ऍमेझॉनच्या वर्षावनातील अग्नितांडव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक राजूरकर

गेल्या काही दिवसांत ब्राझीलमधील ऍमेझॉनच्या वर्षावनात मोठय़ा प्रमाणात आगीचे तांडव सुरू आहे. त्यामुळे रोजच आषाढस्य प्रथम दिवस असलेल्या वर्षावनात वैशाख वणव्याने निसर्गाची प्रचंड हानी होत आहे. आकाशाला गवसणी घालणाऱया वृक्षांच्या जागी धुराचे लोट आणि प्राणवायूची जागा उत्सर्ग वायूने घेतली आहे.

जंगल म्हणजे केवळ घनदाट वृक्ष, हिंस्र पशू हा साधारण समज प्रचलित आहे; परंतु रेन फॉरेस्ट म्हणजेच वर्षावनं ही इतर वनांच्या तुलनेत शास्त्राrय, भौगोलिक, जैवविविधता आणि मुख्यत्वे तापमानाच्या बाबतीत आपले वेगळे वैशिष्टय़ ठेवून आहेत. उष्णकटिबंधीय वर्षावनं ही प्रामुख्याने सरासरी पाऊस, आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष, हिरवळ यावर आधारलेली आहेत. अभ्यासकांनी त्यात शास्त्राrय विभागणी केली आहे. इतर वनांच्या तुलनेत वर्षावनं ही अतिघनदाट श्रेणीत येतात. वर्षावनातील बहुतांशी भागात सूर्यकिरणांचा आणि जमिनीचा कायमच विरह असतो. सततच्या कोसळणाऱया पावसाने इथल्या वातावरणात अधिक आर्द्रता आढळते. निसर्ग पर्यावरण याव्यतिरिक्त वर्षावनं ही औषधी वनस्पती, व्यापार, पर्यटनातून अनेकांचा उदरनिर्वाह करणारी असल्याने वर्षावनं पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत.

जगातले सर्वात मोठे वर्षावन म्हणून परिचित असलेले ऍमेझॉनचे जंगल नऊ देशांत विस्तारले आहे. ऍमेझॉनच्या जंगलात एकूण 30 दशलक्ष नागरिकांचे वास्तव्य आहे. 2.1 दशलक्ष चौ. मैल असलेले ऍमेझॉनचे वर्षावन 55 दशलक्ष वर्षे प्राचीन असल्याचा संशोधकांचा दावा आहे. जगातील 10 टक्के वन्य जीव, शेकडो पक्षी, 40 हजार वृक्ष, वनस्पती आणि 2.5 दशलक्ष कीटकांचा नैसर्गिक अधिवास म्हणून ऍमेझॉनचे वर्षावन प्रसिद्ध आहे. ऍमेझॉनचा भौगोलिक प्रदेशाचा विचार करता हा जर देश असता तर जगातला नवव्या क्रमांकाचा देश ठरला असता. इथे वर्षाला सरासरी 80 इंच तर काही ठिकाणी 400 इंचांहून अधिक पाऊस पडतो. जैवविविधतेने समृद्ध या वर्षावनात दर दुसऱया दिवशी नवीन वन्य जीव अथवा वनस्पतीचा शोध लागतो. ऍमेझॉनच्या वर्षावनातून जगाला 20 टक्के प्राणवायूचा पुरवठा होतो. म्हणून ऍमेझॉनच्या जंगलाचे अभ्यासकांनी ‘पृथ्वीची फुप्फुसे’ म्हणून वर्णन केले आहे. ऍमेझॉनच्या वर्षावनाची वैशिष्टय़े बघता हा प्रदेश जरी आठ राष्ट्रांच्या सीमेत येत असला तरी ऍमेझॉनचे दोन तृतीयांश वर्षावन ब्राझीलच्या सीमेत आहे. गेल्या काही दिवसांत ब्राझीलमधील ऍमेझॉनच्या वर्षावनात मोठय़ा प्रमाणात आगीचे तांडव सुरू आहे. त्यामुळे रोजच आषाढस्य प्रथम दिवस असलेल्या वर्षावनात वैशाख वणव्याने निसर्गाची प्रचंड हानी होत आहे. आकाशाला गवसणी घालणाऱया वृक्षांच्या जागी धुराचे लोट आणि प्राणवायूची जागा उत्सर्ग वायूने घेतली आहे.

