थक्क करणारा चमत्कार!

650

>> दिवाकर शेजवळ

साहित्यरत्न अण्णाभाऊ यांच्या जन्मशताब्दीची सांगता गेल्या आठवडय़ात झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात लोकशाहीर म्हणून ते अग्रणी होते. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या सांगतेवर लॉकडाऊन आणि कोरोनाची मर्यादा आल्याने ऑनलाइन कार्यक्रमांद्वारे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्यानिमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ येथील कालिना कॅम्पसला ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी’ असे नाव देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

दलित मुक्तीच्या संगरात जागृतीचा पलिता चेतवणाऱ्या ‘जलसा’कारांचे योगदान खुद्द भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधोरेखित केलेले आहे. ‘‘माझ्या अनेक सभा एका जलसाची बरोबरी करू शकत नाहीत’’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या पश्चात गुलामांना गुलामीविरोधात बंडासाठी जागवणाऱया ‘जलसा’कारांची महती सांगितली होती. त्याच बाबासाहेबांनी ‘‘आपले व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्यासाठी वाणी आणि लेखणी ही प्रभावी साधने आहेत’’ असेही एकदा म्हटले आहे. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकरी चळवळीचे महाकवी वामनदादा कर्डक या दोघांइतकी त्याची प्रभावी उदाहरणे दुसरी कुठलीही सापडणार नाहीत. अण्णाभाऊंचे साहित्य 22 परकीय भाषांत अनुवादित होऊन जगभरात पोहोचले आहे, तर 10 हजारांहून अधिक भीम-बुद्धगीते लिहिलेल्या वामनदादांची गाणी कलावंतांच्या आणखी किती पिढय़ा गातील याची मोजदाद करता येणार नाही. अण्णाभाऊ (1920) आणि वामनदादा (1922) यांच्या जन्मात दोनच वर्षांचे अंतर होते. आज अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीची सांगता झाल्याच्या पाठोपाठ पुढील वर्षी वामनदादा यांची जन्मशताब्दी साजरी होईल, पण शाळेत जाऊन साक्षर न बनतासुद्धा एक साहित्यसम्राट बनतो अन् दुसरा महाकवी…हा दुनियेला थक्क करून सोडणारा चमत्कारच म्हणावा लागेल! अभिजनांनी काबीज केलेल्या कलेच्या प्रांतात शस्त्र-शास्त्रापासून वंचित ठेवण्यात आलेल्या दलित समाजाने गाजवलेल्या मर्दुमकीचे अण्णाभाऊ आणि वामनदादा हे दोघे महामेरू ठरले.

त्यातील अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीची सांगता होत असताना आज त्यांच्यावरच लिहिणे औचित्यपूर्ण ठरेल. 35 कादंबऱया, 13 कथासंग्रह, 15 पोवाडे, 13 लोकनाटय़े, 7 चित्रपट कथा, 3 नाटके, 1 प्रवासवर्णन अशी विपुल साहित्यसंपदा अण्णाभाऊंच्या नावावर जमा आहे. शिवाय, संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात ते लोकशाहीर म्हणून अग्रणी होते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या सांगतेवर कोरोना आणि लॉक डाऊनमुळे मर्यादा पडली. त्यामुळे ऑनलाइन जन्मशताब्दी साजरी करून त्यांच्या कार्याचा आणि साहित्यिक कामगिरीचा गौरव केला जात आहे. त्यानिमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ येथील कालिना कॅम्पसला ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी’ असे नाव देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

अण्णाभाऊ साठे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या दलित मुक्तीच्या लढय़ात सहभाग नव्हता. किंबहुना, त्यांच्या चळवळीचा प्रारंभ हा लाल बावटा कला पथकापासून झाला होता अन् 1956 सालात बाबासाहेबांनी नागपूर येथे घडवलेल्या धम्मक्रांतीतही त्यांचा सहभाग नव्हता. कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीतील सहभागामुळे त्यांच्या नावापुढे ‘कॉम्रेड’ ही उपाधी लावली जाताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ आणि आंबेडकरवाद यांच्यात द्वंद्व असल्याचा समज किंवा भावना बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच मार्क्सवाद आणि बुद्धाचा धम्म यांच्यातील तफावत तसेच अण्णाभाऊ यांनी धम्माचा न केलेला स्वीकार या गोष्टींमुळे ‘तसे’ द्वंद्व असल्याचे मानले जाण्याचा धोका अधिक आहे. त्याचा फायदा बौद्ध आणि मातंग या दोन लढाऊ समाजात दरी वाढवण्यासाठी काही शक्ती टपलेल्याच आहेत.

मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे हे मुळात समकालीन नव्हेत. त्या दोघांच्या वयात तब्बल 30 वर्षांचे अंतर होते. बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला, तेव्हा अण्णाभाऊ हे जेमतेम सात वर्षांचे आणि येवल्यात धर्मपरिवर्तनाची घोषणा केली, तेव्हा ते 15 वर्षांचे असतील अन् नागपूरच्या धम्मक्रांतीवेळी त्यांनी वयाची पस्तिशी गाठलेली असेल. हे लक्षात घेतले तर अण्णाभाऊ ‘वेगळ्या’ प्रवाहात कसे गेले आणि राहिले या गोष्टींचा व्यवस्थित उलगडा होऊ शकतो. शिवाय, अण्णाभाऊ हे अलौकिक प्रतिभेचे धनी असलेले महान साहित्यिक असले तरी त्यांचा पिंड तत्त्वज्ञाचा नव्हता हे विसरून चालणार नाही.

अण्णाभाऊ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला दलित मुक्तीचा लढा जाणूनबुजून नाकारला आणि विशिष्ट वैचारिक भूमिकेतून त्यांनी कम्युनिस्ट चळवळ पसंत केली अशातला भाग नाही. ते डाव्या चळवळीत ओढले जाण्यास स्वातंत्र्य लढा आणि मुंबई शहरातील त्यावेळचे सामाजिक- राजकीय वातावरण कारणीभूत ठरले होते. उलट 1932 सालात म्हणजे वयाच्या 12व्या वर्षीच त्यांनी वडिलांसोबत नोकरी-रोजगारासाठी मुंबई गाठली होती. म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘खेडी सोडा, शहराकडे चला’ हा संदेशच त्यांनी अमलात आणला होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱयाच दिवशी 16 ऑगस्ट 1947 रोजी अण्णाभाऊंनी शिवाजी पार्कवरील आंदोलनात दिलेली घोषणा होती-

यह आझादी झुटी है
देश की जनता भुकी है

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तर गोलमेज परिषदांच्या काळापासून विचारत आले होते की, ‘‘गांधीजी, तुमच्या स्वातंत्र्यात माझ्या दलितांचे स्थान काय राहील हे आधी सांगा.’’ बाबासाहेबांपाठोपाठ अण्णाभाऊंनी विचारलेला सवाल किती रास्त होता हे 73 वर्षांनंतर आजही सर्वांना पटल्याशिवाय राहणार नाही… अन् बाबासाहेबांनी स्वातंत्र्यापूर्वी गांधीजींना विचारलेला सवाल खरा ठरला हे वेगळे सांगण्याची गरज उरत नाही. अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’ (1959) ही सर्वाधिक गाजलेली कादंबरी आहे. ती त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती! इथे ‘साऱया जगात देखणी गं, बाई मी भीमाची लेखणी’ हे वामनदादांच्या गीतातील शब्द हमखास आठवतात.
अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर लिहिलेल्या ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ हे गीत त्यांची वैचारिक बांधिलकी, निष्ठsविषयी सब कुछ सांगून टाकते.

खुद्द बाबासाहेबांनाच अनुसूचित जातीतील प्रत्येक जातीला स्वतंत्रपणे विश्वासात घेऊन धर्मपरिवर्तनामागील भूमिका पटल्यानंतरच त्या त्या जातीचे धर्मपरिवर्तन घडवायचे होते. त्यासाठी जातीनिहाय परिषदा भरवण्यावर त्यांनी भर दिला होता, पण त्या काळात धर्म बदलण्याचे पाऊल उचलण्याचे धाडस इतर अनुसूचित जातींकडून झाले नव्हते. अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजातील असले तरी त्या काळात ते अस्पृश्यांच्या चळवळीऐवजी कामगार चळवळीत सक्रिय होते. त्यातच मातंग, चर्मकार या समाजांमध्ये जागृतीच्या चळवळीने जोर धरलेला नव्हता. तसेच नागपूरच्या धर्मपरिवर्तनानंतर दोन महिन्यांच्या आत बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्यामुळे बुद्धाच्या धम्माचे परिपूर्ण स्वरूप लोकांसमोर येऊ शकले नव्हते. तशा परिस्थितीत मार्क्सवादी चळवळीच्या प्रभावामुळे कदाचित अण्णाभाऊंना ‘धर्म’ हा विषय त्याज्य वाटलाही असेल तर ते अनैसर्गिक म्हणता येणार नाही.

पण अण्णाभाऊंनीच पुढे बाबासाहेबांनी दाखवून दिलेला ‘‘मुक्ती पथ अनुसरा’’ असा संदेश देणारी ‘बुद्धाची शपथ’ ही कथा लिहिली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘युगांतर’च्या अंकात अण्णाभाऊंची ही कथा 1956 नंतर आणि 1961 पर्यंतच्या काळात प्रसिद्ध झाली आहे. ही माहिती प्रा. अशोक चौसाळकर आणि प्रा. रणधीर शिंदे यांनी संपादित केलेल्या ‘युगांतर’मधील ‘अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य’ या ग्रंथातून समोर आली आहे. त्यांची ‘बुद्धाची शपथ’ ही कथा बाबासाहेबांच्या दृष्टीने धम्माचे बायबल असलेला त्यांचा ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ प्रकाशित होण्याआधी लिहिलेली आहे हे ‘कॉम्रेडस्’ लक्षात घेतील काय?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या