मुद्दा – लेप्टोस्पायरोसिसची कारणे, लक्षणे व उपचार

>> डॉ. निखिल कुलकर्णी

पावसाळा  कडाक्याचे ऊन व उकाडय़ापासून आल्हाददायी दिलासा देतो, पण या आनंदासह पावसाळ्यामध्ये संसर्गाचा प्रसारदेखील होतो, विशेषतः पावसाळ्यादरम्यान व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती तुलनेने कमी असते. ओलाव्यामुळे जिवाणू व विषाणूदेखील अधिक प्रमाणात वाढतात, ज्याचा अनेक व्यक्तींच्या, विशेषतः रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींच्या आरोग्य व स्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम होतो. पावसाळ्यात पसरणाऱ्या काही सामान्य संसर्गांमध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया, सर्दी आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या यांचा समावेश आहे. लेप्टोस्पायरोसिस हा पावसाळ्यामध्ये पसरणारा आजार नसला तरी वेळेवर उपचार न केल्यास प्राणघातक ठरू शकतो. लेप्टोस्पायरा या जिवाणूच्या प्रकारामुळे होणारा लेप्टोस्पायरोसिस संसर्ग व्यक्तीला पावसाळ्यामध्ये जमा होणाऱ्या घाण पाण्याच्या संपर्कात आल्यास होतो. हा झुनोटिक आजार (प्राण्यामार्फत पसरणारा आजार) आहे. लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग माणसांना आणि कुत्र्यांसारख्या प्राण्यांना होऊ शकतो.

माणसांसंदर्भात व्यक्ती संसर्गित प्राण्याचे खाद्य व मूत्राच्या संपर्कात आल्यास संक्रमण होऊ शकते. मूत्र संक्रमित पाळीव प्राणी, जसे कुत्रे किंवा घोडे किंवा रानडुक्कर आणि उंदीर यांसारख्या वन्य प्राण्यांचे असू शकते. शहरी भागामध्ये पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू अधिक सक्रिय असतात, पण अस्वच्छ पाणी साचणाऱ्या शेतामध्ये व प्रदेशांमध्ये हा आजार वर्षातून कोणत्याही वेळी होऊ शकतो.

लेप्टोस्पायरा जिवाणू संसर्गित व्यक्तीच्या शरीरात दूषित अन्न आणि पाण्याद्वारे प्रवेश करतात, जे नंतर आतडय़ात पोहोचतात आणि रक्तामध्ये पसरतात, ज्यामुळे संसर्ग होतो. या आजारामध्ये अनेक लक्षणे दिसून येऊ शकतात, ज्यापैकी काही लक्षणे आहेत त्वचा संसर्ग, ताप, मूत्रपिंड किंवा यकृत निकामी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मेंदुज्वर आणि विशेषतः वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो.

लेप्टोस्पायरोसिसचा विविध व्यक्तींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो, म्हणून आजाराच्या प्रमाणानुसार लक्षणे व उपचार वैयक्तिकरीत्या वेगवेगळे केले पाहिजेत. तसेच जिवाणूच्या संपर्कात आल्यानंतर आजाराची लक्षणे दोन दिवस ते चार आठवडय़ांनी दिसून येऊ शकतात आणि अनेक केसेसमध्ये लक्षणे टप्प्याटप्प्याने दिसून येऊ शकतात.

संसर्गाचा पहिला टप्पाः या टप्प्यातील लक्षणांमध्ये जास्त ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, स्नायुदुखी, थकवा, घसा खवखवणे, ओटीपोटात दुखणे, उलटय़ा होणे, सांधे किंवा स्नायू दुखणे, पुरळ येणे आणि डोळे लाल होणे यांचा समावेश असू शकतो.

संसर्गाचा दुसरा टप्पाः या टप्प्यातील लक्षणांमध्ये अतिसार, कावीळ, मूत्रपिंड निकामी होणे, फुप्फुसाचा रक्तस्राव, हृदयाचा ऑरिथिमिया, न्यूमोनिटिस आणि सेप्टिक शॉक यांचा समावेश असू शकतो.

या आजारावर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे मूत्रपिंड आणि फुप्फुसाच्या आजारांसारख्या दीर्घकालीन गुंतागुंती होऊ शकतात. तसेच वेळेवर उपचार न केल्यास आजारामधून बरे होण्याची प्रक्रिया लांब आणि कठीण होऊ शकते. या आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता असली तरी त्याचे प्रमाण खूप कमी आहे.

या आजाराचा कोणाला धोका आहे?

  • लेप्टोस्पायरोसिस कोणत्याही व्यक्तीस प्रभावित करू शकतो, पण खालील श्रेणीतील व्यक्तींना अधिक धोका आहे. या व्यक्ती पुढीलप्रमाणेः
  • शेती, गटार साफसफाई, खाणकाम, मासेमारी, प्राण्यांची काळजी घेणे इत्यादी व्यवसायांशी संलग्न व्यक्ती.
  • पावसात चिखलयुक्त भागांमध्ये आणि घाणेरडय़ा रस्त्यावर खेळणारी मुले.
  • पोहणे, पॅडलिंग, कयाकिंग आणि राफ्टिंग यांसारख्या पाण्याशी संबंधित क्रियांमध्ये सहभाग घेणाऱ्या व्यक्ती. तलाव आणि नद्या दूषित असतील तर या व्यक्ती सहजपणे आजारी पडू शकतात.
  • शिबिरार्थी आणि ट्रेकर्स.
  • मैदानी खेळांमध्ये सहभाग घेणाऱ्या व्यक्ती.
  • विशेषतः पावसाळ्यात अशुद्ध पाणी पिणाऱ्या व्यक्ती.
  • दूषित पाण्यात पिकवलेल्या भाज्या आणि फळांचे सेवन करणाऱ्या व्यक्ती.

 (माहीम येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल एस. एल. रहेजा हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसीनचे कन्सल्टंट)