
>> नीलेश कुलकर्णी
प्रचंड बहुमताच्या सरकारलाही नमवता येऊ शकते हा आत्मविश्वास हिंडेनबर्ग प्रकरणाने विरोधकांना दिला आहे. गेली नऊ वर्षे विरोधकांची तोंडे नऊ दिशेला होती. यावेळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यवस्थित रणनीती आखून विरोधकांनी सरकारच्या नाकी नऊ आणलेले आहे. अधिवेशनाच्या पूर्वार्धात विरोधकांनी बाजी मारली, पण उत्तरार्धात ही एकजूट अभेद्य राखण्याचे आव्हान विरोधकांपुढे आहे. वर्षभरावर सार्वत्रिक निवडणुका येऊन ठेपलेल्या असताना विरोधकांनी ऐक्याची वज्रमूठ आवळली पाहिजे.
गेल्या नऊ वर्षांत पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात विरोधकांना ‘सूर’ गवसला आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी जबरदस्त एकजूट दाखवत दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीतही केंद्र सरकारला दरदरून घाम फोडला. ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालावरून संसदेत रणकंदन झाले. राहुल गांधी यांनी विचारलेल्या पाच रोकडय़ा सवालांपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान देऊ शकले नाहीत. राहुल व त्यांच्या कॉंग्रेस पक्षाची टवाळी करत पंतप्रधानांनी लोकसभेत कशीबशी वेळ मारून नेली. राज्यसभेतही विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अशी काही आरोपांची तोफ डागली की, सरकार हतप्रभ झाले. इतके की, गोंधळ घातला म्हणून आता काही विरोधी खासदारांचा विषय हक्कभंग समितीकडे सोपविण्यात आला आहे. सरकार घाबरले आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी एकजूट दाखविल्यानंतरच्या एक महिनाभराच्या कालखंडात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. देशातील थंडीचा जोर ज्या पद्धतीने ओसरला त्या पद्धतीनेच विरोधकांच्या ऐक्याच्या आणाभाकांचा जोरही ओसरल्याचे दिसून येत आहे. ईशान्येकडील राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. बिहारमध्ये नितीशबाबूंना उपेंद्र कुशवाह यांनी गुंतवून आणि गांगरून टाकले आहे, तर तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या वाढदिवसाला विरोधकांचा मोठा जमाव चेन्नईत जमा झाला. त्याचवेळी नॅशनल कॉन्फरन्सच्या फारूख अब्दुल्ला यांनी ‘‘स्टॅलिन पुढचे पंतप्रधान होतील’’ अशी ‘फुसकुली’ सोडून विरोधकांच्या ऐक्याला सुरुंग लावला आहे. याच कार्यक्रमात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विरोधकांना एकत्रित लढण्याचे आवाहन केले आणि उत्तर प्रदेशात परत आल्यानंतर समाजवादी पक्ष केवळ आणि केवळ राष्ट्रीय लोकदलाशीच युती करेल, अशी उफराटी भूमिका घेऊन विरोधी ऐक्याच्या संकल्पावर पाणी सोडले. बहेनजी मायावती यांनी सुरुवातीलाच ‘‘हा माझा मार्ग एकला’’ म्हणत भाजपला फायदेशीर भूमिका घेतलेली आहे. त्यातच आम आदमीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हेदेखील पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना घेऊन छत्तीसगढ, मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये दौरे करत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाला विस्ताराचा अधिकार आहे आणि प्रत्येक राजकीय नेत्याला राजकीय महत्त्वाकांक्षा ही असतेच, ती असायलाच हवी. मात्र या महत्त्वाकांक्षेपोटी मोठय़ा प्रयत्नांनी जुळवून आणलेल्या विरोधी ऐक्याला तडे जायला नकोत. विरोधकांमध्ये बेबनाव राहिला तर भाजपचे आयतेच फावणार आहे. या सरकारला विरोधकांनी गेल्या अधिवेशनात जमिनीवर आणले. आता जमिनीवरची लढाई सर्व विरोधकांना आपापसातले मतभेद दूर ठेवून करायची आहे. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून विरोधक एकत्र आले तर दिल्लीकरांचा पाडाव निश्चित आहे. फक्त विरोधक ऐक्याची वज्रमूठ सैल तर सोडणार नाहीत ना? एवढाच प्रश्न आहे.
