श्रीब्रह्मचैतन्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

नामस्मरणाचा ‘ध्यास’ घेतलेल्या गणपतीचा ‘ब्रह्मचैतन्य’ होण्यापर्यंतच्या प्रवासाचा उलगडणारा हा लेख.

गीताबाईंच्या मनांत दासबोध श्रवण करण्याची उत्कट इच्छा जागृत झाली. त्यास अनुसरून रावजीपंतांनी म्हासुर्णेकर शास्त्राrबोवांकडून दासबोधाचे पारायण व पुराण करविले. दरम्यान, गीताबाई सज्जनगडास जाऊन श्रीसमर्थांच्या समाधीचे दर्शनही घेऊन आल्या. त्यांची वृत्ती प्रसन्न राहू लागली, मुखावर तेज विलसू लागले. बसल्या ठिकाणी गीताबाईंना तंद्री लागत असे, अनेकदा कानात अवचितरीत्या धीरगंभीर स्वरांत ‘राम’नाम ऐकू येत असे. दरम्यान, एकदा पंतांच्या घरी एक बैरागी वस्तीस आला. त्या विलक्षण तेजस्वी बैराग्याने आठवा महिना सरत असतानाच्या गर्भारावस्थेतील गीताबाईंना नमस्कार केला आणि त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. या व अशा अनेक घटना येऊ घातलेल्या संततीचे शुभवर्तमान सुचवू पाहात होत्या हे एव्हाना मातेसह घरातील सर्वच मंडळींना कळून चुकले होते.

शके 1766. माघ मासातील शुद्ध एकादशी. गीताबाईंनी नित्यनेमानुसार मळ्यातल्या विठोबाची षोडशोपचारे पूजा केली. सर्वांना तीर्थप्रसाद दिला आणि अन्य सर्वांचा फराळ झाला अथवा नाही याची खातरजमा करून थोडासा फलाहार केला आणि अंमळ विश्रांतीसाठी त्या अंग टेकत्या झाल्या. तिन्हीसांजेची वेळ सरली तशी गीताबाईंना प्रसूतीचे वेध लागले. बाहेर मळ्यातील विठ्ठलासमोर कीर्तन चालू होते. प्रसूतीच्या कळा बेजार करीत असतानाही गीताबाईंच्या मुखावर मात्र प्रसन्नता विलसत होती. श्वासागणिक नामस्मरणाचा आवेग वाढत होता त्याचवेळी मळ्यामध्ये विठ्ठलभजनाचा कल्लोळही वाढता झाला. पहाटे भजन संपले. पांडुरंगाची आरती सुरू झाली आणि येथे उजाडत्या बुधवारी, माघ शुद्ध द्वादशीचा मुहूर्त साधत उगवत्या सूर्यनारायणाला साक्षी ठेवून गोंदावले येथे ‘ब्रह्मचैतन्य’ साक्षात अवतरले.

लिंगोपंतांनी नातवाचे बारसे धामधुमीत केले. सर्वत्र अन्नदान झाले. गुटगुटीत देहाच्या गोऱयागोमटय़ा बाळाचे नामकरण ‘गणपती’ असे करण्यात आले. नवजात अर्भकास चार महिन्यांच्या बाळाची देहयष्टी लाभली होती. पाहणाऱयाचे लक्ष आकर्षून घेणारा पिवळसर गौर वर्ण, गोल-घट्ट दंड व पिंढऱया, भव्य कपाळ, तेजस्वी डोळे अन् डोक्यावरील घनदाट केस यामुळे अल्पावधीत बाळाने गोंदावले ग्रामस्थांना वेड लावून आपलेसे केले. विरक्तावस्थेतील रावजीपंतांनादेखील बाळाला पाहण्याची ओढ लागत असे. ‘याला पाहिले की मनाचे समाधान होते’ असे रावजीपंत सांगत असत. चपळता, चांचल्य लाभलेल्या गणपतीची दांडगाई गीताबाईंचे परिश्रम अनेकदा वाढवीत असली तरीही त्यांचे पुत्राविषयीचे प्रेम त्यामुळे अधिकच दृढ आणि घट्ट होऊ लागले. बाळाला जरा खाली सोडले की त्याचे हातून अशा काही खोडय़ा घडत की गीताबाईंना कायम त्यास कडेवर घेऊन फिरावे लागे. घरातील सर्व कामे गणपतीला कडेवर घेऊनच करावी लागत.

बाळ मोठा होऊ लागला. विठोबाच्या मंदिरात भजन सुरू झाली की तिथेच रमू लागला. या काळात त्यांचे हट्ट पुरविण्याचा मक्ता त्याच्या आजीआजोबांनी घेतला होता. गणपती चार वर्षांचा झाला तेव्हा लिंगोपंतांनी त्यास धुळाक्षरे काढण्यास शिकविले. गणपतीने दिवसभरात शिकविलेले सारे काही चोख लक्षात ठेवले इतकेच नाही तर, एकदा रात्री निजतांना आजोबांनी म्हटलेला भगवद्गीतेतील ‘अनन्याश्चिन्तयंतो माम्’ हा श्लोक गणपतीने जसाच्या तसा म्हणून दाखविला. गणपतीची बुद्धी अतिशय तल्लख होती तसेच ग्रहणक्षमता आणि आकलनशक्तीदेखील अचंबित करणारी होती त्यामुळे, बालवयात घडणारे सुसंस्कार, मार्गदर्शन व शिकवण आत्मसात करण्यास गणपतीला वेळ लागला नाही. बालवयात लाभलेली अध्यात्माची ‘मुळी’ गणपतीच्या मनांत खोलवर रुजल्याने आणि दृढ झाल्याने पुढे त्याच्यामधील अध्यात्मप्रेमाचा वृक्ष लक्षपटीने बहरला अन् सर्वदूर फोफावलादेखील.

