
>> वैभव मोहन पाटील
अभ्यास, परीक्षा, दैनंदिन वेळापत्रकाच्या गडबडीत मुले आपल्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करतात व ऐन परीक्षेच्या वेळी प्रकृतीच्या तक्रारी उद्भवल्याने मागे पडतात. बहुतांश विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही परिस्थिती उद्भवते. वर्गात व इतर परीक्षांमध्ये हुशार व अग्रेसर असणारी मुले मग अंतिम परीक्षेत तब्येत ठीक नसल्याने पेपर व्यवस्थित सोडवू शकत नाहीत. परीक्षा व अभ्यासाचा नको तितका ताण सध्याची मुले घेताना दिसतात. अभ्यासाबरोबरच आरोग्यही महत्त्वाचे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या. बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष. त्यामुळे अनेक महिन्यांपासून विद्यार्थी अभ्यासात मग्न होते. राज्यातील 10,664 महाविद्यालयांतील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. ज्यात 7 लाख 99 हजार 773 विद्यार्थी हे विज्ञान शाखेची, 3,80,692 विद्यार्थी कला शाखेची, तर 3,20,152 विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देत आहेत. 3387 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. यंदा परीक्षा नियोजित वेळेपेक्षा अगोदर सुरू झाल्या असून निकालही लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.
खरे तर दहावी व बारावीची वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची व टार्ंनग पॉइंट ठरणारी वर्षे. त्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थी सर्व शक्तीनिशी या परीक्षेची तयारी करण्यात व्यग्र असतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय, पदवी यांसारख्या शाखांची दारे इथूनच पुढे उघडत असल्याने शैक्षणिक करीअरच्या दृष्टीने मुले अगदी झोकून देऊन अभ्यासात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळते. वर्षभर मुले अगदी मन लावून अंतिम परीक्षेची तयारी करत असतात. मात्र वर्षभर तयारी केल्यानंतर ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांचे आजारपण जर आडवे आले तर? कल्पनाही करवत नाही ना! हा विचार करूनच विद्यार्थी व पालकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. मात्र अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपले आरोग्यदेखील तितक्याच तळमळीने जपले पाहिजे.
अभ्यास, परीक्षा, दैनंदिन वेळापत्रकाच्या गडबडीत मुले आपल्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करतात व ऐन परीक्षेच्या वेळी प्रकृतीच्या तक्रारी उद्भवल्याने मागे पडतात. बहुतांशी विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही परिस्थिती उद्भवते. वर्गात व इतर परीक्षांमध्ये हुशार व अग्रेसर असणारी मुले मग अंतिम परीक्षेत तब्येत ठीक नसल्याने पेपर व्यवस्थित सोडवू शकत नाहीत. परीक्षा व अभ्यासाचा नको तितका ताण सध्याची मुले घेताना दिसतात. प्रचंड अभ्यास करण्याच्या ईर्षेने दैनिक वेळापत्रकात बदल करतात. रात्री उशिरापर्यंत जागरण करत अभ्यास करणे, रात्रीचे जेवण उशिरा व अवेळी करणे, अभ्यासाकरिता जागे राहण्यासाठी चहा, कॉफी यांसारख्या उत्तेजक पेयांचे वारंवार सेवन करणे, अनियमित व्यायाम व शारीरिक हालचाली या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होतो. रात्री उशिरापर्यंत जागल्याने सकाळच्या वेळी मरगळल्यासारखे वाटणे, निरुत्साही वाटणे, जागरणाचा त्रास होणे, ऑसिडिटीसारख्या समस्या उद्भवणे, अपचन, पोटात दुखणे, मळमळ, स्मरणशक्ती मंदावणे यांसारख्या कुरबुरी वाढतात व त्यांचा थेट परिणाम परीक्षेतील पेपर सोडवण्यावर होतो. परीक्षागृहात प्रकृतीने साथ न दिल्याने इच्छा असूनही पेपर सोडवण्यात अडचणी येतात व पूर्ण शैक्षणिक वर्षात हुशार असणारी मुले परीक्षेच्या निकालात मात्र मंदावतात. या सर्व बाबी या ठिकाणी मांडण्याचे कारण विद्यार्थ्यांचे मनोधैर्य कमी करण्याचा मुळीच नाही. मात्र मुलांनी अभ्यासाबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे पर्याप्त लक्ष देण्याची आवश्यकता यामधून अधोरेखित करू इच्छितो.
वेळच्या वेळी जेवण, जेवणात तेलकट, तिखट न खाता हलका आहार, कमीत कमी जागरण, पहाटेचा अभ्यास, थोडा शारीरिक व्यायाम या सर्व बाबी आपल्या बुद्धीवर व परीक्षेतील काwशल्यावर नक्कीच परिणाम करतील. या बाबी आपण कटाक्षाने पाळल्या तर आपला वर्षभराचा अभ्यास व मेहनत वाया जाणार नाही. केलेल्या अभ्यासाची केवळ उजळणी करावी व प्रसन्न मानसिकतेत पेपर सोडवावेत. मुलांच्या पालकांनीदेखील त्यांच्यावर अधिक दडपण न आणता त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य काळजी घेतली पाहिजे.
परीक्षा कालावधीत अभ्यासाबरोबरच आरोग्य हादेखील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे हे पालकांनी अगोदर स्वतःच्या व पाल्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे व त्या दृष्टीने योग्य काळजी घेतली पाहिजे. मुलांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परीक्षा कालावधीत मोबाईल, टीव्ही, अनावश्यक गप्पाटप्पा यांसारख्या गोष्टींबरोबरच शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम करणाऱया घटकांपासून तसेच सवयींपासून दूर राहिले पाहिजे.
कोणत्याही दिव्यातून जाण्यासाठी आधी आपले शरीर सुदृढ असले पाहिजे. शरीर निरोगी, सशक्त, सुदृढ व प्रसन्न असेल तर सर्व जबाबदाऱया आपण यशस्वीपणे पेलू शकतो. अभ्यासात आवश्यक असणारी स्मरणशक्ती तल्लख राहण्यासाठी शरीर व मनाला फार त्रास देऊन जमणार नाही. आरोग्याने उत्तम असणारी मुलेच अभ्यासात प्रगती करतात व पुढे जातात. त्यामुळे मुलांनी वाईट व्यसने व कुसंगती यांपासून चार हात लांब राहणेच चांगले. व्यायाम, वाचन, वेळच्या वेळी आहार व अभ्यास यांचे यथायोग्य पालन करणे हिताचे आहे. सध्या सुरू असलेल्या बारावी व दहावीच्या परीक्षांसाठी बसलेल्या सर्व मुलांनी या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आपली अभ्यासाची तयारी पूर्ण असेलच. मात्र तब्येतदेखील उत्तम ठेवून अभ्यास व आपल्या मेहनतीला न्याय द्या व परीक्षेला सामोरे जा. यश तुमचेच असेल!
































































