>>विवेक दिगंबर वैद्य
‘स्वार्थसाधना करण्यापेक्षा देशसेवा करावी’ हा जाज्ज्वल्य विचार मांडणाऱया एका सिद्धसत्पुरुषाची ही ‘अपूर्व’ अवतारगाथा.
द्वारका, गणपती आणि महादेव यांच्यापाठी जन्मलेल्या सुपुत्राचे पाळण्यातले नाव ‘रामचंद्र’ असले तरीही त्याची ‘आप्पा’ या नावाची ओळख अखेरपावेतो कायम राहिली. सामायिक कुटुंब असल्याने जन्मदात्यांसोबतच आजोबा, चुलता-चुलती यांचेही प्रेम या भावंडांना मिळत होते. बालवयात नकळतपणे घडणारे संस्कार, घरातील उत्तम बाळबोध वळणामुळे अधिक दृढ झाले.
आप्पांची बहीण द्वारकाबाई लग्न होऊन रत्नागिरीजवळच्या ‘केळय़े’ गावी स्थायिक झाली. बंधू गणपतराव शिक्षण पूर्ण करून मुंबई येथे पोस्ट व तार खात्यात रुजू झाले. महादेव आणि आप्पा आईवडिलांच्या सहवासात होते. लौकिक शिक्षणासोबतच पोहणे, खेळणे, झाडावर चढणे हे बालसुलभ खेळ चालत असत तेव्हा त्या खेळांचे नेतृत्व आप्पांकडे येत असे. अनेकविध खेळांसोबतच विष्णुसहस्रनामाचे पाठ, प्रातः व सायंप्रार्थना, स्तोत्रपठण यांनाही त्यांच्या लेखी तितकेच महत्त्व होते.
आप्पा अभ्यासात प्रावीण्य राखून होते. शालेय शिक्षण घेत असतानाच संस्कृत पाठांचे अध्ययन, कीर्तन तसेच प्रवचन, श्रवण यांमध्ये आप्पांस विलक्षण रुची व गती होती. कोकणातील रीतीरिवाजांनुसार नवरात्रातील महालक्ष्मी उत्सवात घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होत असे, त्यात आप्पादेखील चिमुकली घागर घेऊन सहभागी होत असत. आप्पांचे आजोळ नजीकच्या ‘गोळप’ गावातील असल्याने सर्वांचे तेथे नित्याचे येणेजाणे होत असे. मामा केशवराव गोखले हे खानदानी आणि हौशी स्वभावाचे असल्यामुळे या लहानग्यांची फारच मौज असे. तेथेही, घरच्या देवांची यथासांग पूजा, नित्यनंदादीप, आरती-धुपारती असे साग्रसंगीत विधी नित्यनियमाने करण्यात येत असत.
आठव्या वर्षी मुंज झाल्यावर संध्या, स्तोत्रपाठादी नित्यकर्म आप्पा यथास्थित करीत असत. पुढे मराठी पाचव्या इयत्तेपर्यंतचा अभ्यास ‘पावस’च्या शाळेत केल्यावर पुढील शिक्षणाकरिता ते बंधू महादेवासोबत रत्नागिरीच्या नागू स्कूलमध्ये दाखल झाले. शिक्षणाच्या निमित्ताने झालेला शहरी वातावरणाचा परिचय पुढे आप्पांच्या मनावर वैचारिक प्रबोधनाचे महत्त्व ठसविणारा झाला. शाळेतील वातावरणदेखील त्यास पोषक असेच होते. येथे पुण्या-मुंबईची वृत्तपत्रे येत असत, येथील वाचनालयात विविध विषयांवरील ग्रंथ सहजगत्या उपलब्ध होत असत, याकारणाने आप्पांमध्ये मुळातच असलेली वाचनाची गोडी येथील वास्तव्यादरम्यान अधिकच वृद्धिंगत झाली.
