श्रीदत्तस्थान ‘माहूर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य
श्रीदत्तात्रेय हे संचारी दैवत असल्याने हिंदुस्थानातील अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर आहे. त्यामुळे या देशामध्ये अनेकानेक श्रीदत्तक्षेत्रे पाहवयास मिळतात. यातील अनेक श्रीदत्तक्षेत्रे ही तेथे स्थापित असलेल्या श्रीदत्तांच्या पूर्ण किंवा अंशावतारांमुळे प्रसिद्धीला आली आहेत. मराठवाड्याच्या नांदेड जिह्यातील किनवट तालुक्यामधील ‘माहूर’गडीच्या श्रीदत्तशिखरावर वसलेले श्रीदत्तात्रेय हे संचारी दैवतदेखील म्हणूनच प्रसिद्ध आहे.

हिंदू धर्मातील शास्त्र-विचार, पंचांग-माहात्म्य आणि कालगणनेनुसार, मार्गशीर्ष हा पुण्यपावन ‘मास’ अतिशय पुण्यप्रद ‘महिना’ म्हणून ओळखला जातो. अध्यात्ममार्गामध्ये श्रीदत्तसंप्रदायासाठी तर हा ‘उत्तमपर्वणी’ योग असतो. याच महिन्यात येणारी श्रीदत्तजयंती आणि थोर दत्तावतारी सत्पुरुष श्रीमाणिकप्रभू महाराज यांची जयंती व पुण्यतिथी श्रीदत्तसांप्रदायिक भक्तांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते.

कलियुगात भक्तोद्धार करण्याच्या हेतूने श्रीब्रह्मा, श्रीविष्णू आणि श्रीशिवमहेश्वर या त्रैमूर्ती श्रीदत्तात्रयांचा अवतार घेतला. अनसूयामातेचे सत्त्वहरण करण्याच्या हेतूने हे तिन्ही देव अतिथीवेष धारण करून अत्रीऋषींच्या अनुपस्थितीत त्यांच्या आश्रमी आले व त्यांनी भिक्षेसाठी पुकारा करताच अनसूया भिक्षा देण्यास गेली, मात्र ‘तू नग्न होऊन आम्हांस भिक्षा घालावी’ ही विचित्र अट त्रयमूर्तीने घातली. अनसूयेवर बिकट प्रसंग ओढवला. मात्र ती डगमगली नाही. तिने पतीचे अर्थात अत्रीऋषींचे स्मरण करून त्रयमूर्तींची इच्छा पूर्ण करण्याचे ठरविले, परंतु तोवर तिथे एक अद्भुत घडले. भिक्षेच्या हेतूने आलेल्या त्रयमूर्तींचे रूपांतर लहान बालकांमध्ये झाले. काही वेळाने अत्रीऋषी आश्रमात आले तेव्हा घडला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी अनसूयेला तिन्ही बालकांवर अभिमंत्रित जल शिंपडण्यास सांगितले. पतीआज्ञेनुसार अनसूयेने तसे करताच बालकांचे रूपांतर पुन्हा त्रयमूर्तीमध्ये झाले. अनसूयेने ‘आपण आमचे येथे पुत्ररूपाने राहावे’ अशी मातृसुलभ गळ घातली. तेव्हा त्रयमूर्तीने आपापला अंश बालकांमध्ये परावर्तित केला. श्रीब्रह्मा ‘चंद्र’ झाले. श्रीविष्णू ‘दत्त’ झाले व श्रीशंकर ‘दुर्वास’ झाले.

काही दिवसांनी चंद्र व दुर्वास अनसूयामातेला म्हणाले, ‘आम्ही दोघे तप करण्यासाठी जातो. तिसरा ‘दत्त’ येथे राहील, तोच आमच्या अंशरूपातील त्रयमूर्ती आहे असे समज.’ अनसूयेने अनुज्ञा दिल्याने चंद्र-दुर्वास तप करण्यास निघून गेले व त्रयमूर्ती दत्त आईवडिलांची सेवा करीत तेथेच राहिला. श्रीब्रह्मा व श्रीशंकराने आपापले दिव्यांश दत्ताठायी विलीन केल्याने श्रीदत्त हा अत्री-अनसूयेचा पुत्र, श्रीविष्णू अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय या रूपाने कायम राहिला. अत्री म्हणून आत्रेय आणि अत्री-अनसूयेला देवांनी दिला म्हणून यास ‘दत्त’ म्हणतात.

