पेटंटकार CEO

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • शैलेश माळोदे 

डॉ. रघुनाथ माशेलकर. अत्यंत देशाभिमानी शास्त्रज्ञ. हळद, बासमतीची पेटंटस वाचवण्यात मोलाचा वाटा. हिंदुस्थानी तरुणाईचे ‘ब्रेनड्रेन’ रोखण्याचे कृतीशील प्रयत्न… या साऱ्यांमुळेच डॉ. माशेलकर वैज्ञानिक म्हणून वेगळे ठरतात.

जागतिक बाजारपेठेत उत्पादनाला खूप महत्त्व असतं परंतु त्यापेक्षाही अधिक महत्त्व असतं ते उत्पादन तयार होण्यासाठी वापराव्या लागलेल्या बुद्धिमत्तेला आणि त्यातून साकारलेल्या नवप्रवर्तनाला म्हणजेच इनोव्हेशनला. त्यामुळेच बौद्धिक संपदाजन्य अधिकार (आयपीआर) आपण मान्य केलेच पाहिजेत. असं आग्रही प्रतिपादन करणाऱ्या डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांच्याशी सर्वप्रथम संबंध आला तो 1997 साली गोव्यात मडगावला भरलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनात. त्यानंतर तो काही ना काही कारणानं येतच राहिला. 2000 साली ते सीएसआयआर या 38 प्रयोगशाळांवर नियंत्रण असलेल्या परिषदेचे महासंचालक आणि हिंदुस्थान सरकारच्या वैज्ञानिक संशोधन विभागाचे सचिव होते. त्यांनी पेटंट आणि एकूणच बौद्धिक संपदाजन्य अधिकारांबाबत संस्थेला एका वेगळया पातळीवर तर नेलंच, पण जागतिक स्तरावरदेखील आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. हळदीचं पेटंट, बासमती अशा विविध प्रकरणांमध्ये त्यांनी देशाची बाजू उत्तम प्रकारे राखली.

रमेश माशेलकर म्हणून आपल्या मित्र परिवारात ओळखले जात असलेल्या डॉ. माशेलकरांचा जन्म 1 जानेवारी 1943 साली माशेल या गोव्यातील छोटय़ाशा गावात झाला. परिस्थितीशी झगडत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे त्यांना उत्तम गुण मिळून ते 1960 साली रासायनिक अभियंते झाले. 1966 साली. त्यांनी पीएचडी पदवी प्रसिद्ध रासायनिक अभियंते प्रा. एम. एम. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केली. प्रा. शर्मा यांच्याप्रमाणेच डॉ. माशेलकर देखील रॉयल सोसायटी लंडनचे फेलो म्हणजे एफआरएस आहेत. त्याचबरोबर ते रॉयल ऍकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग आणि इन्स्टिटय़ुशन ऑफ केमिकल इंजिनीअरर्सचेही फेलो आहेत. या प्रा. शर्मांच्या शिष्योत्तमाने आकाशवाणीच्या अभिगारासाठी त्यांची एक प्रदीर्घ आत्मकथनाची मुलाखत घेतली असून त्यांचीही तशी मुलाखतही ध्वनिमुद्रित झाली आहे. माशेलकर रेडिओ ऑटोबायोग्राफीसाठी मुलाखतकार आणि मुलाखत देणारे एकमेव वैज्ञानिक ठरले.

पद्मभूषण, पद्मविभूषण असे सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त डॉ. माशेलकर यांची करिअर सुरुवातीला ब्रिटनमध्ये होती. परंतु देशासाठी त्यांनी काम करावं असं त्यांना वाटत होतं. म्हणून मग ते 1976 साली पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. 1989 साली ते संस्थेचे संचालक बनले. तेव्हापासूनच त्यांनी आयपीआर संस्कृती वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले. ‘प्रकाशित करा’ (पब्लिश) ‘पेटंट मिळवा’ (पेटंट) आणि ‘समृद्ध व्हा’ (प्रॉस्पर) या तीन ‘पी’चा त्यांनी जयघोष आरंभला. ‘ट्रान्सपोर्ट फिलमिना’ म्हणून अभियांत्रिकी क्षेत्रात ओळखल्या जात असलेल्या क्षेत्रात विशेषत स्वेलिंग, सुपर स्वेलिंग आणि श्रीकिंग बहुवारिकांविषयी (पॉलिसर्स) त्यांनी संशोधन केलं. जेब्सविषयी ते अद्यापही संशोधन करत आहेत.

त्यांनी ग्लोबल रिसर्च अलायन्स या सार्वजनिक पैशातून संशोधन आणि विकास कार्य करणाऱ्या संस्थेचे आणि हिंदुस्थानच्या राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानचं (2000 ते 2018) अध्यक्षपदही भूषविलंय. त्यांनी पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम केलंय. त्यांनी सरकारद्वारे विविध विषयांसंदर्भात (उच्च शिक्षण, राष्ट्रीय इंधन धोरण, औषध नियमनप्रणाली, कृषी संशोधन प्रणालीवर) स्थापन केलेल्या समित्यांचे अध्यक्षपदही भूषविलंय.

वैज्ञानिक संशोधनाबरोबरच सायन्स लीडर/ प्रशासक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटविला असला तरी 2005 साली ते एका वादाच्या भोवऱ्यातही अडकले होते. 2005 पूर्वी जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य म्हणून हिंदुस्थानला ‘ट्रिप्स’ला अनुसरून पेटंटविषयक नियम तयार करायचे होते. यासाठी एक समिती डॉ. माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालबाबत त्यांच्यावर वाङ्मयचौर्याचा आरोप झाला होता. चूक तांत्रिक होती ती डॉ. माशेलकरांनी ‘प्रथमच असं घडतंय’ असं सांगत मान्य करून संपूर्ण अहवाल मागे घेतला होता. संसदेतही याविषयी चर्चा झाली. सरकारने संयुक्त समिती स्थापन करावी अशी मागणीही झाली. परंतु तज्ज्ञांच्या गटाने संपूर्ण परीक्षण करून मार्च 2009 मध्ये अहवाल दिला तो सरकारने मान्य केला. याकाळात डॉ. माशेलकरांना खूप मनस्ताप झाला. परंतु त्यांचं विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून इनोव्हेशन संस्कृती वाढविण्याचं काम सुरूच राहिलं.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी 2007 साली महासंचालकपद सोडून दिलं परंतु एनसीएलमध्ये संशोधन सुरू ठेवलं. त्यानंतर त्यांनी विविध पुस्तकेही लिहिली. तसेच त्यांनी खासगी क्षेत्रालाही संशोधनाची आयपीआरची सवय लागावी यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लि. या बड्या कंपनीच्या संचालकपदी काम करण्याचं मान्य केलं. सध्या ते त्या कंपनीच्या ‘रिलायन्स इनोव्हेशन काऊन्सिल’चे अध्यक्ष आहेत. ‘शास्त्रज्ञांनी करोडपती बनण्यात वावगे काय’ असा प्रश्न ते विचारतात, ‘फक्त आपलं आचरण शुद्ध आणि संशोधन स्वतःची बुद्धी खर्ची करूनच हवं त्यासाठी पेटंट मात्र घ्यावं’ असं ते पुढे सुचवितात. हिंदुस्थानच्या पहिल्या वैज्ञानिक सीईओचा सत्कार तरुणांना निश्चितच प्रेरक ठरेल, निदान या सद्यस्थितीत तरी नाही का?

[email protected]