दिल्ली डायरी – अमृतकाल में अमृतपालः नेमके काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी  

अमृतसरमध्ये ‘जी-20’च्या निमित्ताने तालेवार विदेशी पाहुणे मंडळी आलेली असताना केंद्रीय सरकार आणि अमृतपालसिंग यांच्यात ‘पकडो.. पकडो’चा खेळ सुरू झाला आहे. ‘अमृतपाल’ हा देशापुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे, असे वातावरण निर्माण केले जात आहे.  राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अमृतपालच्या मुसक्या आवळल्या जाणे निःसंशय गरजेचेच आहे. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेत घुसलेल्या ‘अमृतपालां’ना वाचविण्यासाठी हा खेळ खेळला जात आहे.

अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करा, या विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष व्हावे आणि अदानी प्रकरणाचे ‘पर्सेप्शन’ बदलून जावे यासाठी दिल्लीकर मंडळींनी सुरुवातीला राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या विधानाबद्दल काहूर माजवले. एरवी राहुल गांधींना खिजगणतीतही न धरणारे सत्ताधारी ‘राहुल गांधी माफी मागों’ म्हणत घसा कोरडा करत आहेत. इतका घसा कोरडा होऊनही अदानी प्रकरणात काहीतरी काळेबेरे झाले आहे ही जनभावना प्रबळ होत असल्यानेच ‘अमृतकाला’चा हवाला देत अमृतपालचा अचानक उदय झाला आहे. खलिस्तानी चळवळ देशासाठी घातक आहे आणि ती ठेचूनच काढायला हवी. मात्र अदानी प्रकरण आणि अमृतपालचा उदय यांचा परस्पर संबंध लक्षात आला की, देशाचा ‘अमृतकाल’ कसा सुरू आहे हे लक्षात येईल.

‘जी-20’च्या निमित्ताने आपला देश जगाचे नेतृत्व करू शकतो हे विदेशी पाहुण्यांच्या मनावर ठसविण्याची नामी संधी आपल्याकडे आहे. अमृतसरमध्ये ही विदेशी मंडळी गोळा झालेली असताना जालंधर व मोगाच्या पोलिसांनी खलिस्तानवादी अमृतपालला पकडण्यासाठी जी धरपकड केली आणि त्याद्वारे जी विदेशी मंडळींनी पोलिसी मेहमाननवाजी अनुभवली, त्याला तोड नाही! वास्तविक, अमृतपालच्या मुसक्या आवळा, अशी मागणी करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले होते. त्यानंतरच ‘अमृतकाला’मध्ये अमृतपालचा उदय झाला आहे. अदानी प्रकरणात आम आदमी पार्टीचा आवाज संसदेत आणि बाहेरही क्षीण झालेला आहे हे लक्षात घेतले तर या प्रकरणातील ‘मिलीभगत’ लक्षात येईल. शेतकरी आंदोलन हे खलिस्तानप्रणीत होते असा भाजपचा दावा होता आणि आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर हल्ला करण्यापर्यंतची मजल तथाकथित आंदोलकांनी मारली होती व त्यामागे खलिस्तानची फूस होती, असेही बोलले गेले. आता त्या घटनेला बराच काळ झाला. या मोठय़ा कालखंडात खलिस्तानींना फरफटत आणणे अमित शहांसारख्या कणखर गृहमंत्र्यांना अशक्य नव्हते. मात्र, कदाचित ते ‘टायमिंग’ची वाट पाहत असावेत असे एकंदर घटनाक्रमावरून दिसून येते. देशाच्या तिजोरीला चुना लावणारे अनेक ‘अमृतपाल’ असताना त्यांना राजकीय अभय देण्यासाठीच खलिस्तानी अमृतपालला प्रकाशझोतात आणले जात आहे. आता खलिस्तानवादी अमृतपालला ‘पकडो पकडो’ असा ‘नुरा कुस्ती’चा खेळ सुरू झाला आहे. कर्नाटकासह काही महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत हा खेळ अधिकच तेजीत येईल. त्यानंतर मामला थंड पडेल. मात्र या सगळ्या गदारोळात हिंडेनबर्ग अहवालावरची धूळ वाढत जाईल. त्यासाठी मोदी सरकारला अधूनमधून अशा ‘अमृतपालां’ची गरज पडणारच आहे. हाच देशाचा ‘अमृतकाल’ आहे!

