
>> विवेक दिगंबर वैद्य
समाजकारण हेच धर्मकारण मानणाऱया एका कर्मयोगी सत्पुरुषाबद्दल, श्रीगाडगेबाबा यांच्याबद्दलचा हा लेख.
अंजनगाव सुर्जीनजीकच्या (विदर्भ) कोते गावातील झिंग्राजीचे लग्न पूर्णाकाठच्या दापुरे गावातील हंबीरराव कोळसकरांच्या मुलीशी, सखूबाईशी थाटामाटात पार पडले. लग्नसोहळा असल्याने कोंबडय़ा, बकऱया मारल्या गेल्या. दारूचे पाट वाहिले. नात्यागोत्यातील सर्वांची मने तृप्त करून सखूबाई आणि झिंग्राजीचा जोडा संसारात रमला. काही महिन्यांत सखूबाई पोटुशी राहिली. ‘धनाची पेटी’ जन्माला आली. मुलगी झाल्याच्या आनंदात पुन्हा दारू-मटनाचा कार्यक्रम रंगला. मात्र दुर्दैवाने नवजात पोर लवकरच देवाघरी गेली.
लेकीच्या जाण्यामुळे दुःखी झालेल्या कुटुंबाने देवाचा कोप घालविण्यासाठी कोंबडय़ा-बकऱयांचे बळी दिले. देव पावला. सखूबाईच्या पोटी गोरागोमटा पोर जन्माला आला. पुन्हा दारू-मटनाचा कार्यक्रम जोरदार रंगला. बकऱयाच्या मानेवरून कचकचा सुरी फिरली. दारूचे पाट वाहिले आणि सगेसोयरे तृप्त झाले. जन्मलेलं पोर गोरंगोमटं, झकास नि तरतरीत होतं. त्याला सगळे ‘डेबू’ म्हणू लागले.
झिंग्राजीचा धंदा परिटाचा, पण गेल्या काही दिवसांपासून त्याचे कामावरून लक्ष उडाले होते. सखूबाई काबाडकष्ट करीत राहिली, पण तिने माहेराकडे कधी तोंड वेंगाडले नाही की कुणाकडे कधी हात पसरले नाहीत. सखूबाईच्या मेहनतीचा पैसा झिंग्राजी दारूत बुडवू लागला. एके दिवशी झिंग्राजीचे वागणे हाताबाहेर गेले. शेवटची घरघर लागली तशी उपरती झालेला झिंग्राजी सखूबाईला जवळ बोलावून म्हणाला, ‘‘मी तुला अन् डेबूला लई त्रास दिला. दारूच्या नशेत वाट्टेल तसा वागलो. व्यसनाने माझी हालत केली. सखू माझं ऐक. डेबूला सांभाळ. त्याला दारूचं व्यसन लागू देऊ नगंस. देवदेवस्कीच्या मागं भरकटू देऊ नगंस.’’ झिंग्राजी भरल्या संसारातून उठून चालता झाला आणि त्याने मागे ठेवलेल्या दुःखाचे चार घास गिळून सखूबाई डेबूच्या भवितव्याचा विचार करीत दिवस ढकलू लागली.
सखूबाईच्या संसाराचा डाव अर्ध्यावर मोडला हे पाहून तिचा भाऊ चंद्रभानजी मायलेकांना घेऊन घरी आला. सखूबाईने आल्या आल्या स्वतःला कामाच्या रगाडय़ास जुंपून घेतले. मायलेकांचा भार माहेरच्यांवर पडू नये यासाठी ती धडपड करीत होती. छोटय़ा डेबूला आईचे मन आणि वागणे कळत होते. तोही जमेल तितके काबाडकष्ट करू लागला. त्याला अवतीभवतीच्या बायका गाणं गात ते विलक्षण आवडत असे. तोदेखील काम करताना गाणे गात असे. पुढे त्याच्या या सुरेल गात्या गळ्याची प्रसिद्धी इतकी झाली की, पंचक्रोशीतील भजन मंडळी डेबूला आपल्यासोबत भजन-कीर्तनास नेऊ लागली, आवर्जून साथसोबतीला घेऊ लागली.