मराठवाड्याच्या नांदेड जिह्यातील किनवट तालुक्यामध्ये वसलेला ‘माहूर’गड परिसर या सर्व घटनांचा साक्षीदार आहे, कारण येथे असलेल्या श्रीदत्तशिखरावर श्रीदत्तात्रेय हे संचारी दैवत विश्रांतीसाठी येते असे सांगितले जाते. श्रीदेवीमातेच्या साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेल्या माहूरगडावर श्रीरेणुकामातेचे स्थान आहे. येथून जवळच अनसूयामातेचे मंदिर आहे. याच परिसरात अत्रिऋषींचा आश्रम होता. या शिखरावर आपल्याला अनसूयामातेचे मंदिर पाहवयास मिळते. श्रीदत्त पांचाळेश्वर येथे स्नान करतो, कोल्हापूर येथे भिक्षाटन करतो. सर्वत्र संचार करतो. मात्र दिवस मावळला की रात्री विश्रांतीकरिता तो मातृभेटीच्या ओढीने अनसूयामातेजवळ माहूरक्षेत्री येतो, अशी श्रद्धा सर्व श्रीदत्तसंप्रदायामध्ये प्रचलित आहे. ‘मातापूर’ वा ‘माहूर’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे पुण्यपावन स्थान पुराणोक्त आहे. ब्रह्मदेवांना सृष्टीची रचना करणे सुलभ व्हावे म्हणून श्रीविष्णू भगवंतांनी सात कोस लांबी-रुंदीचे हे क्षेत्र आधीच तयार करून ठेवले आणि पूर्वेचा हाटकेश्वर, पश्चिमेचा दर्दरेश्वर, उत्तरेचा सिद्धेश्वर-कापेश्वर व दक्षिणेचा विमलेश्वर हे क्षेत्रसंरक्षणार्थ चारही दिशांना उभे ठाकल्याचे सांगण्यात येते.

माहूरच्या तिन्ही बाजूंनी पैनगंगा नदी वाहते. देवांना त्रास देणाऱया लवणासुराला विष्णूंनी ‘लोणार’ क्षेत्रपरिसरात मारले तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवंतांचे चरण कमंडलूच्या पाण्याने धुतले. पुढे भगवंताच्या चरणतीर्थापासून वाहणारे पाण्याचे लोट नदीमध्ये रूपांतरित झाले ती प्रणिता अथवा प्राणहिता नदी म्हणजेच सध्याची ‘पैनगंगा’ होय. या परिसराचे ‘स्थानमाहात्म्य’ काशीक्षेत्रापेक्षाही अधिक असल्याचे सांगण्यात येते. म्हणूनच ‘माहूर’क्षेत्रास ‘जया आगळी काशी’ असे संबोधले जाते. जसा काशी येथे काळभैरव तसा माहूर येथे झंपटनाथ हा क्षेत्रपाल आहे.

माहूर येथील श्रीरेणुकामातेच्या स्थानापासून तीन मैलावर श्रीदत्तशिखर आहे. येथे श्रीदत्तात्रेय मंदिरात अनसुयेची मूर्ती स्थापित आहे. धुनीश्वर श्रीदत्तमंदिरात अखंड धुनी पाहवयास मिळते. अनेक दत्तसांप्रदायिक भक्त या धुनीतील भस्म कपाळावर फासतात, आपल्यासोबत बाळगतात किंवा घरात ठेवतात. श्रीदत्तात्रेयांच्या अखंड धुनीतील भस्म अतिशय प्रासादिक असल्याशी सांप्रदायिक भक्तांची धारणा आहे. श्रीदत्तशिखरावरील देवालयाची निर्मिती महंत मुपुंदभारती यांनी केली. माहूर येथे गेल्यावर काही दूर अंतरावरील शिखरांवर आपल्याला ही सर्व पावनस्थळे पाहवयास मिळतात. येथे जमदग्नी, रेणुका आणि परशुराम यांचेही वास्तव्य होते. येथील सर्व पातकांचा नाश करणारे मातृतीर्थ आहे. तिथून जवळच सर्वतीर्थ आहे. श्रीदत्तात्रय आणि परशुराम यांची प्रथम भेट घडली ते अमृतपुंडही पाहवयास मिळते.

‘माहूर’ हे नांदेडपासून 110 कि.मी. अंतरावर आहे. शेगाव येथूनही माहूर येथे जाण्यासाठी खासगी गाडय़ांची सोय उपलब्ध आहे. येथे श्रीदासोपंत, श्रीविष्णूदास महाराज आणि श्रीसाधूमहाराज यांना श्रीदत्तात्रेयांचा साक्षात्कार घडला होता. श्रीदत्तात्रेय महाप्रभू हे श्रीगुरूपरंपरेचे मूळ पीठ आहे. अवधूतवृत्तीचा पुरस्कार करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांचे कलियुगात चार अवतार झाल्याचे मानले जाते. प्रथमावतार श्रीपादश्रीवल्लभ (पिठापूर), द्वितीयावतार श्रीनृसिंहसरस्वती (लाड-कारंजा), तृतीयावतार श्रीमाणिकप्रभू (हुमणाबाद) आणि चतुर्थावतार श्रीस्वामीसमर्थ (अक्कलकोट) असल्याचे मानले जाते. या खेरीज अनेक अंशावतारांमध्ये श्रीदत्तात्रेयांची बीजे सापडतात.

श्रीदत्तात्रेय हे संचारी दैवत असल्याने हिंदुस्थानातील अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर आहे. त्यामुळे या देशामध्ये अनेकानेक श्रीदत्तक्षेत्रे पाहवयास मिळतात. यातील अनेक श्रीदत्तक्षेत्रे ही तेथे स्थापित असलेल्या श्रीदत्तांच्या पूर्ण किंवा अंशावतारांमुळे प्रसिद्धीला आली आहेत. ‘मार्गर्शीर्ष’ पुण्यप्रद महिन्याचे माहात्म्य लक्षात घेऊन त्यातील काही अलौकिक स्थानांचे ‘माहात्म्य’ पुढील काही लेखांद्वारे जाणून घेऊ.

[email protected]