गणपतीमधील समज आणि दृष्टिकोन पारखून घेण्याच्या उद्देशाने एकदा लिंगोपंतआजोबांनी त्यास विचारले, ‘अरे गणू, मी तुला हंडा भरून सुवर्णमोहरा दिल्या तर तू काय करशील?’ त्यावर गणपती चटदिशी म्हणाला, ‘मी त्या मोहरा दीनदुबळे, आंधळे-पांगळे, रोगी, भिकारी यांना वाटेन.’ त्यावर आजोबांनी दुसरा प्रश्न विचारला की ‘गणू, मी जर तुला राजा केले तर तू काय करशील?’ त्यावरदेखील गणपती चटकन उत्तर देता झाला की, ‘माझ्या राज्यात एकही माणूस उपाशी राहणार नाही. कुणीही भिकारी व लाचार नसेल. माझ्या दारी मी अन्नछत्र घालीन.’ गणपतीचे बोलणे ऐकून लिंगोपंतांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ते रावजीपंतांना म्हणाले, ‘श्रीपांडुरंगाच्या कृपेने आपणांस लाभलेली ही ‘अमृतवल्ली’ आहे. हा कुणीतरी मोठा योगश्रेष्ठ पुरुष असावा असे मला वाटते.’

वयाच्या सहाव्या वर्षी गणपती एकटाच नदीकिनारी जात असे व तेथे ध्यानधारणा करीत असे. पुढे कालानुरूप वयाच्या आठव्या वर्षी त्याचे मौंजीबंधन झाले. मुंज झाल्यानंतर गणपतीने गुरुजींकडून सर्व विद्या आत्मसात केल्या मात्र वेद व शास्त्राभ्यासाला किमान 12 वर्षे लागतील हे समजल्यानंतर तो ताडकन म्हणाला, ‘एवढा वेळ आहे कुणाला?’ गणपतीला बालपणापासून प्रभू रामचंद्रांविषयी विलक्षण ओढ होती. कालांतराने ‘श्रीराम’ हेच त्याचे ‘आराध्य’ दैवत झाले. बराचसा काळ ‘राम’नामात व्यग्र राहणाऱया गणपतीला पुढे ‘सद्गुरू प्राप्त केल्याशिवाय भगवंताचे दर्शन नाही’ असा साक्षात्कार घडला आणि ‘सद्गुरू’शोध घेण्याची प्रबळ इच्छा त्याच्या मनात जागृत झाली.

दरम्यान, जनरीतीनुसार वयाच्या बाराव्या वर्षी गणपतीचा विवाह ‘खातवळ’ गावच्या गोडसेंच्या घरातील ‘सरस्वती’ या मुलीशी झाला. विवाहसोहळा धामधुमीत पार पडला. पुढे नातवाच्या लग्नामुळे सुखावलेले आजीआजोबांचे हृदय चारेक महिन्यांत कायमचे शांत झाले. याच कालावधीमध्ये गृहस्थाश्रमी झाल्यावरदेखील, गणपतीच्या मनातील ‘सद्गुरू’चा शोध घेण्याची तळमळ पुन्हा जोर धरती झाली आणि याचीच परिणती म्हणून गणपतीने गुरुप्राप्तीसाठी भटकंतीचा मार्ग स्वीकारला. या अविश्रांत पदयात्रेमध्ये अनेक गावे मागे पडली. अनेक सिद्धसत्पुरुषांच्या भेटीगाठी घडल्या. हरिपूरच्या राधाबाई, आण्णाबुवा मिरजकर, सटाण्याचे यशवंतराव भोसेकर अर्थात ‘देवमामलेदार’ आदी सत्पुरुषांच्या जिव्हाळ्याच्या भेटी घडल्या असल्या तरीही गणपतीची ‘सद्गुरू’चा शोध घेण्याची मनीषा मात्र अपूर्णच राहिली.

अशातच, एकेदिवशी गणपती अक्कलकोट येथे पोहोचला. तेथील थोर सत्पुरुष श्रीस्वामीसमर्थ महाराजांनी गणपतीचे स्वागत मोठय़ा प्रेमाने केले. गणपतीस आपल्या मांडीवर बसवून त्यांनी डाळिंबाचे दाणे खाऊ घातले, कौतुकाने मस्तक कुरवाळले आणि ‘तुझ्या सद्गुरू पदाचे कार्य माझेपाशी नाही, योग्य वेळ येताच तुझा मार्गदर्शक सद्गुरू तुला भेटेल बरे!’ असे सांगून आश्वस्तही केले.

(पूर्वार्ध)
– [email protected]