RK च्या आठवणी

101

>> अरुण पुराणिक

राज कपूर यांची भव्यदिव्य स्वप्ने साकारणारा त्यांचा स्वतःचा आर. के. स्टुडिओ. आज राज कपूर यांची ही देखणी स्वप्नं सांभाळण्यास, जपण्यास कपूरांची पुढची पिढी असमर्थ ठरली आहे. आता आर.कें.च्या उरतील फक्त आठवणी…

गेट शोमन राज कपूर. भव्यदिव्य आरके स्टुडिओ ही त्याचीच निर्मिती. सप्टेंबर 2017 मध्ये चेंबूरचा आरके स्टुडिओ अचानकपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सिनेरसिकांच्या मनाला चटका लागला. हा ऐतिहासिक स्टुडिओ राज कपूरचे स्वप्न होते. सर्वांना कपूर कुटुंबीय हा वारसा जपतील असा विश्वास होता. रतन टाटांनी नाही का ताजमहल हॉटेलला अतिरेकी हल्ल्यांनंतर पुनर्वैभव प्राप्त करून दिलं? पण केवळ दोन वर्षांच्या आत हा स्टुडिओ विकला गेला तोसुद्धा मातीमोल किमतीला!

आरके स्टुडिओच्या निर्मितीची कथा
भालजी पेंढारकर यांच्या ‘वाल्मिकी’ (1946) चित्रपटात राज कपूर हीरो होता. भालजींनी बिदागी म्हणून 4000 रुपये राज कपूरला दिले. पृथ्वीराज कपूर भालजींना म्हणाले, ‘‘माझा मुलगा राज 4000 रुपये बिदागी घेण्याएवढा मोठा कलाकार नाही, त्याला इतके पैसे देऊ नका.’’ पृथ्वीराज कपूरची पत्नी व राजची आई रुमा ही भालजी पेंढारकर यांना भाऊ मानत असे. भालजी म्हणाले, ‘‘मी निर्माता म्हणून नाही तर मामा म्हणून राजला पैसे देत आहे.’’ पापाजी पृथ्वीराज कपूर यांनी हे पैसे स्वतः जवळ ठेवून चेंबूरला स्टुडिओसाठी दोन एकर जागा घेण्यासाठी ऍडव्हान्स म्हणून दिले. ही जागा खरेदी केल्यावर राज कपूर कोल्हापूरला जाऊन भालजी पेंढारकर यांच्या पाया पडून आला.

1946 मध्ये राजने ‘आग’ चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हा राजने फोर्ड गाडी घेतली. राजकडे स्वतःचे ऑफिस नव्हते. गाडी हेच त्याचे ऑफिस होते. ‘बरसात’ फिल्मच्या वेळी फेमस स्टुडिओच्या दुसऱया मजल्यावरील एक खोली ऑफिस म्हणून घेतली. पुढचा सिनेमा ‘आवारा’ आधी करायचा की स्टुडिओ बांधायचा? हा प्रश्न होता. राजने दादरच्या रंगमहाल स्टुडिओत ‘आवारा’चे शूटिंग चालू केले.सप्टेंबर 1950 मध्ये पापाजींकडून नारळ फोडून चेंबूरला स्टुडिओचे बांधकाम सुरु केले. ‘आवारा’ मधील ‘घर आया मेरा परदेसी’चे शूटिंग आरकेमध्ये झाले त्यावेळी स्टुडिओला चार भिंतीही नव्हत्या.

आरके स्टुडिओचा आतला परिसर
आरकेच्या गेटवर भव्य असा आरकेचा लोगो होता. समोरच शंकराचे मंदिर होते. आरकेच्या अनेक चित्रपटांच्या मुहूर्ताचा शॉट ( पापाजी शंकराची पूजा करत आहेत) तिथेच घेतला आहे. समोरच राजचे प्रशस्त ऑफिस होते. तिथे ‘आग’पासून आरकेच्या सर्व चित्रपटांची पोस्टर्स लावली होती. शेजारीच सुसज्ज असे मिनी थिएटर होते. मागच्या बाजूला त्याचे कॉटेज व नर्गिसची ड्रेसिंग रूम होती. स्टुडिओमध्ये मिनी थिएटर असणे हे त्या काळी प्रतिष्ठेचे लक्षण होते.

आरकेमधील गणेशोत्सव व होळी
साधारण 1953 पासून आरके स्टुडिओमध्ये होळी व रंगपंचमीचा सण साजरा होण्यास सुरुवात झाली. रंगपंचमीला स्टुडिओला सुट्टी असे. स्टुडिओच्या आवारातील पाण्याचा मोठा हौद रंगीत पाण्याने भरून ठेवलेला असे. मोठय़ा डाइनिंग टेबलावर विविध प्रकारची मेवामिठाई, फरसाण भरून ठेवलेले असे. दुनियेतील अनेक जानेमाने सितारे तिथे सकाळपासून हजेरी लावत, त्याचबरोबर स्टुडिओतील सर्व कलाकार, तंत्रज्ञ व कामगार रंग खेळण्यास तिथे येत. बाहेर ऊन पडू लागल्यावर आतल्या हॉलमध्ये सर्वांचा गाणे, बजावणे व नृत्याचा कार्यक्रम चाले. सिताराचे धम्माल नृत्य हे त्यातील प्रमुख आकर्षण असे. सायंकाळी 5 वाजेपर्यत ही मौजमस्ती चाले. नंतरच्या काळात अनेकांनी राज कपूरचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, पण आरकेच्या रंगपंचमीची सर त्याला नव्हती. राजकमल आणि आरके या दोन स्टुडिओत भव्य असा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असे. अनंत चतुर्दशीला गिरगाव चौपाटीवर आरकेच्या भव्य गणेशमूर्तीचे विसर्जन होत असे. राज, शम्मी, शशी, सर्व कपूर मंडळी त्या मिरवणुकीत सामील होत. त्यांना पाहायला प्रचंड गर्दी होत असे.

मुंबईतील कापड गिरण्या गेल्या, सिंगल क्रीन थिएटर्स बंद पडली, रेडिओ सिलोन बंद झाले. आता स्टुडिओही आचके देत बंद पडत आहेत. एकेकाळचे हे भावविश्व आता पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सिनेरसिक ही सल, हे दुःख कधीही विसरू शकणार नाहीत. आरके स्टुडिओ ही कपूर कुटुंबीयांची खासगी मालमत्ता आहे, त्याचे काय करायचे? हा त्यांचा प्रश्न आहे. खरे आहे ते. स्टुडिओ विक्रीची बातमी वाचली आणि ‘प्यासा’मधील गाण्याची आठवण झाली, ‘देखी ज़माने की यारी, बिछडे सभी बारी बारी’.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या