मुद्दा – उत्तर नसलेले प्रश्न!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विजय पांढरीपांडे

आज   काल बहुतेक लोकांचा स्वभाव तापट, रागीट, चिडचिडा असतो. केवळ पडद्यावरील कुटुंबाच्या बाबतीतच नव्हे, तर आपल्या प्रत्येक घरात हीच परिस्थिती आहे. सहनशक्ती कमी झाली आहे, हव्यास वाढला आहे. हवे ते ताबडतोब मिळाले नाही की, संतापाने वाटेल त्याला, वाटेल ते बोलणे, त्रागा करणे, चिडचिड करणे हे घराघरांत कॉमन झाले आहे. अगदी लहान मुलंदेखील अपवाद नाहीत. त्यांच्या मनासारखे खाणे, पिणे, कपडेलत्ते मिळाले नाहीत की, छोटी मुलेदेखील आकाशपाताळ एक करतात. पालकदेखील मुलाचे नको तितके लाड करतात.आपल्याला जे मिळालं नाही ते सर्व आपल्या मुलांना मिळाले पाहिजे हा भाव त्यामागे असतो. पूर्वीच्या काwटुंबिक परिस्थितीच्या तुलनेत आज आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळेही मुलांना काही कमी पडू नये हा त्यामागे सद्हेतू असतो, पण इथेच हट्टीपणाची, संतापाची बीजे रोवली जातात. हवे ते ताबडतोब मिळालेच पाहिजे, तो आपला जन्मसिद्ध हक्क आहे अशी भावना वाढीला लागते.

पुढे शाळा-कॉलेजात, नोकरी-व्यवसायातदेखील पेशन्सची तयारी नसते. सगळेच मार्ग आपल्याला हवे तसे सुकर नसतात, प्रवासात खाचखळगे येतात, अपयशदेखील पचवावे लागते, हार स्वीकारावी लागते हेच समजत नाही. सगळेच दिवस सारखे नसतात, सगळेच पत्ते हुकमाचे नसतात हे कळायला, उमजायला वेळ लागतो. हे खरे तर लहानपणाच्या संस्कारातून येते, उत्तम वाचनातून, उत्तम कलेच्या आस्वादनातून  येते. तिथेच समस्या आहे. वाचन कमी झालेय. कलेच्या आस्वादनाला वेळ नाही. एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेलीय. पालक आपापल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त आहेत. शिवाय अवतीभवतीचे सामाजिक, राजकीय वातावरण अधिकाधिक दूषित होत चालले आहे.