डेबूचे वय वाढत होते. अवतीभवतीचा समाज, लोकांची आळशी वृत्ती, देवदेवस्की, गावात येणाऱया रोगराईच्या साथी, त्यातून बाहेर पडण्यासाठी कोंबडय़ा-बकऱयांचे बळी देणे, श्रमपरिहाराच्या नावाखाली दारूचे सेवन या गोष्टी त्याला खटकू लागल्या. माणसाचे फिरून एकदा जनावरात होणारे रूपांतर त्याच्या नजरेला खुपू लागले. डेबू वयात आला तशी त्याच्या मनातला विखार धगधगू लागला. डेबू त्याच्या कामात कधीही कुचराई करीत नसे. लांडीलबाडी आणि चोरी-फसवणूक याचा त्याला तिटकारा होता. शेतीची कामे करणे, गुरेढोरे सांभाळणे, घरचे व्यवहार पाहणे यात तो तरबेज झाला. यातूनच त्याने सावकाराच्या घशात गेलेली चंद्रभानमामाची जमीन परत मिळवली. मामाने भाच्याचे कवतिक केले. बापावेगळा पोर आईच्या साथसोबतीने कर्तासवरता झाला आणि अचानक…
कुणासही न सांगतासवरता रात्रीच्या वेळी डेबू घरातून नाहीसा झाला आणि तब्बल बारा वर्षे अज्ञातवासात राहिला. हा अज्ञातवास अरण्यात किंवा जंगलात नव्हता तर हाडामासांच्या, जित्या-जागत्यांच्या दुनियेतला होता. अनोळखी गावांत जाऊन तेथील रस्ते, चौक झाडून स्वच्छ करावेत. झाडलोट केल्यावर कुणी भाकर दिल्यास खावी हा त्याचा दिनक्रम असे. देहावरील फाटक्यातुटक्या वस्त्रांकडे दुर्लक्ष करून गावोगावी स्वच्छतेची मोहीम राबविणाऱया डेबूजीच्या वाटय़ाला लोकांकडून मात्र केवळ उपेक्षा आणि हेटाळणीच आली.
मात्र डेबूजीला त्याची पर्वा नव्हती. त्याला त्रास होत असे तो मानवी स्वभावाचा. दारूच्या आहारी गेलेले, नवस फेडण्याच्या नावाखाली जनावरांचे जीव घेणारे, गावभर उकिरडा माजविणारे, पोराबाळांना शिक्षणापासून वंचित ठेवणारे त्याचे शत्रू होते. म्हणून त्याने या सामाजिक शत्रूंविरुद्ध जनजागृतीचे शस्त्र उगारले. डेबू ज्या गावी जात असे तिथे तो सर्वप्रथम वेशीपासून सुरुवात करून सर्व गाव झाडून पुसून लख्ख करीत असे. रात्री थकले भागलेले जीव पारावर गप्पा मारावयास बसले की, डेबूजी तिथे भजन करीत असे आणि भजनातून गावकऱयांना स्वच्छता आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असे. दारूबाजी बंद करण्यासाठी आवाहन करीत असे. सावकारांच्या अन्यायी पिळवणुकीच्या विरोधात उभे राहण्यास सांगत असे. प्रत्येक गावामध्ये जाऊन डेबूजी समाज प्रबोधनाची चळवळ चालवीत असे.
डेबूजीच्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला. गावकऱयांना त्याचे विचार पटू लागले. अंगावर चिंध्या झालेली गोधडी आणि हातामध्ये फुटक्या गाडग्याची खापरी डेबूजीला ‘गाडगेबाबा’ हे नाव देती झाली. याच गाडगेबाबांच्या शब्दाला पुढे जणू दिव्यत्वाचा स्पर्श झाला आणि अनेक धनिकांनी गाडगेबाबांच्या विनंतीवरून त्यांच्या फुटक्या गाडग्यामध्ये हजारो, लाखो रुपयांचे दान दिले. त्यातून गाडगेबाबांनी धर्मशाळा बांधल्या, अपंगांसाठी सदावर्ते चालविली. शाळा, वृद्धाश्रम, गोरक्षण केंद्रे आदी जनकल्याणाची कामे केली. पाण्याचे हौद बांधले. नद्यांना घाट बांधून दिले. वसतिगृहे उभी केली. समाजातील दुर्बल, अशिक्षित, मागासलेल्या कुटुंबासाठी स्वावलंबनाचा मार्ग दाखविला.
पाखंडाच्या मागे पायताण घेऊन धावणाऱया गाडगेबाबांनी कधी कुणाला अंगारा दिला नाही, हवेतून उदी काढली नाही, धूप-धुपारे घातले नाही, तरीही ते परिपूर्ण संत होते. कारण त्यांनी संततत्त्व जाणले होते. संतांची सर्व लक्षणे त्यांच्या ठायी एकवटलेली होती. हाती फुटलेले गाडगे, डोक्यावर चिंध्या झालेला रुमाल, फाटकी बाराबंदी, जीर्ण धोतर, झिजलेल्या वहाणा घातलेल्या त्या स्थूल देहाच्या सत्पुरुषाने हातात खराटा घेऊन लोकांच्या मनावर चढलेली अंधश्रद्धेची आणि भ्रामक समजुतींची जळमटे स्वच्छ केली. उभे आयुष्य रस्त्यावर काढणाऱया या फकिराने ‘आपण हॉस्पिटलच्या खाटेवर मरणार नाही, तर रस्त्यावरच मरू’ हे भाकीतही खरे करून दाखवले. पायवाटेवरील धूलिकणांमध्ये सुवर्णतत्त्वाचे बीज रोवणारा हा ‘महामानव’ भरल्या रस्त्यावरून अज्ञाताच्या दिशेकडे निघाला, तोही अवचितपणे. मागे राहिली ती धुळीच्या पट्टय़ावर उमटलेली त्यांची पावले आणि ‘देवकीनंदन गोपाला’ हे शब्द!




























































