
>>विवेक दिगंबर वैद्य
साईबाबांचे शिष्य म्हणून सर्वत्र सुपरिचित असलेल्या उपासनीबाबा (साकुरी) यांच्या अवतारकार्याची ही ओळख.
माणसाचे भागध्येय नियतीने निश्चित केलेले असते. त्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न कुणीही कितीही केला तरी ‘जो होता है वो मंजूरे खुदा होता है।’ या वचनाची सत्यता श्रीउपासनी महाराजांचे अवतारकार्य पाहिले की लागलीच पटते. परमेश सहवास, सिद्धसत्पुरुषाचे मार्गदर्शन, आधुनिक विचारांचा सातत्याने घेतलेला ध्यास, त्यासोबत येणारी अपरिमित उपेक्षा आणि आयुष्यभर त्रास देणाऱया अनाकलनीय स्थित्यंतरांतूनही ठळकपणे जाणवणारी बंडखोर स्वभावाची झलक हे आणि असे अगणित पैलू असलेली श्रीउपासनी महाराजांची जीवनगाथा ही खरे तर एखाद्या कादंबरीचा किंवा चित्रपटाचा विषय होण्याइतपत रंजक आहे.
निव्वळ अनवधानाने कोळशाच्या खाणीमध्ये अडगळीत पडलेला काशीनाथ गोविंद उपासनी नावाचा अस्सल हिरा शिर्डी येथे वस्ती करून राहिलेल्या त्रिकालदर्शी रत्नपारख्याने हेरला, पारखला आणि त्यावर साईकृपेचे पैलू पाडून व्यवहारी जगताच्या सुपूर्द केला, परंतु या दुर्दैवी समाजाने मात्र त्या हिऱयामधील वैगुण्य शोधण्याचे दरिद्री उद्योग अवलंबिले. या प्रकारामुळे त्या हिऱयाचे कसलेही नुकसान झाले नाही. कारण तो अभंग होता आणि आजही अभंगच आहे, मात्र नुकसान झाले ते या समाजाचेच.
नाशिकजवळील सटाणा येथे राहणाऱया गोविंदशास्त्राr उपासनींना सहा मुले होती. त्यातील दुसऱ्या क्रमांकावर जन्मलेल्या काशीनाथने शिक्षण घेण्यास प्रारंभ केला, मात्र जनरीतीनुसार बालवयातच त्याच्या मानगुटीवर विवाहबंधनाचे जोखड ठेवण्यात आले. खरे पाहता त्या निष्पाप मुलाला तोवर प्रपंच, संसार, लग्न, मुलेबाळे या शब्दांचा अर्थही नीटसा उमगला नव्हता. त्यामुळे त्याच्या मनात संसाराविषयीचे अनाकर्षण वाढते झाले. संसारतापाचा उबग आलेला हा कोवळा जीव घरदार सोडून धुळ्यामार्गे नाशिकला आला. तेथे भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवता झाला. दरम्यान इथे किरकोळ आजाराचे निमित्त होऊन त्याची पहिली पत्नी दगावली आणि या घटनेचा फायदा घेऊन काशीनाथ आपले आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार घालविण्यासाठी नाशिकहून परागंदा झाला. मात्र काशीनाथला प्रपंचाच्या बेडीत अडकवून ठेवला तरच तो सुधारेल अशी ठाम धारणा असलेल्या त्याच्या कुटुंबीयांनी त्याला शोधून काढले आणि त्याचे दुसरे लग्न करण्याचा डाव मांडला. संसाराच्या पहिल्या बेडीतून सुटका झाल्याचा आनंद ओसरेपर्यंत पुन्हा बोहल्यावर चढण्याच्या कल्पनेने वैराग्यजीव धास्तावला. काशीनाथ घरादाराचा त्याग करून कायमचा निघून गेला.
पुण्याच्या दिशेने निघालेल्या काशीनाथने कधी ओंकारेश्वराच्या देवळात राहून तर कधी इथे तिथे दिवसरात्र काढून, कधी भिक्षा मागून तर कधी उपाशीपोटी राहून खडतर तपसाधना सुरू केली. पुढे पुण्याहून निघालेला काशीनाथ कल्याण येथे आला. परिसर अनोळखी होता त्यामुळे काशीनाथवर उपासमारीची वेळ आली. स्वतः उच्चवर्णीय ज्ञातीचा असल्यामुळे ब्राह्मणाकडूनच भिक्षा घ्यायची अशा विक्षिप्त निश्चयामुळे काशीनाथवर अनेकदा उपासमारीची पाळी येत असे. पाण्याने भूक भागविणाऱ्या, उपाशीपोटी वणवण फिरणाऱ्या या पोराचे दुःख कुणा एका माऊलीला जाणवले. कळवळ्यापोटी तिने काशीनाथला अन्न दिले परंतु तिचे ब्राह्मणेतर असणे ‘दाता व याचक’ या संबंधाच्या आड आले आणि काशीनाथ तिथूनही उपाशीपोटीच निघाला.