नागालँडमधील ‘महिला सबलीकरण’
‘‘पिछले सत्तर साल में जो नही हुआ, वो इस बार हुआ है.’’ होय, हे खरं आहे. अर्थात हे जे काही झाले ते नरेंद्र मोदींमुळे खचितच झालेले नाही, तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागालँडच्या जनतेने खरोखरच हे करून दाखवलं आहे. आपल्या देशात महिला सबलीकरणाबाबत नेहमीच उच्चरवाने बोलले जाते. सबलीकरणासाठी सरकार असंख्य योजना राबवत असते. त्यासाठी पाण्यासारखा पैसाही खर्च होतो. मात्र महिला सबलीकरण खरोखरच किती प्रमाणात होते? हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे सत्तर वर्षांत नागालँडच्या विधानसभेत पहिल्यांदाच एक महिला बसलेली आपल्याला दिसणार आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून नागालँडच्या आजवर विधानसभेच्या 14 सार्वत्रिक निवडणुका झाल्या. मात्र यापैकी एकदाही एकाही जागेवर महिला उमेदवार निवडून येऊ शकल्या नाहीत. यावेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या ‘पीपल्स डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’च्या हेकानी जाखलू या विधानसभेवर निवडून आल्या आहेत. ईशान्येकडील राज्ये ही देशाच्या ‘सेव्हन सिस्टर्स’ मानल्या जातात. तुलनेने या भागात विकास कमी झाला. त्यातच अलीकडच्या काळात चिनी ड्रगनच्या उपद्व्यापामुळेही तिकडचे जगणे हे आव्हानात्मक झाले आहे. अशा विचित्र स्थितीत उशिरा का होईना, नागालँडमध्ये ‘महिला सबलीकरणाचा सूर्य’ उगवला आहे हेही नसे थोडके.
‘महिला कार्ड’ फेल
त्रिपुरामध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत भाजपने चमकदार कामगिरी केली. निवडणुकीपूर्वी वर्षभर अगोदर बिप्लव देव यांना बदलून भाजपने माणिक साहा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली होती. या राज्यात डावे व कॉंग्रेसची आघाडी झाली होती. त्यामुळे भाजपला निवडणूक जड जाईल असा अंदाज होता. मात्र भाजपने सहजपणे ही निवडणूक जिंकली. अर्थात मित्रपक्षाचाही भाजपच्या यशात तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. बहुमत मिळाल्यानंतर ‘कौन बनेगा मुख्यमंत्री?’ असा प्रश्न भाजप नेतृत्वापुढे निर्माण झाला होता. माणिक साहा यांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकल्यामुळे नैसर्गिक न्यायाने मुख्यमंत्रीपदी त्यांचाच दावा मोठा होता. मात्र केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनाही भाजपने विधानसभेसाठी रिंगणात उतरवले होते. त्या निवडणूकही जिंकल्या. तेही माणिक सरकार अनेक वर्षे ज्या मतदारसंघातून निवडून येत त्या धनपूरमधून त्या जिंकल्या. शिवाय भौमिक यांची प्रतिमा ‘त्रिपुरा की दीदी’ अशी पूर्ण राज्यात आहे. अशा स्थितीत जागतिक महिला दिन तोंडावर असताना भाजपने त्याच दिवशी त्रिपुराच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीचा मुहूर्त मुक्रर केल्याने भौमिक याच मुख्यमंत्री होतील अशी अटकळ लावण्यात येत होती. ती प्रत्यक्षात खरी ठरली नाही. साहा यांनी त्रिपुरा चांगल्या प्रकारे सांभाळले. विशेषतः ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्रिपुरात दंगल उसळली नाही. साहा यांची प्रतिमा सज्जन माणूस अशी आहे. या सज्जनपणामुळे साहा यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली.



























































