अभिनेत्री! हिरॉईन नव्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनेश पाटील

शर्मिष्ठा राऊत… अभिनय क्षेत्रातील आश्वासक चेहरा… प्रायोगिक रंगभूमीचे संस्कार घेऊन तिची सकस वाटचाल सुरू आहे…

साधारण सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. तेजस डोंगरे या तरुण दिग्दर्शकाचा मला सकाळी फोन आला. एका शॉर्ट फिल्मसंदर्भात. मी आधी फार लक्ष दिलं नाही. शॉर्ट फिल्मसाठी फोटोग्राफी करावी असं तेव्हा मला अजिबात वाटलं नाही. काही मिनिटं आम्ही जुजबी बोललो. मी विषय सोडून दिला. पुन्हा काही दिवसांनी त्याचा फोन आला. तेजस आणि आशीष दोघे त्या प्रोजेक्टवर काम करत होते. आशीष म्हणजे आशीष जोशी. त्यावेळी या शॉर्ट फिल्मची मी सिनेमॅटोग्राफी करावी असं त्यांचं म्हणणं होतं. ‘‘सिनेमॅटोग्राफी आणि मी?’’ या प्रश्नानं माझ्या मनात वादळ उठलं आणि काही क्षणांतच मी ‘‘हो’’ म्हणून या नव्या कामाचा आम्ही श्रीगणेशा केला. खरं तर काही मराठी सिनेमांच्या काही विशिष्ट शॉट्ससाठी मी याआधी सिनेमॅटोग्राफी केलेली, परंतु इथे हा संपूर्ण लघुपट होता. लघुपटाचं नाव होतं ‘मन गुंतले तुझ्यात’ आणि कलाकारांची नावं होती… सचिन सुरेश, शर्मिष्ठा राऊत!

शर्मिष्ठा राऊत हे अभिनय क्षेत्रातलं लक्षवेधी नाव. अनेक सिनेमे, नाटक आणि मालिकांतून नेहमीचा संवाद साधणारा हा गोड चेहरा, तर सध्या गाजलेल्या ‘मराठी बिग बॉस’मुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला चेहरा. मराठी बिग बॉसनंतर शर्मिष्ठाने कलर्स मराठीवर ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून कमबॅक केलं. कधी हसवणारा तर कधी चटकन डोळ्यांत पाणी आणायला लावणारा हा चेहरा. पडद्यावरचा हा चेहरा पडद्यामागे किती खोडकर आहे हे या लघुपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं मला समजलं. फोटोग्राफीची संधी मला तशी फार कमी मिळाली होती. मात्र, शूटमधल्या मोकळ्या वेळेत आम्ही मनसोक्त फोटोशूट केलं. काही फोटो तर मी मुद्दाम मला हवे तसे काढूनही घेतले होते. त्यातील सकाळच्या कोवळ्या उन्हात झाडामागून हसणारा शर्मिष्ठाचा गोड चेहरा लघुपटासाठी तर आम्ही रेकॉर्ड केलाच. मात्र, हीच मार्ंनग ग्लोरी मी फोटो टिपून कॅमेराबद्धदेखील केली. पिवळ्या रंगाच्या वेशभूषेत शर्मिष्ठा खूपच उठून दिसत होती, तर याच लघुपटाच्या शेवटच्या दिवशी आम्ही काही फोटो विशेष टिपले होते. त्यापैकी लक्षात राहिलेला हा तिचा दुसरा फोटो.

महाविद्यालयीन काळात शर्मिष्ठाची नाळ अभिनयाशी जोडली गेली अन् तिने प्रायोगिक रंगभूमीवरून अभिनय क्षेत्राचा श्रीगणेशा केला. मात्र, पदव्युत्तर शिक्षणानंतर तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला अन् नोकरीत ती काही काळ रमलीदेखील. प्रायोगिक नाटय़भूमी अन् नोकरी असा तिचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास सुरू असतानाच तिला 16 मार्च 2008 रोजी ‘मी मराठी’ वाहिनीवरील ‘घे भरारी’ या मालिकेसाठी अभिनय करण्याची संधी मिळाली अन् इथूनच तिचा प्रवास व्यावसायिक अभिनयाच्या दिशेने सुरू झाला. प्रायोगिक रंगभूमीवरून छोटय़ा पडद्यावर शर्मिष्ठा झळकली अन् तिचा गोड चेहरा घराघरात पोहचला. प्रायोगिक रंगभूमीवर विशेष यश संपादित केल्यानंतर शर्मिष्ठाने मालिकांची वाट धरली खरी. मात्र, तिने रंगभूमी सोडली नाही हे तिच्या मागील काही नाटकांतून सातत्याने पाहायला मिळालं. व्यावसायिक रंगभूमीवर साकारलेल्या ‘जो भी होगा देखा जायेगा’ या नाटकातल्या तिच्या भूमिकेला ‘मटा उत्कृष्ट अभिनेत्री 2011’ चा पुरस्कार लाभला, तर ‘मायलेकी’ या नाटकातील तिच्या भूमिकेमुळे तिला 2012 साली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. ‘बायको असून शेजारी’ या नाटकात शर्मिष्ठाने साकारलेल्या भूमिकेलाही रसिकांनी चांगलीच पसंती दाखवली होती.

व्यावसायिक रंगभूमी आणि छोटय़ा पडद्यावर सतत विविध व्यक्तिरेखा साकारलेल्या शर्मिष्ठाचं ब्रीदवाक्यच तिच्या यशाचं गमक सांगून जातं. मला अभिनेत्री व्हायचयं, हिरॉईन नाही, असं शर्मिष्ठा अभिमानानं सांगते. अभिनयातून विविध व्यक्तिरेखा साकारण्यात ती आनंद मानते. मात्र, हिरॉईन होण्यामागच्या ग्लॅमरची ओढ तिला नाही आणि म्हणूनच मोजक्या सिनेमांतून तिनं काम केल्याचं समजतं. ‘नवरा माझा भवरा’, ‘योद्धा’ (आगामी) तर नुकताच लोकप्रिय ठरलेल्या ‘रंगकर्मी ’या सिनेमातून शर्मिष्ठा रुपेरी पडद्यावर झळकली. याच्या जोडीनेच ‘मन गुंतले तुझ्यात’ या लघुपटातही तिची असलेली मध्यवर्ती भूमिका विशेष गाजली होती.

कसदार अभिनेत्री होण्यामागे घरच्यांचं पाठबळ महत्त्वाचं असल्याचं शर्मिष्ठा मानते. वडील- भरत, आई- रंजना आणि बहीण- सुप्रिया या सगळ्यांचा तिच्या यशात खारीचा वाटा असल्याचं ती सांगते. शर्मिष्ठा आणि मी या लघुपटाच्या निमित्ताने एकत्र आलो खरं. लघुपटाचं शूट काही दिवसांत संपलंदेखील. मात्र तेव्हाची टीम कायमची माझ्याशी जोडली गेली हे विशेष!

[email protected]