
>>डॉ. उदय धुरी<<
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या बलाढय़ अफझलखानाचा कोथळा काढून दहशतवाद कसा संपवावा याचा परिपाठच जगासमोर ठेवला. या विषयीची इत्थंभूत माहिती शालेय इतिहासापासून अनेकदा आपण वाचली असेल. अफझलखानाचा वध ही छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अत्यंत जोखमीची आणि तितकीच रोमहर्षक कामगिरी. ती करताना महाराजांनी केलेली सिद्धता कौटिल्याने अर्थशास्त्रात सांगितलेल्या सूत्रांप्रमाणेच आहे. अफझलखान वधाचे संपूर्ण नियोजन करताना शिवाजी महाराजांनी कशाकशाचा आधार घेतला या विषयीची माहिती या लेखातून मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. आजच्या तिथीनुसार असलेल्या शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने…
जावळी हे छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील भौगोलिक आणि राजकीयदृष्टय़ाही एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण. बाजूला सह्याद्री तर दुसऱ्या बाजूला महाबळेश्वरचा डोंगर अशा खाचेत वसलेल्या जावळीला घनदाट जंगलाचे चिलखत होते. कृष्णाजी बाजीच्या चंद्रराव पदाला पाठिंबा देऊन छत्रपती शिवरायांनी 1647 मध्ये जावळीच्या राजकारणात प्रवेश केला होता. शिवरायांची राज्यविस्ताराची पावले बघून आदिलशहाने 1649 मध्ये अफझलखानाची वाईचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर अनेक राजकारणे होऊन आदिलशहाने 1655 मध्ये अफझलखानाला वाईतून बोलावून कर्नाटकच्या मोहिमेवर पाठवले. पुढे 1656 च्या आसपास कृष्णाजी उपाख्य चंद्रराव मोरे शिवरायांचे उपकार विसरला. स्वराज्याचा मुलखात मस्ती करू लागला. महाराजांनी त्याला समजावण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ ठरला. अखेर 15 जानेवारी 1656 रोजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून हा नैसर्गिक आणि आर्थिकदृष्टय़ा समृद्ध प्रदेश स्वराज्याला जोडला. पुढे फितुरी करणाऱ्या चंद्ररावाला ठार केले आणि खऱ्या अर्थाने जावळी महाराजांची झाली.
महाबळेश्वरच्या पश्चिमेला असलेल्या भोरप्या डोंगरावर शिवरायांनी प्रतापगड बांधला. भविष्यातील एका फार मोठय़ा युद्धनाटय़ासाठी प्रतापगड तयार झाला. बडय़ा बेगमेने धर्मवेडय़ा, अत्यंत पराक्रमी, आदिलशहावर आत्यंतिक निष्ठा असलेल्या, क्रूर आणि अहंकारी अफझलखानाची नियुक्ती हिंदवी स्वराज्याचा घास गिळण्यासाठी केली. अफझलखान किती पराकोटीचा अहंकारी होता याचा प्रत्यय त्याच्या शिक्क्यातून येतो. त्याने शिक्क्यावर लिहिले होते ः
गर्र अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफझल
अझ हर मुल्की बजाए तसबीह आवाझ आयद अफझल अफझल
अर्थ : उच्च स्वर्गाला उत्तम माणसांची उत्तमता आणि अफझलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवण्याची इच्छा झाली, तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतील (नामाच्या) आवाजाऐवजी अफझल अफझल असे शब्द येतील.
त्याचा हा अहंकार अयोग्य असला तरी त्याच्यामागे त्याची व्यक्तिगत कारणे होती. बिदर कल्याणी भागात लढताना त्याच्यामुळे प्रत्यक्ष औरंगजेबावर कैदेत पडण्याची वेळ आली होती, पण औरंगजेबाने खान महंमदाला आपल्या बाजूला वळवून स्वतःची सुटका करून घेतली. मात्र हे कळताच अफझलखान ती मोहीम तशीच टाकून विजापूरला परतला. त्याचा राग दूर करण्यासाठी बडय़ा बेगमेने खान महंमदाला परत बोलावले आणि विजापुरात शिरता शिरता त्याची हत्या केली. असे अनेक पराक्रम अफझलखानाच्या नावावर होते. हा खान भोसले घराण्याचा द्वेष करत होता. शहाजीराजांना बेडय़ा घालून विजापूरला नेणारा, शिवरायांचा मोठा भाऊ संभाजी याच्या मृत्यूला कारण ठरलेला अफझलखानच होता.
अफझलखानाचा पहिला मुक्काम विजापुराजवळ तोरवे गावी पडला आणि खानाला पहिला अपशकुन झाला. त्याचा निशाणाचा फत्तेलष्कर हत्ती तडकाफडकी मेला. आदिलशहाने आपला खास बिनीचा हत्ती लगोलग खानाकडे पाठवला. मोहीम चालू राहिली, तरी शकुनापशकुन मानणाऱ्या त्या काळातील लोकांवर याचा कसा आणि किती परिणाम झाला असू शकेल त्याचा अंदाज करता येतो. खानाचा हत्ती मेला हा अपशकुन मानला, तर इकडे शिवाजी महाराजांची पत्नी सईबाईसाहेब यांना भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्दशी, 5 सप्टेंबर 1659 या दिवशी देवाज्ञा झाली. तसे पाहता हा मोठा अपशकुन मानायला हवा, पण मग राजांचे जे विविध गुण कौटिल्याने दिले आहेत. त्यानुसार निश्चयी स्वभाव, देश, काल आणि पुरुष यांचे प्रयत्न यांनी साध्य होणाऱ्या कार्याला प्राधान्य देणारे असे छत्रपती शिवाजी महाराज असल्याने त्यांनी आपले राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन यांची सरमिसळ कधी होऊ दिली नाही.