भाजपमधील खांदेपालट

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरात तयारी सुरू केली आहे. राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजेंना ‘नकोशा’ असलेल्या विरोधी पक्षनेत्याला राज्यपालपदाची झूल पांघरण्यात आली, तर प्रदेशाध्यक्ष सतीश पुनियांना नारळ देऊन चित्तौडगढचे खासदार चंद्रप्रकाश जोशी यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. राजस्थानमध्ये कॉंग्रेस पक्षात मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट हा संघर्ष टोकाला गेलेला असला तरी भाजपसाठीही त्या राज्यात फारसे अनुकूल वातावरण नाही. अशा परिस्थितीत जोशींसारख्या तरुण चेहऱ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. जोशी यांना आता आपले नेतृत्व सिद्ध करावे लागणार आहे. दिल्ली महापालिकेतील दारुण पराभवानंतर आदेश गुप्ता यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्यानंतर भाजपने दिल्लीत प्रदेशाध्यक्षाऐवजी कार्यकारी अध्यक्ष हे नवे पद निर्माण करून वीरेंद्र सचदेवा या पंजाबी नेत्याकडे त्याची जबाबदारी दिली आहे. अरविंद केजरीवालांनी शेखी ओबेरॉय यांना महापौरपदाची संधी देऊन पंजाबी कार्ड खेळलेले असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून सचदेवांच्या माध्यमातून पंजाबी समूहाला चुचकारण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. बिहारमध्येही खांदेपालट करून भाजपने खासदार संजय जयस्वाल यांच्याऐवजी सम्राट चौधरी यांना संधी दिली आहे. बिहारमध्ये नितीशबाबू व लालू यादव एकत्र आलेले असताना या राज्यात भाजपसाठी लोकसभेसाठी तगडे आव्हान उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत पक्षाने केलेला बदल महत्त्वाचा मानला जात आहे.

केंद्रबिंदू ‘राहुल’

देशाचे सध्याचे राजकारण नरेंद्र मोदींऐवजी राहुल गांधींभोवती फिरते आहे हे भक्त मंडळी सोडून कोणीही मान्य करेल. येनकेनप्रकारेण राहुल यांचे नाव दररोज चर्चेत राहते हे महत्त्वाचे. भाजपची मंडळी कधीकाळी राहुल यांची संभावना करत असत. मात्र ‘भारत जोडो’ यात्रा काढून राहुल यांनी सगळ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. राहुल यांची इमेज बदलणारी ही यात्रा ठरली. त्यात कॉंग्रेस पक्षाचा जनाधार हा कश्मीर ते कन्याकुमारी असा प्रचंड आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात लेक्चर देण्यासाठी गेले. तेही गाजले. त्यानंतर राहुल यांनी लंडनमध्ये काही टिपणी केली. त्यावरून सध्या देशाच्या संसदेचे काम बंद पाडले जात आहे. राहुल यांनी देशविरोधी विधान केले असून देशाची राज्यघटना व लोकशाहीचा अपमान केला आहे, अशी ऊर बडवेगिरी सत्ताधारी करत आहेत. आता तर एका मानहानी प्रकरणात राहुल यांची खासदारकीच थेट रद्द करण्यात आली. एरवी पंतप्रधान किंवा अमित शहा संसदेत आल्यानंतर मीडियाच्या मंडळींचीही धावपळ, पळापळ होत असते. आता ही पळापळ राहुल गांधींसाठी होते हे विशेष. लंडनमध्ये जे विधान केले त्यावर स्पष्टीकरण देण्याची राहुल यांनी तयारी केली होती. मात्र त्यांचा आवाज लोकसभेत ‘म्यूट’ करण्यात आला. लोकसभेत राहुल यांना संधी मिळाली नसली तरी उरलीसुरली कसर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भरून काढली आहे. राहुल गांधी नुसते बदललेले नाहीत, तर राजकीयदृष्टय़ा गंभीर व परिपक्व होत आहेत.

[email protected]