लेख – ठसा – प्रा. तु. शं. कुलकर्णी

>> प्रशांत गौतम

प्रा. तु. शं. कुलकर्णी हे नवकथेचे बीज रुजवणारे ज्येष्ठ कथाकार, संवेदनशील मनाचे कवी, मराठवाडा साहित्य परिषदेचे निष्ठावान कार्यकर्ते, ‘प्रतिष्ठान’ या मसाप मुखपत्र व वाङ्मयीन मासिकाचे संपादक, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते. त्यांच्या निधनाने या सर्वच संस्थांची हानी झाली. साहित्य, संस्कृतीच्या स्थित्यंतराचा महत्त्वाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. अवघ्या महिनाभराच्या कालखंडात नांदेडकरांनी प्रा. माधवकृष्ण सावरगावकर, विलास कुमठेकर, पं. नाथराव नेरळकर आणि प्रा. तु. शं. कुलकर्णी यांच्यासारख्या थोर प्रतिभावंत सारस्वतांना गमावले आहे.

या सारस्वतांचे जाणे हे साहित्य क्षेत्रासाठी नक्कीच धक्कादायक, क्लेशदायक होय. साहित्य, कला, संस्कृती, वाङ्मयीन चळवळी या क्षेत्रात आपल्या कार्याची अमीट छाप सोडणारे तु. शं. हे डोळस लेखक होते, डोळस यासाठी की त्यांनी मरणोपरांत देहदान करून समाजात एक आदर्श निर्माण केला. 3 सप्टेंबर 1932 साली कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे जन्म झालेल्या तु. शं. यांचा साहित्यप्रवास  90 व्या वर्षी विसावला. संभाजीनगर विद्यापीठात बी.ए.ला असताना त्यांना डॉ. ना. गो. नांदापूरकर आणि वि. स. खांडेकर पारितोषिक मिळाले. पुढील काळात विद्यापीठातच एम.ए. झाले आणि सरस्वती भुवनमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विभागप्रमुखही झाले. संभाजीनगरात विद्यापीठ येण्याच्या सुरुवातीच्या काही वर्षांत म्हणजे 1958 ते 1963 ते ऍकॅडेमिक असिस्टंट म्हणून कार्यरत होते आणि त्याआधी 1951 ते 1958 या काळात शासकीय आरोग्य खात्यातील सेवेत कार्यरत होते.

प्रा. तु. शं. कुलकर्णी यांचे लेखक म्हणून ऐतिहासिकदृष्टय़ाही महत्त्व आहे. ‘1948 च्या पोलीस ऍक्शननंतर हैदराबाद संस्थान स्वतंत्र झाले. 1953 च्या 11 कलमी नागपूर कराराला मराठवाडय़ातील जनतेने विनाअट मंजुरी दिली आणि जनतेने भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग दिला. या काळात संस्थानात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरे झाली. परिणामी स्वातंत्र्याच्या मुक्त वातावरणात श्वास घेण्याची संधी मराठी, कन्नड, तेलगु भाषिक जनतेला लाभली. तु. शं. कुलकर्णी हैदराबादेत असण्याच्या काळात प्रा. भालचंद्र महाराज कहाळेकर, प्रा. भगवंतराव देशमुख, यशवंत कानिटकर हा लेखकांचा ग्रुप साहित्य व्यवहारात अग्रेसर होता.

मराठीतील कथा, काव्य समीक्षावर त्यांच्यात चर्चा होत असे. कहाळेकरांची व्याख्याने, देशमुख यांचे ललित लेखन, वा. रा. कांत, बी. रघुनाथ यांचे काव्यलेखन यांच्यापासून नरहर कुरुंदकर, द. प. जोशी, तु. शं. प्रेरणा घेत असत. (तु. शं. गौरवग्रंथ) मराठवाडा मुक्तिसंग्रामनंतर तु. शं. यांच्यासह अनेक साहित्यिक संभाजीनगरला स्थायिक झाले. अनंत भालेरावांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापना झाली. तु. शं. यांच्यातील लेखक आणि कार्यकर्त्याने मसापला उभारी देण्याचे कार्य चार दशकांपेक्षा जास्त काळ केले. प्रतिष्ठानचे संपादक, मसाप आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ कार्य केले.

वसमत येथे झालेल्या पहिल्या जिल्हा संमेलनाचे ते अध्यक्ष होते. वीसेक वर्षांपूर्वी संभाजीनगरात झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. साहित्य परिषदेनेही त्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले. लेखक म्हणून तु. शं. कुलकर्णी  यांनी कविता, कथालेखन, अनुवाद, संपादन या क्षेत्रात लक्षणीय कार्य केले. ‘तृणाची वेदना’, ‘ग्रीष्मरेखा’, ‘अखेरच्या वळणावर’ हे तीन कथासंग्रह, ‘कानोसा’ हा कवितासंग्रह त्यांच्या नावावर जमा आहे. ‘क्रांतिमार्गावरील प्रवासी- बाबा पृथ्वीसिंह आझाद’ ही अनुवाद साहित्यकृती साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केली. काव्यविषयक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता-1960 ते 1980’ हा साहित्य अकादमीने ग्रंथ प्रकाशित केला.

कथासंग्रह, कवितासंग्रह मोजकेच असले तरी अनुवाद आणि संपादन हे कार्य महत्त्वाचे आहे. सत्यकथा, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, प्रतिष्ठान, युगवानी, छंद या वाङ्मयीन नियतकालिकांबरोबरच अनेक दैनिकांतून त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. परीक्षक, समीक्षक म्हणून केलेले कार्य असो की, विविध समित्यांमधून सदस्य म्हणून केलेले कार्य असो, नव लेखक अनुदान योजनेचे सदस्य असो की राज्य नाटय़ प्रयोग परीक्षक असो किंवा प्रयोगशील शेतकरी म्हणून शेतात केलेले कार्य असो, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली.

स्वतः लेखक असून आपल्या साहित्य प्रवासातील चाळीसेक वर्षांची कारकीर्द त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेशी निगडित ठेवली. कार्यकर्ता ते प्रमुख पदाधिकाऱयापर्यंतचा त्यांचा बहुआयामी प्रवास राहिला आहे. साहित्य, कला, संस्कृतीचे ते स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही महत्त्वाचे साक्षीदार राहिले. त्यांच्या निधनाने मराठवाडय़ातील साहित्य कलासंस्कृतीच्या महत्त्वाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या