
द्वारकानाथ संझगिरी
हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानी संघाच्या अहंकाराला जखम केली, पण त्या जखमेवर तिखट आणि मीठ चोळलं ते अफगाणिस्तानने. ते त्यांना जखमेपेक्षा जास्त झोंबतेय. हिंदुस्थानने हरवणं म्हणजे क्रिकेटमधल्या दादाने कानाखाली आवाज काढणं होतं; पण अफगाणिस्तानने हरवणं म्हणजे ज्यांनी उभं राहायला शिकवलं, धडे दिले त्यांनी लोळवलं. हे लोळवणं म्हणजे उचलून आपटणं होतं.
पाकिस्तानी संघ सध्या ज्वालामुखीच्या मुखावर बसलाय. अफगाणिस्तानला जो जिंकण्याचा आनंद झाला तो केवळ पाकिस्तानला क्रिकेटमध्ये हरवण्याचा आनंद नव्हता. तो होताच, पण त्याचबरोबर सुप्त पख्तुनी राष्ट्रवाद जो पाकिस्तानच्या पख्तुनी प्रांतात जाणवतो तोसुद्धा त्या आनंदाचा भाग आहे. म्हणून तर अफगाणिस्तानचा ‘मॅन ऑफ द मॅच’ अॅवॉर्ड मिळवलेला खेळाडू म्हणाला, ‘हा विजय मी ज्या अफगाण तरुणांना पाकिस्तानातून अफगाणिस्तानात परत पाठवलं त्यांना हा विजय मी अर्पण करतोय.’ चक्क राजकीय विधान केलं गेलं आणि तेही जगाच्या रंगमंचावरून. राशीद खानने हिंदुस्थानी फॅन्सचे आभार मानले. क्रिकेटचा विचार केला तर मॅच चेपॉकवर ठेवणं हे अफगाणिस्तानसाठी फायद्याचं होतं. त्यांची ताकद फिरकी गोलंदाजी आहे आणि चेपॉकची खेळपट्टी त्यासाठी प्रसिद्ध.
त्याचा दबाव पाकिस्तानवर आधीपासूनच होता. पण ते हरले फक्त फिरकीमुळे नाही. त्यांना अफगाणी फलंदाजांनी हरवलं डोक्याने फलंदाजी करून. ते आयपीएल खेळतात त्याचा फायदा त्यांना झाला.
हिंदुस्थानात पाकिस्तानविरूद्ध त्यांना पाठिंबा मिळणार हे उघड होतं. त्यांचं तालिबानी सरकार हे घृणास्पद असेल, पण फार पूर्वीपासून पठाणी मंडळी हिंदुस्थानात लोकप्रिय आहेत. सरहद्द गांधी म्हणजे खान अब्दुल गफार खानपासून. ते छोटय़ा व्यापारासाठी येत. त्यांच्याबद्दल भीतीही होती. पठाणी व्याज शब्द तिथूनच आला. पठाणी गँग प्रसिद्ध होत्या. हिंदी सिनेमांत अनेक पठाणी नट-नटय़ांनी पडदा गाजवला. मधुबाला, दिलीप कुमारपासून शाहरुखपर्यंत. ‘काबुलीवाला’सारखा सिनेमा त्यांच्यावर निघाला.
पख्तुनिस्तान पाकिस्तानमध्ये गेलं हे त्यांनाही आवडलं नाही. त्यामुळे त्यांचे आणि पाकिस्तानी पंजाबी मुसलमान यांचे संबंध फारसे चांगले राहिले नाहीत. धर्म दोन माणसांना जोडतो असं नाही. संस्कृती उलट बऱयाचदा जोडते. नाहीतर बांगलादेश फुटला कशाला असता आणि पख्तुनी पठाण पाकिस्तान हरल्यावर इतके नाचले का असते?
हिंदुस्थानी खेळपट्टीवर अफगाणी संघाची ताकद मोठी आहे. कारण त्या त्यांच्या ताकदीला पोषक आहेत आणि सोबत मायभूमीत खेळत असल्यासारखा पाठिंबा आहे.
पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? हिंदुस्थानविरुद्ध त्यांनी 284 धावा केल्या होत्या. त्या मोठय़ा वाटल्या नाहीत. कारण रोहित शर्माची बॅट मशीनगन झाली. नाहीतर आपल्याला वाट सोपी नव्हती.



























































