
>> टिळक उमाजी खाडे
शहरातील नागरिकांना विनासायास व सुरक्षितपणे मुख्य रस्त्याच्या कडेने इच्छित स्थळी पायी चालत जाता यावे म्हणून बांधलेला सुयोग्य मार्ग म्हणजे पदपथ. मुंबईच्या कोणत्याही भागांत आपण गेलो तरी एकही पदपथ फेरीवालामुक्त किंवा अतिक्रमणमुक्त आहे याची शंभर टक्के खात्री देता येत नाही. मुंबईतील पदपथांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पदपथ हे फेरीवाल्यांसाठी राखीव तर ठेवले नाहीत ना? अशी शंका यावी इतके जवळपास सर्वच पदपथ फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. पदपथांवर पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या, दुकाने मुंबईकरांचा रस्ता अडविण्यासाठी जणू ऐटीत उभी आहेत. काही पदपथांना तर ‘फूड हब’चे (खाऊ गल्ली) स्वरूप आले आहे. पदपथावरील काही टपरीवाले व दुकानदार तर पदपथावर जणू काही आपल्याला वाढीव चटई क्षेत्र दिलेले आहे अशा थाटात वावरत आहेत.
काही पदपथ तर झोपडपट्टीवाल्यांची व गर्दुल्यांची आश्रयस्थाने झाली आहेत. काही पदपथांवर तर अनधिकृत रिक्षा स्टँड व अनधिकृत वाहनतळे उभी राहिली आहेत. काही पदपथांवर राजकीय नेत्यांची व राजकीय पक्षांची कार्यालये थाटली आहेत. खासगी जाहिरात फलकांसाठी पदपथ हे तर हक्काचे ठिकाण झाले आहे. मुंबईतील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांलगत असणाऱ्या पदपथांवर अतिक्रमणे केली आहेत. सुशोभीकरणाच्या नावाखाली काही पदपथ उखडले आहेत. मुंबईतील पदपथावर काय मिळत नाही ते सांगा. अगदी फळे, भाज्या विक्रीपासून मटण, मासे, कपडे, रेल्वे-विमानाच्या तिकिटापर्यंत सर्व काही पदपथावर! इतके मुंबईतील पदपथ ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ बनले आहेत. मुंबईतील अर्थव्यवस्थेची बरीचशी उलाढाल या पदपथांवरच होते. घडय़ाळाच्या काटय़ावर धावणाऱ्या मुंबईकरांना अशा सर्व अग्निदिव्यातून वाट काढत कामाच्या ठिकाणी, घरी वा इच्छित स्थळी जावे लागते. पदपथावर फेरीवाले व रस्त्यावर प्रचंड वाहने अशा कात्रीतून चालत जाऊन जीव मुठीत घेऊन मुंबईकरांना आपली वाट शोधावी लागते. अशा या गदारोळात पादचाऱ्यांना अपघात होऊन मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही अधूनमधून घडतात. याला जबाबदार कोण? नीटनेटके व मोकळे पदपथ मुंबईकरांना उपलब्ध करून देणे हे महापालिका प्रशासनाचे कर्तव्यच आहे.
मुंबई महापालिकेने 2019 साली आखलेल्या पदपथ धोरणाचे काय झाले? पदपथांच्या निर्मितीवर व दुरुस्तीवर कागदोपत्री कोटय़वथी खर्च झाला, पण पदपथांच्या अवस्थेत फार काही बदल झाला नाही. काही पदपथांवर टाकलेले पेव्हर ब्लॉक उखडले. अतिक्रमणविरोधी विभागाकडून पदपथांवर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली तरी काही वेळाने ते फेरीवाले पुन्हा त्याच पदपथावर आपला संसार बिनदिक्कतपणे थाटतात. पालिकेतील अतिक्रमणविरोधी पथकाची गाडी किती वाजता येणार आहे याची पक्की माहिती या फेरीवाल्यांना आधीच कशी मिळते व कोण देते? पदपथांवरील हे फेरीवाले व पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यातील हा पाठशिवणीचा खेळ वर्षानुवर्षे चालू आहे. जर प्रशासनाने ठरवले तर मुंबईतील रस्ते व पदपथ एकाच दिवसात मोकळा श्वास घेऊ शकतात, पण त्यासाठी प्रशासनाची व सरकारची दुर्दम्य इच्छाशक्ती असायला हवी. संयुक्त अरब अमिरातीमधील कडक कायद्यांचे व तेथील स्वच्छतेचे गोडवे गाणारे आपण तसा प्रयत्न आपल्या देशात किंवा आपल्या मुंबईत का करत नाही? परदेशातील चांगल्या गोष्टींचे आपण अनुकरण करायला काय हरकत आहे? ‘ना फेरीवाला क्षेत्र’ धोरणाची अंमलबजावणी कधी होणार? महापालिका प्रशासनाने सर्व पदपथांची शास्त्राrय पद्धतीने पुनर्रचना करून व पदपथांवरील सर्व अतिक्रमणे हटवून मुंबईतील पदपथांची ‘बिकट वाट’ सुकर करावी एवढीच माफक अपेक्षा.

























