पावसापाण्यातून उपाशीपोटी तडफडत काशीनाथ नाशिकच्या दिशेने निघाला. नाशिक मुक्कामी एका डोंगरावरील कपारीमध्ये त्याने मुक्काम ठोकला. गलितगात्र अवस्थेतील काशीनाथने जेथे बैठक मारली तिथेच त्याला समाधी लागली. तो स्वात्मसुखाचा अत्युच्च आनंद अनुभवू लागला. पूर्वी उपाशीपोटी असताना त्याच्या मनात मरणाचे विचार येत असत परंतु आता आपल्याला रित्यापोटी प्राप्त होणारा हा आनंद नेमका कसला आहे हे त्याला उमगले नाही. मात्र हा आनंद अवर्णनीय असल्याची जाणीव त्याच्यासाठी विलक्षण सुखकारक होती.
काही वेळ गेल्यानंतर समाधी उतरली. आपण कुठे आहोत, काय करीत आहोत याचे भान नाहीसे झाले. वास्तवाची हलकीशी जाणीव झाली तशी काशीनाथ ठेचकाळत, धडपडत खाली आला. समाधीवस्थेच्या अनुभवामुळे मन तृप्ततेने शिगोशिग भरले असले तरीही पाय जमिनीवर येताच भुकेने कासावीस झालेल्या पोटाने अन्नाची मागणी केली. एवढ्यात तेथे आलेल्या दोन गवळणींनी काशीनाथला दूध व नाचणीची भाकरी दिली. तोवर भेदाभेद आणि आपपरभावाची जाणीव नष्ट झालेल्या काशीनाथास समोर आलेले अन्न स्वीकारण्यास अवघड गेले नाही. बऱ्याच दिवसांनंतर मिळालेल्या अन्नामुळे त्याला थोडी तरतरी आली. त्यानंतर काही दिवस काशीनाथने त्या गावातील गवळ्यांमध्येच व्यतित केले आणि पुढे त्याला आपल्या घरादाराची आठवण येऊ लागली तसा तो माघारी परतला.
बऱ्याच कालावधीनंतर माघारी परतलेल्या काशीनाथला त्याच्या घरची बिकट अवस्था पाहावी लागली. अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे अंथरुणास खिळलेले आजोबा आणि वडिलांचा अकाली मृत्यू या बातम्या ऐकून सुन्न झालेल्या काशीनाथने चरितार्थासाठी कंबर कसली आणि सांगलीतील वेदशास्त्र पारंगत वैद्यकतज्ञ व्यंकट रमणाचार्य यांच्या सेवेत तो रुजू झाला.
कुशाग्र बुद्धीचा काशीनाथ, वैद्यकतज्ञ व्यंकट रमणाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदशास्त्रात प्रावीण्य मिळवता झाला आणि वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून लोकहिताचेही कार्य करावे या निष्कर्षाप्रत आला. आयुर्वेदशास्त्रात पारंगत काशीनाथने घरातल्या घरात काढे, अरिष्ट तयार करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या प्रोत्साहनाने तो ‘भेषज रत्न’ नावाचे वैद्यकीय माहितीवर आधारित मासिक प्रकाशित करू लागला. काशीनाथचे हे बदललेले रूप पाहून आनंदित झालेल्या घरच्या मंडळींनी त्याचा दुसरा विवाह करून दिला. पत्नी दुर्गाबाईच्या साथीने काटकसरीचा सुरेख मेळ साधून काशीनाथ पुढे दहा वर्षे संसार करता झाला.
धर्मार्थ दवाखान्याच्या माध्यमातून काशीनाथ अडल्यानडलेल्यांची माफक खर्चात सेवाशुश्रूषा करीत असे. सर्वकाही यथायोग्य चालले असले तरी काशीनाथचा जीव तळमळत होता, काहीतरी अपूर्ण असल्याची जाणीव मन कुरतडत असे. याच दरम्यान त्याला एका खटल्यात निष्कारण गोवण्यात आले. विनाकारण मानहानी झाली. कारावासही भोगावा लागला. मेहनतीने उभारलेल्या सेवाकार्याचा डोलारा कोसळला आणि अखेर काशीनाथने दुर्गाबाईंसोबत अगदी मोजक्या सामानासह घर सोडले. (क्रमशः)





























































