दुर्गम अणुस्करा घाट

3236

>> संदीप विचारे

प्राचीन काळापासून कोकणातून सहय़ाद्री ओलांडून घाटावर जाण्यासाठी अनेक घाटमार्ग अस्तित्वात होते. यातीलच एक अणुस्करा घाट. नागमोडी वळणाच्या या अणुस्करा घाटाच्या वाटेला सहसा कोणी जात नाही, पण काटक रांगडा सहय़ाद्री, घाटाच्या नागमोडी आणि पाताळवेरी उतारावरून गाडी चालवण्याचे कसब, घाटमाथ्यावरून दिसणारे विहंगम कोकण आणि सूर्यास्त अनुभवायचा असेल तर अणुस्करा घाटाची सोबत एकदा तरी कराच!

उत्तर-दक्षिण पसरलेला सहय़ाद्री हा महाराष्ट्राचा मानदंड. या सहय़ाद्रीच्या गिरीशिखरांना गड-कोटांचे मंदिल चढवून श्री शिवछत्रपतींनी अस्मानी सुल्तानीला आव्हान दिले आणि हिंदवी स्वराज्य साकार झाले. या सहय़ाद्रीच्या पूर्वेकडील भाग म्हणजे घाटमाथा आणि पश्चिमेकडील भाग अपरांत म्हणजेच परशुरामभूमी कोकण. सहय़ाद्री पर्वत वसलाय घाट आणि कोकणाच्या मधोमध. प्राचीन काळापासून कोकणातून सहय़ाद्री ओलांडून घाटावर जाण्यासाठी अनेक घाटमार्ग अस्तित्वात होते. जसे थळ घाट, बोर घाट, नाणे घाट, सवाष्णी घाट, वरंधा घाट, परशुराम घाट आणि तळकोकणातील अंबा, बावडा, करूळ, फोंडा, अंबोली घाट यातील काही मार्ग पक्क्या डांबरी रस्त्याने संरक्षित करून घाट आणि कोकणातील दळणवळणाचा मार्ग सुकर केला गेला.

आज आपण भेट देणार आहोत थोडासा दुर्लक्षित राहिलेल्या ‘अुणस्करा’ घाटास. मुंबईहून तळकोकणात जाणारे चाकरमानी (पुणे-एक्सप्रेस वेमार्ग) मुंबई-पुणे-कऱ्हाड-कुंभाली घाटमार्गे कोकणात चिपळूणला येतात तर काही मुंबई-पुणे-कोल्हापूरमार्गे अंबा, करूळ, फोंडा, बावडा, अंबोली या घाटांचा वापर करून कोकणात उतरतात. अणुस्करा घाटाच्या वाटेला सहसा कोणी जात नाही, पण काटक रांगडा सहय़ाद्री, घाटाच्या नागमोडी आणि पाताळवेरी उतारावरून गाडी चालवण्याचे कसब, घाटमाथ्यावरून दिसणारे विहंगम कोकण आणि सूर्यास्त अनुभवायचा असेल तर अणुस्करा घाटाची सोबत एकदा तरी कराच!

मुंबई-पुणे-सातारामार्गे कऱहाड मार्गे गेला की पाचवड गावातील फाटा आपणास अणुस्करा घाटाकडे नेतो. कोकरूड-चांदोली (फाटा) ही गावे मागे टाकून आपण कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील मलकापूरला पोहोचतो. वाटेतील चांदोली फाटय़ावरून आपण चांदोली अभयारण्य व चांदोली धरणास भेट देऊ शकतो. कऱहाड-कोकरूड-मलकापूर रस्ता वळणावळणाचा असून पुढे गेल्यावर भव्य पवनचक्क्या आपल्या दृष्टीस पडतात. इथूनही बांबवडेमार्गे कोल्हापूरला जाता येते. मलकापूर तसं मोठ गाव आहे. इथे आपल्यासाठी हॉटेल्स आणि आपल्या वाहनाकरिता पेट्रोल पंप आहे. मलकापूरहून आपली अणुस्करा घाटाची मुशाफिरी सुरू होते. कोल्हापूर-पन्हाळा-अंबा-साखरपा हा रस्ता ओलांडून आपण अणुस्करा घाटाकडे निघतो. काही अंतर गेल्यावर पांढरपाणी हे ठिकाण लागतं. ही हेच ते ऐतिहासिक गाव ज्या गावातून पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निघालेली धारकऱयांची पालखी काही काळ विसावली होती. या पालखीचे भोई होते हिरडस मावळातील बांदल आणि पालखी प्रमुख होते बाजीप्रभू देशपांडे! पालखीत होता सहय़ाद्रीचा सिंह धारकऱयांचा विठ्ठल साक्षात श्री शिवछत्रपती! पुढे इथला एक फाटा पावनखिंडीकडे जातो. तोफेआधी मरे ना बाजी सांगा मृत्यूला… ही साक्षात यमाला आव्हान देणारी रणगर्जना ऐकायची आणि पाहायची असेल तर पावनखिंडीस अवश्य भेट द्या! थोडं अंतर पुढं गेल्यावर येळवण हे जुगाई देवींच ठाण लागतं आणि आपण घाटाच्या माथ्यावर एका खिंडीत येऊन उभे ठाकतो. समोरील दृश्य नजरेत सामावताना आपली दमछाक होते. पाताळवेरी खोल दरी… मावळतीकडे उतरत गेलेल्या सहय़ाद्रीच्या रांगा… अर्जुना नदीवरील धरण आणि तळकोकण. हा अदभुत नजारा डोळय़ांत साठवत अणुस्करा घाट निगुतीन उतरायचा. इथंच कुठंतरी उजव्या हाताला विशाळगड आणि मलिक उत्तुजार या सुल्तानाला गनिमी काव्याचा पहिला तडाखा मोरे आणि शिर्के यांनी दिलेलं जंगल. इतिहास जागवत घाट उतरावा. सध्या घाटाची दुरुस्ती सुरू आहे. संरक्षक भ्ंिाती तुटल्या आहेत. त्यामुळे थोडं जपून. घाट उतरून आपण पाचलमार्गे मुंबई-गोवा हमरस्त्यावरील ओणी गावात येतो. इथून उजवीकडे रत्नागिरी डावीकडे सिंधुदुर्ग!

बिकट वाट वहिवाट नसावी… हे जरी खरं असलं तरी वेगळा अनुभव घेण्यासाठी अणुस्करा घाटाची वाकडी वाट आपल्या गाडीच्या चाकाखाली येऊ द्या! पण शक्यतो रात्रीचा प्रवास टाळून दिवसा उजेडी हा प्रवास आनंद घ्या!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या