1970 पासून मोठय़ा प्रमाणात सुरू झालेली जंगलतोड आज उच्चांकाला पोहोचली आहे. गतवर्षाच्या तुलनेत 2019 साली एकटय़ा जुलै महिन्यातच ऍमेझॉनच्या ब्राझील प्रदेशात 870 चौ. मैल वनक्षेत्र भुईसपाट झाले आहे. ऍमेझॉनचा जुलै ते नोव्हेंबरचा काळ शुष्क असल्याने जंगलातील वणव्याने रौद्ररूप धारण केले. जंगलात 72,843 ठिकाणी वणव्याने पेट घेतल्याने ब्राझील सरकारने आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे. वणव्याला नियंत्रणात आणण्यासाठी सैन्यातील 44 हजार सैनिकांना पाचारण करण्यात येऊन युध्दस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. वणव्याची दाहकता इतकी प्रचंड आहे की, शेकडो मैल परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना या आगीची दाहकता जाणवते आहे. आकाशात धुराचे ढग दाटून आले असून अंतराळातून हे दृश्य नजरेस येत असल्याची छायाचित्रे नासा आणि युरोपियन संस्थांनी प्रसिद्ध केली आहेत. दोन हजार कि.मी. दूर असलेल्या ब्राझीलच्या साओ पावलो शहरात दुपारच्या वेळी आकाशात काळसर रंगाची छाप दिसून येते. यावरून ऍमेझॉनच्या वर्षावनातील वणव्याची दाहकता किती दूरवर असेल याचा अंदाज येतो.

ऍमेझॉनच्या वर्षावनात प्रति हेक्टर 459 टन इतका उत्सर्ग वायू साठवलेला असतो. जो झाड कापल्यावर वातावरणात प्रवेश करतो. परंतु विद्यमान परिस्थितीत भविष्यातील दुष्परिणामांना आजच सामोरे जाण्याची वेळ आली असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. गेल्या महिनाभरात लागलेल्या आगीमुळे लाखो टन उत्सर्ग वायू पर्यावरणात मिसळला गेला असल्याचा ब्राझीलस्थित पर्यावरण संवर्धन संस्थेचा दावा आहे. गेल्या काही वर्षांतील वृक्षतोडीच्या घटनांमुळे ऍमेझॉनच्या जंगलातून 0.5 अब्ज मेट्रिक टन उत्सर्ग वायू बाहेर पडला आहे. जगात 20 टक्के उत्सर्ग वायूचे प्रमाण हे वृक्ष व जंगलतोडीमुळे कारणीभूत असल्याचे WWF या आंतरराष्ट्रीय संस्थेने नोंदवले आहे. नॅशनल जिओग्राफिकने ऍमेझॉनच्या वर्षावनांचा जलसाखळीवरील प्रभाव बघता विद्यमान परिस्थितीत जागतिक पातळीवर भविष्यात पावसाच्या असमतोलास कारणीभूत ठरेल असा इशारा
दिला आहे.

पृथ्वीचा दागिना
अतिक्रमण, अवैध शेती, औद्योगिकीकरण यासारख्या कारणांमुळे आज मोठय़ा प्रमाणात पृथ्वीचा प्राणवायू उत्सर्ग वायूत परिवर्तित होत आहे. वर्षावनं ही पृथ्वीचा दागिना म्हणूनसुद्धा संबोधली जातात. ऍमेझॉनच्या जंगलाचा 60 टक्के प्रदेश हा ब्राझीलमध्येच असल्याने या वणव्याची दाहकता निश्चितच भविष्यात मोठे पर्यावरण संकटाची चाहूल देणारी आहे. 2014 पासून सातत्याने निसर्गाने ब्राझीलला या पर्यावरण संकटाचे संकेत दिले आहेत. प्रतिवर्षी वर्षावनातील वाढत्या आगीच्या घटनांत वाढ होऊनही ब्राझील सरकार राजकीय कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष करत आल्याने यंदा पेटलेला वणवा महिना उलटून गेल्यावरही आटोक्यात येऊ शकलेला नाही. कधीकाळी 13 टक्के भूभागात विस्तारित वर्षावने आज 6 टक्के भूभागात मर्यादित आहेत. जगातील शंभरहून अधिक औषधी वर्षावनातील औषधी गुण असलेल्या वनस्पतींपासून तयार करण्यात आल्या आहेत. 25 टक्के आधुनिक औषधोत्पादने, कर्करोग, ल्युकॅमिया, हृदयरोग यांसारख्या आजारावरील औषधांचे मूळ वर्षावनांशी निगडित आहे. कर्करोगावरील प्रतिकारी औषधींपैकी 70 टक्के औषधी ही वर्षावनात आढळते. धन्वंतरीची औषधशाळा असलेल्या वर्षावनांच्या जखमा आणि वेदनांवर सध्या तरी कुठलीही मात्रा लागू होताना दिसत नाही.

हिंदुस्थानातील वर्षावने
अंदमान निकोबार उष्णकटिबंधीय, ईशान्य हिंदुस्थान उष्णकटिबंधातील अर्धहरित वने (आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय सर्व भागांचा वर्षावनात समावेश होत नाही) पश्चिम घाट दोन भागात ओलसर पानगळ वने व पर्वतीय वर्षावनं, महाराष्ट्र-कर्नाटक उत्तर पानगळ वनक्षेत्र, उत्तर-पश्चिम पानगळ वनक्षेत्र तामीळनाडूपर्यंत, दक्षिण-पश्चिम पर्वतीय क्षेत्र. ओरिसा अर्धसदाहरित काही भाग, हिमालयाच्या पायथ्याशी तीनसुखिया व दिब्रुगढ लहान स्वरूपातील वर्षावनं.

– [email protected]