मुद्दा – जादूगार रघुवीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुरेंद्र तेलंग

सुप्रसिद्ध  जादूगार रघुवीर ऊर्फ रघुवीर भिकाजी भोपळे यांचा जन्म मुळशी धरणाजवळ कादव या गावात 24 मे 1924 रोजी गरीब शेतकरी कुटुंबात झाला. धरणामुळे अनेकजण विस्थापित झाले. त्यापैकी एक रघुवीर यांचे कुटुंब होते. ते आंबेठाण येथे राहवयास आले. लहानपणापासून गरिबी असल्यामुळे त्यांनी आपले शिक्षण पुण्यात अनाथ विद्यार्थीगृहात घेतले. माधुकरी मागून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. प्रसिद्ध राजस्थानी जादूगार राणा यांचे जादूचे प्रयोग पाहिले. आपणही जादूची कला शिकावी असे त्यांना वाटू लागले. त्यांनी राणा यांच्याकडे जादूच्या कलेचे प्रशिक्षण घेतले. त्यांना सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांच्यासोबत विदेशात जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी अनेक जादूचे प्रयोग केले.

जादू ही एक हातचलाखी आहे हा प्रचार त्यांनी केला. भुतांचा डान्स, डोळे बांधून मोटरसायकल रस्त्यावरून चालविणे, तलवारीने माणसाचे तुकडे करणे, प्रयोग करताना गायब होणे हे त्यांचे प्रयोग फार गाजले. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था, देवालये यांच्यासाठी विनामूल्य कार्यक्रम केले. वर्षातील 365 दिवसांत त्यांचे 200 प्रयोग हा एक विक्रम आहे. एकूण कारकीर्दीत त्यांनी 7 हजार 23 प्रयोग केले. त्यांनी 1960 मध्ये पुण्यात जादूची कला शिकविण्यासाठी शाळा काढली व अनेकांना जादूचे प्रशिक्षण दिले. मी पाहिलेला रशिया, प्रवासी जादूगार, जादूच्या गमतीजमती ही त्यांची तीन पुस्तके आहेत. प्रवासी जादूगार या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक मिळाले. 1960-70 च्या काळात त्यांचे जादूचे प्रयोग अतिशय लोकप्रिय होते. 1977 मध्ये त्यांनी या व्यवसायातून निवृत्ती घेतली. त्यांचे 20 ऑगस्ट 1984 रोजी पुण्यात निधन झाले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला 24 मेपासून प्रारंभ झाला. जादूगार संघटनेने तसेच शासनाने त्यांची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांची चौथी पिढी जादूच्या कलेसाठी काम करीत आहे.