दरम्यान, आप्पांच्या हाती ‘केसरी’ वृत्तपत्र आले. समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ‘केसरी’ वृत्तपत्र आणि लोकमान्य टिळकांचा जाज्ज्वल्य देशाभिमान तरुण पिढीकरिता आदर्शवत होता. आप्पांचा कल लोकमान्यांकडे आकर्षित झाला. आप्पांसोबत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी मित्रदेखील समविचारी असल्याकारणाने, ‘देशाच्या स्वातंत्र्यार्थ आपल्याला काय करता येईल, कशाप्रकारचे योगदान देता येईल’ याची चर्चा त्यांच्यामध्ये चालत असे. या देशभक्तीने भारलेल्या वातावरणाचा प्रभाव आणि मूळचा स्वभाव यामुळे आप्पांचे वर्तन अतिशय नेमस्त बनले. आक्रस्ताळेपणा, बेफिकिरी, मस्तमौला वृत्ती यांसारखी शरीरमाध्यमातून प्रकट होणारी तरुणाईची ‘रग’ आप्पांच्या देहबोलीतून जाणवत नसली तरीही वैचारिक भूमिकेतून प्रगल्भपणे व्यक्त होण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होत होती, आणि त्यास परिपूर्णता बहाल करण्यासाठी जी संधी त्यांना लाभली,
रत्नागिरीमध्ये इंग्रजी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर आप्पा सुट्टीमध्ये ‘पावस’ येथे आले. त्यांनी पुढील शिक्षणाकरिता मुंबईस निघून यावे अशी त्यांचे बंधू गणपतराव यांची इच्छा होती. घरातील मंडळी त्यांच्या विचारांस अनुकूल नसली तरीदेखील आप्पांची हुशारी जाणून असल्यामुळे त्याच्या बुद्धीचा कस मुंबईतील शिक्षणामध्ये लागेल याची बंधूंना खात्री होती. त्यांनी घरच्या मंडळींचे मन वळविले आणि सन 1919 मध्ये आप्पा मुंबईच्या ग्रँटरोड परिसरातील शास्त्राr हॉल येथे आनंदी चाळीत दाखल झाले. बंधूंच्या घरी वास्तव्य करण्याचे ठरले, आणि पुढे आंग्रेवाडीतील ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात आप्पांचे नाव दाखल करण्यात आले.
मुंबईचे वास्तव्य आप्पांकरिता खऱया अर्थाने फलदायी ठरले. शाळेमध्ये लौकिक शिक्षणासोबत धर्मशिक्षणही दिले जात असे. घारपुरे नावाचे तपोवृद्ध व अनुभवी शिक्षक संस्कृत आणि बीजगणित हे दोन विषय शिकवीत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पांना ‘गीतारहस्य’ आणि ‘ज्ञानेश्वरी’ या महत्त्वपूर्ण ग्रंथांचा अभ्यास करता आला. यातूनच आप्पांच्या मनात भगवद्गीता-ज्ञानेश्वरीविषयीची अपार ओढ व गोडी निर्माण झाली. त्यासोबत शेजारच्या द्वारका चाळीत राहणारे त्यांचे मामा केशवराव गोखले यांच्यामुळे त्यांना पारमार्थिक मार्गदर्शनही लाभले.
दरम्यान, संपूर्ण भारतात स्वातंत्र्य चळवळीचे वारे जोरदार वाहत होते. गल्लोगल्ली प्रचारफेऱया निघत होत्या. मुंबई शहर या चळवळीमध्ये अग्रस्थानी होते. लोकमान्यांचे असामान्य कर्तृत्व, तेजस्वी व्यक्तिमत्त्व, ओघवते दाहक वक्तृत्व आणि ‘केसरी’ वृत्तपत्रातून प्रकाशित होणारे अमोघ विचार यांनी जनसामान्यांचे विचारविश्व ढवळून काढले होते. त्या सर्वांचा एकत्रित परिणाम आप्पांच्या संवेदनशील मनावरही झाला. मात्र अशातच एके दिवशी ती दुर्दैवी घटना घडली. 1 ऑगस्ट 1920 हा दिवस स्वातंत्र्याच्या लढय़ावर औदासिन्याची वाकळ पांघरता झाला.
लोकमान्यांच्या जाण्याने अवघे समाजमन हळहळले. त्यांच्या अंत्ययात्रेला लोकांचा महापूर लोटला होता. आप्पांचे मन विदीर्ण करणारे हे दृश्य त्यांच्या पुढील कार्याचा मार्ग सुनिश्चित करते झाले. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होण्याकरिता सरकारी शाळेचा त्याग करून आप्पा राष्ट्रीय शाळेत दाखल झाले आणि मार्च 1922 मध्ये परीक्षा दिल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा बेत रहित केला. ‘स्वार्थसाधना करण्यापेक्षा देशसेवा करावी’ असा विचार करुन ‘राष्ट्रीय पाठशाळा आणि स्वावलंबनाश्रम काढावा’ असे आप्पांनी ठरविले. लोकमान्यांची राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आप्पा ‘पावस’ येथे कायमचे परतले. रामचंद्र विष्णुपंत गोडबोले तथा ‘आप्पा’ या ध्येयनिष्ठ अन् विरक्त तरुणाची ओळख ‘स्वामी स्वरुपानंद‘ या संबोधनाने सर्वत्र दृढ व्हावी हा नियतीचा ‘अपूर्व’ खेळ होता.
(पूर्वार्ध)





























