तिकडे अफझलखानाला अपशकुन होत होते आणि इकडे राजांना मात्र शुभशकुन झाला. प्रत्यक्ष देवी स्वप्नात येऊन राजांना म्हणाली, ‘हे वत्सा, त्याला तलवारीच्या जोराच्या वाराने भूमीवर पाड. हे दैत्यशत्रो, सध्यासुद्धा तुळजापूर सोडून तुझ्या सहाय्यार्थ मी स्वतः जवळ आले,’ असे समज. (अणूपुराण-कविंद्र परमानंद, सभासदाची बखर, उद्धृत श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, वा. सी. बेंद्रे, पृ. अनुक्रमे 189, 175). महाराजांनी हिंदुस्थानी युद्धनीतीतील सर्वांत शेवटचा पर्याय सुचवला. ते म्हणाले, ‘सला केलियाने प्राणनाश होईल. युद्ध करिता जय जाहलियाने उत्तम आणि मेलियानेही कीर्ती आहे. याजकरता युद्ध करावे.’ यानंतर पुढची तजवीज करून महाराजांनी निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
अर्थशास्त्रात ईश्वरी सहाय्याचा उपयोग युद्धात कसा करून घ्यावा हे कौटिल्य पुनःपुन्हा सांगतो. दुर्गलम्भोपाय या तेराव्या अधिकरणात, विजिगिषू परग्राममवाप्तुकामः सर्वज्ञदैवतसंयोगख्यापनाभ्यां स्वपक्षमुद्धर्षयेत् परपक्षं चोद्वेजयेत। (13.1.1) येथे संदर्भ शत्रूची राजधानी घेण्याचा आहे. शत्रूची राजधानी घ्यायची असेल तर विजिगिषूने आपले सर्वज्ञत्व आणि आपला देवतांशी असलेला संपर्क या गोष्टी घोषित करून स्वतःच्या लोकांना उल्हासित करावे आणि शत्रूच्या लोकांना घाबरवून सोडावे. याच अधिकरणात पुढे 7 ते 10 या सूत्रांमध्ये कौटिल्य सांगतो, भविष्यकथन करणारे, शकुन सांगणारे, मुहूर्त पाहणारे आणि गुप्तहेर इत्यादींनी राजाच्या सर्वज्ञतेची आणि दैवतसंयोगाची गोष्ट स्वतःच्या देशात पसरवावी. शत्रूच्या देशात त्यांनी विजिगिषूला देवतांचे दर्शन होत असल्याचे आणि दिव्य कोश अन् दिव्य सैन्य प्राप्त झाल्याचे सांगावे. राजाची सर्वज्ञता आणि देवता संपर्क याविषयीचा उल्लेख दहाव्या अधिकरणात कूटयुद्धाच्या ठिकाणीही येतो. असाच उल्लेख याच अधिकरणातील वेगवेगळय़ा व्यूहरचनांच्या अध्यायात येतो. त्या ठिकाणी आपल्या राजाचा देवतांशी असलेला संपर्क सांगून शत्रूसैन्यात भीती उत्पन्न करावी, असे कौटिल्याचे मत आहे (10.6.48-50). राजांची ईश्वरनिष्ठा अखंड मान्य करूनही मंत्रयुद्धातील देवता संपर्क या उपायाचा उपयोग छत्रपती शिवरायांनी केलाच नसेल, असे ठामपणे सांगता येत नाही. पुढे खान राजांच्या भेटीला येणार हे निश्चित झाल्यावर शिवरायांनी आणखी एक गोष्ट केली. खानासारखी मोठी व्यक्ती येणार म्हटल्यावर त्यांचा योग्य तो मानसन्मान ठेवला पाहिजे म्हणून वाई ते प्रतापगड हा अवघड रस्ता आपल्यासाठी आम्ही सुघड करून देतो, असे पंतांनी खानाला सांगितले. खानाला यात काहीही चुकीचे वाटले नाही. राजांनी वाई ते प्रतापगड या रस्त्यावरची झाडे तोडून मार्ग स्वच्छ केला, पण त्याच वेळी त्या तोडलेल्या फांद्यांनी इतर छोटय़ा वाटा बंद केल्या. कौटिल्य सांग्रामिक या दहाव्या अधिकरणात अगदी हीच सूचना करतो. शत्रुणामापाते कूपकूटावपातकण्टकिनीश्च स्थापयेत् । (10.1.12) म्हणजे शत्रू येण्याच्या मार्गावर विहिरी, झाकलेले खड्डे, काटेरी तारा टाकाव्यात. अफझलखानाचा विचार केला तर तो स्वतः येऊन पोहोचला होता. त्यामुळे तो परत जाऊ नये याची तजवीज करायची होती. म्हणून महाराजांनी मुख्य मार्ग स्वच्छ केला, पण इतर छोटय़ा वाटा बंद करून टाकल्या. कोणत्याही परिस्थितीत शत्रूला संपवण्याची सर्व सिद्धता शिवाजी राजांनी केली आणि शके 1581, 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी हिंदवी स्वराज्याचा एक मोठा शत्रू संपवला. पित्याच्या अपमानाचा आणि भावाच्या मृत्यूचा सूड घेतला गेला. न भूतो न भविष्यति असा विजय छत्रपतींनी मिळवला. या विजयामुळे त्यांचा दरारा सर्वत्र पसरला. शिवाजी राजे एक शूर, मुत्सद्दी आणि विजिगिषू व्यक्तिमत्त्व म्हणून मान्यता पावले.
(लेखक हिंदू जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते आहेत.)






























































