मुद्दा – मुंबईतील फेरीवाले

1780

>> अरुण पां. खटावकर

मुंबईतील फेरीवाले ही मोठी समस्या आज जनतेला भेडसावत आहे. लोकांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर, गल्लीबोळात कोठेही हे फेरीवाले बसलेले असतात. खरे तर हे अनधिकृत फेरीवाले आपले बस्तान बसविण्यास आपणच कारणीभूत असतो. प्रत्येकाला काही घेण्यासाठी दूर बाजारात किंवा मंडईत जायला वेळ नसतो. फेरीवाले आपल्या जवळ असल्यास सर्व गोष्टी सहज आणि स्वस्तात मिळतात हा त्यांचा अनुभव. त्यामुळे या फेरीवाल्यांना आपणच खतपाणी घालतो हे खरे आहे. आता खरी गंमत अशी आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पालिकेची गाडी येते. गाडीची वेळही ठरलेली असते. त्यामुळे सर्व फेरीवाले आधीच सतर्क असतात. मग काय, दोन ते तीन मिनिटांत हे सर्व फेरीवाले आपल्या हातगाडय़ा, टोपल्या आणि सामान आवरून मिळेल त्या गल्लीबोळात लपतात. पालिकेचे कर्मचारी रिकामी गाडी त्या मार्गावरून घेऊन जातात. गाडी पुढे गेली की, हे फेरीवाले बिनदिक्कतपणे पुन्हा रस्त्यावर येतात. त्यामुळे जोपर्यंत पालिकेकडून फेरीवाल्यांवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत फेरीवाल्यांची ही समस्या सुटणे शक्य नाही.

आपली प्रतिक्रिया द्या