नवरा-बायकोच्या संसारातले ताणतणावदेखील वाढले आहेत. लग्न झाल्याबरोबर वर्षाच्या आत घटस्पह्ट, मुलं चांगली मोठी झाल्यावर म्हणजे दहापंधरा वर्षे एकत्र राहिल्यानंतर विभक्त, असे प्रकार घडताहेत. नात्यातील कौटुंबिक जिव्हाळा कुठे राहिलाच नाही. ‘एक घाव दोन तुकडे’ ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. एकमेकांना समजून घ्यायची तयारीच नाही. सारखी ‘तू तू मैं मैं.’ प्रत्येक ठिकाणी इगो आड येतो. माघार घेण्याची कुणाचीच तयारी नसते. संपत्तीचा मोह वाढलाय. ‘तुझे माझे’ हीच भाषा जास्त. ‘आपले दोघांचे, सर्वांचे’ हा सामाईक विचारच नाही. जबाबदाऱ्या या सर्वांनी मिळून स्वीकारत पुढे जायचे असते. संसार एकटय़ा बायकोचा, एकटय़ा नवऱ्याचा नसतो. तो दोघांचा, मुलांचा, नातेवाईकांचा, सर्वांचा असतो. स्त्री पुरुषाच्या बरोबरीने कमवू लागली तरी तिचे संसारातले दुय्यम स्थान तसेच राहिले. प्रोफेशनल जबाबदाऱ्या पुरुषांइतक्याच स्त्रियांच्यादेखील महत्त्वाच्या. मुलांचा अभ्यास, किचन हे स्त्रीनेच बघावे हाच पारंपरिक दृष्टिकोन आजही दिसून येतो. त्यामुळे स्त्रियांचा त्रागा होतो. काही ठिकाणी पुरुष स्त्रियांना मदत करताना दिसतात आजकाल, पण ते प्रमाण कमीच. अनेक स्त्रिया जबाबदारीच्या पदांवर काम करतात. त्यांना वेळी अवेळी काम करावे लागते ऑफिसचे. इथे समजूतदारीची गरज असते, पण पुरुषाची तडजोडीची तयारी नसते. भांडय़ाला भांडं वाजते. घटस्पह्टापर्यंत पाळी येते. पूर्वी मनाची नाही, पण जनाची लाज वाटायची. समाजाचे, नातेवाईकाचे दडपण वाटायचे. आता कुणीच कुणाच्या अध्यात मध्यात नसते. लिव्ह इन रिलेशनशिप, पटले नाही तर सोड पिच्छा… हेही कॉमन झाले. प्रत्येकाच्या वर्तुळाची त्रिज्या आकुंचित होत चाललीय. नाती दुरावत चालली. त्यामुळे कुणी कुणाच्या भानगडीत पडत नाही. तुमच्या वागण्याचा कुणावर फारसा परिणाम होत नाही. पूर्वी काही विपरीत घडायची कुणकुण लागली तरी सगळे मदतीला धावून यायचे. समजवायचा प्रयत्न करायचे. आता तर काही पालकच नवरा-बायकोच्या भांडणाच्या आगीत तेल ओततात! मुलीला, मुलाला भडकवतात. सगळेच विचित्र! दोष कुणाला द्यायचा कळत नाही. माघार घ्यायची कुणाचीच तयारी नसते. ‘माझेच बरोबर’ ही हटवादी वृत्ती. मग कुणी कुणाला कसे समजवायचे, का समजवायचे? विवाह संबंधातली नैतिकता, पावित्र्य, समंजस वृत्ती…सगळेच कमी होत चालले. फक्त कोरडे व्यवहार तेवढे उरलेत!  शिक्षणाने अक्कल आली, पण ती वेगळ्याच दिशेने वाहायला लागली. शहाण्यांना वेड लागले असे म्हणायची वेळ आली!

घरात तरुणांना वृद्ध माणसे, आई-वडील नकोसे होत चाललेत. वृद्धांच्या प्रश्नाचे गांभीर्य वेगळेच आहे. मुले, सुना आपापल्या नोकरी -व्यवसायात व्यस्त. नातवंडं आपल्या विश्वात मस्त. वृद्ध, आजारी आई वडिलांनी कुणाकडे पहायचे? हेही ताणतणावाचे कारण. आजकाल मुली ‘वार्षिक पॅकेज किती?’ या प्रश्नाबरोबर घरात एक्स्ट्रा बॅगेज (?) किती हीदेखील चौकशी करतात म्हणे! आपण किती घसरत चाललो हे यावरून समजते. मग या म्हाताऱ्या आई-वडिलांनी कुणाकडे पाहायचे? कुणाकडे राहायचे?

आता तर कुटुंबातले कुणी ना कुणी परदेशात गेलेले…कमाईसाठी. त्यामुळे भौतिक अंतर तसेही वाढलेले. आठवडय़ाला एक व्हिडीओ कॉल, चौकशीचा एक व्हॉट्सअॅपवर मेसेज, कर्तव्य
संपले! क्वचित कधी वर्ष-दोन वर्षांतून एकदा भेटीगाठी. तिथेही जाईपर्यंत दोन्ही पक्षी आतल्या आत ताणतणावाचे वातावरण. दिलखुलास बातचीत, मोकळेपणा क्वचितच दिसतो अपवादाला. हे सगळे वळवाच्या पावसासारखे ‘धो- धो’ बरसणे, चिंबचिंब भिजणं दिसतच नाही आजकाल.

घरीदारी सगळीकडे टेन्शन. सरकारदेखील तणावाच्या ओझ्याखाली सदासर्वदा. सर्वांना आपल्या अस्तित्वाची काळजी! स्वतःची काळजी, बाकी सारे गेले उडत ही स्वार्थी वृत्ती. एकूणच आपल्या भोवती धुके दाटलेले…वर आभाळ भरून आलेले…चिंतेचे ढग. भविष्याविषयी काळजीचा ताण. त्यामुळे हातचा क्षण, अवतीभवतीचे वातावरण कितीही पोषक, आनंदी असले तरी ते भोगायचे नाही, स्वीकारायचे नाही. शेवटी कुणी कुणाला कसे समजवायचे? हाच प्रश्न असतो, ज्याचे उत्तर कुणालाच माहीत नसते.