
>> विद्या कुलकर्णी
रोहित पक्षी.. मुंबईचे हक्काचे पाहुणे.. त्यांना मुंबईशिवाय आणि मुंबईला त्यांच्याशिवाय करमत नाही…..
नाताळ सणासाठी नाताळबाबाच्या लालपांढऱया टोप्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत, त्यानिमित्त मीही गुलाबी, पांढऱया रंगातील रोहित पक्ष्यांची भेट घेऊन आलेली आहे. रोहित हे पाणथळी पक्षी असून एकूण सहा प्रजाती असून मोठा रोहित, लहान रोहित या दोन प्रजाती आफ्रिका, युरोप आणि आशिया आढळतात.
रोहित पक्षी त्यांच्या लांब मान, काठीसारखे पाय व गुलाबी किंवा लालसर पंखांमुळे चटकन ओळखू येतात. या पक्ष्यांनी ‘आपण जे खातो त्याप्रमाणे दिसतो’ या म्हणीला पूर्ण न्याय दिला आहे. त्यांच्या पंखांचा गुलाबी आणि लालसर रंग त्यांचे खाद्य ‘अपृष्ठवंशीय प्राणी व एकपेशीय वनस्पती’मधील रंगद्रव्ये (Carotenoid) यामुळे मिळाला आहे. हे पक्षी उडतात तेव्हा त्यांच्या पंखांची काळी किनार आणि आतील पंखांचा ज्वालेसारखा भडक गुलाबी रंग यामुळे त्यांना ‘अग्निपंखी’ असेही म्हणतात. ‘फ्लेमिंगो’ हे नाव पोर्तुगीज किंवा स्पॅनिश शब्द फ्लेमेन्गोवरून (ज्वालेचा रंग) आले आहे.
मोठा व लहान रोहित
नर व मादी सारखेच दिसतात. फक्त नर मादीपेक्षा उंच असतात. प्रजातीप्रमाणे या पक्ष्यांच्या पंखांचा रंग फिकट गुलाबी ते किरमिजी किंवा भडक लाल असतो. पिल्ले राखाडी किंवा पांढऱया रंगाची असतात. पाय त्यांच्या शरीराच्या लांबीपेक्षा जास्त असून पायाचा रंग नारिंगी किंवा गुलाबी-लाल असतो. या पक्ष्यांच्या पंज्याला तीन बोटे पुढील बाजूस तर एक बोट मागील बाजूस असते. बोटे पातळ पडद्यांनी जोडल्यामुळे हे पक्षी पाण्यात पोहू शकतात व त्यांना अन्न शोधताना पाणी ढवळण्यास सोपे जाते. मानेला 19 मणके असल्यामुळे हे पक्षी त्यांची मान कशीही वळवू शकतात. डोळे पिवळे असतात. पिल्लांचे डोळे पहिले एक वर्ष राखाडी रंगाचे असतात. जीभ लांब व मांसल असून त्यावर ब्रशसारखे केस असतात. त्याचा उपयोग अन्न तोंडात राहून पाणी गाळण्यास होतो. मोठय़ा रोहित पक्ष्यांची चोच गुलाबी रंगाची, लांब, जाडसर व खालील बाजूस वळलेली असून तिचे टोक काळ्या रंगाचे असते तर लहान रोहित पक्ष्यांच्या चोचीवर काळा रंग जास्त प्रमाणात असतो. चोचीचा खालील भाग मोठा व खोल, तर वरील भाग पातळ व सपाट असतो. तो झाकणाप्रमाणे काम करतो. चोचीच्या कडांना दाते असून ते गाळणीसारखे काम करतात.
बहुतांशी रोहित पक्षी हे कच्छच्या रणामधील रहिवासी आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा कच्छच्या रणामध्ये गुडघाभर उथळ पाणी असते अशा ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारून त्यात अंडी घालतात व पिल्लांना वाढवतात. पाणी व ऊन पुष्कळ असल्याने भरपूर खाद्य असते. त्यामुळे पिल्लांचे पालनपोषण चांगले होते. ज्या भागात रोहित पक्षी अंडी घालतात त्या भागाला कच्छमध्ये रोहित पक्ष्यांचे शहर म्हणतात.
हे पक्षी हिंदुस्थानात स्थानिक स्थलांतर करतात. पावसाळ्यानंतर कच्छमध्ये पाणी जेव्हा आटते तेव्हा रोहित पक्षी स्थानिक स्थलांतर करतात व देशभर पसरतात. महाराष्ट्रात दरवर्षी ऑक्टोबरपासून मे महिन्यापर्यंत हे पक्षी पाहायला मिळतात. सोलापूर जिह्यातील उजनी जलाशय हे स्थलांतरित रोहित पक्ष्यांच्या अन्नासाठी आणि निवाऱयासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या पक्ष्यांना पावसाची चाहूल 500 मीटर अंतरावरून लागते व त्याप्रमाणे आपली जागा निवडतात. हे पक्षी सामान्यतः एका पायावर उभे असतात. असे मानले जाते की, बराच वेळ पाण्यात असल्यामुळे आपले पाय गरम ठेवण्यासाठी ते पाय पंखात दुमडून ठेवतात. हे पक्षी हंसाप्रमाणे खोल आवाज देऊन एकमेकांशी संपर्क साधतात. प्रजननकाळात ते मोठय़ाने साद देतात, पण खाद्य शोधताना हळू आवाजात साद देतात.

























































