकिरी लालसर व पाय पिवळ्या रंगाचे असतात. प्रजननाच्या काळात नराचा पिसारा जास्तच गुलाबी होतो व मादीचा रंग नारिंगी होतो. शिशूचा पिसारा तपकिरी व पांढऱया रंगाचा असतो
हे पक्षी आपल्याकडे मात्र हिवाळी पाहुणे म्हणून हजेरी लावतात. यावर्षी जवळ जवळ 20 वर्षांनी भरतपूर येथे बऱयाच संख्येने हे पक्षी आले आहेत. स्थलांतर नेहमीच भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते! हे जलपक्षी उडताना त्यांच्या उड्डाण पंखांवरील गडद काळय़ा किनारपट्टय़ांमुळे, व गुलाबी पायांमुळे फारच सुंदर दिसतात. उडताना ते त्यांची मान खेचून शरीराच्या जवळ घेतात.
या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ साधारण फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत असतो व बरेच वेळा ते कॉलनी करून एकत्र घरटी बांधून राहतात. मादी 1 ते 4 अंडी घालते. 29 ते 36 दिवसांपर्यंत अंडी उबवण्याचा कालावधी असतो. त्यानंतर एकत्रच 20-25 दिवस हे पक्षी पिल्लांची काळजी घेतात. 65 ते 75 दिवसांमध्ये त्यांची पूर्ण वाढ होते व त्यांना तपकिरी रंग चढतो. पिल्लांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या पक्ष्यांचा आकार मोठा असल्यामुळे घारी किंवा गिधाडे त्यांना मारू शकत नाहीत परंतु हे पक्षी एकत्र कॉलनी करून रहात असल्यामुळे कधी कधी रानटी जनावरांच्या दृष्टीस पडू शकतात व त्यांना धोका निर्माण होऊ शकतो.
डाल्मेशिअन झोळीवाला (Dalmation Pelican)
डाल्मेशिअन झोळीवाला हा पक्षी त्याच्या उड्डाण-पंखावरील काळसर किनारपट्टय़ाच्या अभावामुळे सहज ओळखू येतो. मानेवर कुरळी पिसे, राखाडी पाय व शुभ्र पांढरा पिसारा असे या पक्ष्याचे वर्णन करता येईल. हिवाळ्यात पिसारा थोडाफार तपकिरी-राखाडी व मुलायम होतो.
या पक्ष्यांचे वास्तव्य तलाव, नद्या, नाले येथे असते. त्यांची घरटी मात्र जमिनीपासून बऱयाच उंचीवर बांधलेली आढळतात.
हे पक्षी बहुतेक वेळा एकेकटेच दिसतात, किंवा क्वचितच 2-3 एकत्र वावरताना आढळतात. त्यांचे मुख्य खाणे मोठे मासे असून बरेच वेळा नंतर खाण्यासाठी आपल्या झोळीमध्ये साठवून ठेवतात!
या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ मार्च किंवा एप्रिलमध्ये असतो. एका वेळी मादी 1 – 6 अंडी देते. अंडयांचे वजन 120 – 195 ग्रॅम्स असते. नर व मादी अंडी विभागून त्यांची काळजी घेतात. 30 – 34 दिवसापर्यंत अंडी उबवतात. पिल्लांना जन्मतः पंख नसतात. ती 6-7 आठवडय़ांची झाली की पंख फुटू लागतात. पिल्ले 3 -4 महिन्यांची झाली की स्वतंत्र होतात.
पाणथळी पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी भरतपूर किंवा नळसरोवरला जाता येते. साधारण हिवाळ्यामध्ये स्थलांतरित पक्षी तेथे येतात. नाविकाबरोबर बोटीमध्ये बसून किंवा तळ्याशेजारून चालत चालत निळ्याशार आकाशात उडणाऱया या पक्ष्यांचे फोटो काढताना एक वेगळाच अनुभव येतो!
































































