कृत्रिम पावसाचा घातक प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> किरणकुमार जोहरे

गेली 30 वर्षे हिंदुस्थानी उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) कृत्रिम पावसाचे अयशस्वी प्रयोग करीत आली आहे आणि कोटय़वधी नव्हे तर अब्जावधी रुपयांची ढगात रासायनिक ‘पेरणी’ केली गेली आहे. इतकेच नव्हे तर पाऊस पडलेला नसताना शोध निबंधातदेखील आकडेमोड करीत 29 टक्क्यांपर्यंत पाऊस पडल्याचे ‘शोध’देखील लावले गेले आहेत. कर्नाटकात खडकवासला धरण भरेल इतका पाऊस प्रयोगातून पडला असा दावा ही काही मंडळी करतात. परदेशात 28 ते 49 टक्के पाऊस वाढल्याचा दावाही केला जातो. मात्र महाराष्ट्रात प्रयोगात पाऊस पडेल याची कुठलीही गॅरंटी हे अभ्यासक देत नाही हे विशेष!

कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग वैज्ञानिक म्हणजे ‘सायंटिफिक’ प्रयोग असल्याचे हिंदुस्थानी उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), पुणेतर्फे प्रकल्प संचालिका सांगत होत्या, तर दुसऱया बाजूस मंत्रीमहोदय हा प्रयोग म्हणजे साक्षात कृत्रिम पाऊस पाडला जाणार असल्याचा ‘ऑपरेशनल’ प्रयोग असल्याचे भासवीत आहेत. मुळात हा प्रयोग आहे हे विसरून प्रत्यक्ष कृत्रिम पाऊसच पडणार आहे या आविर्भावात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला गृहीत धरत आहे अशी सर्वसामान्यांची मानसिकता दिसून येत आहे.

पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता इतरत्र पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाला विलंब होत असल्यामुळे दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात संभाजीनगर, सोलापूर आणि शेगाव अशा तीन ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचं सरकारने निश्चित केलं आहे. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 30 सप्टेंबरपर्यंत हा प्रयोग करण्यात येईल. सरकारने कृत्रिम पावसासाठी अनुकूल असलेल्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी एक केंद्र यापूर्वीच सोलापूरमध्ये उभारलं होतं. तसंच संभाजीनगरमध्ये रडार यंत्रणासुद्धा उभारली आहे. या सर्वांच्या मदतीने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन विमानेही मागील आठवडय़ात सोलापूर विमानतळावर दाखल झाली आहेत. ख्याती वेदर मॉडिफिकेशन या कंपनीला या प्रयोगाचं कंत्राट देण्यात आलं आहे. मात्र राज्यात तसेच देशभरात यापूर्वी झालेले कृत्रिम पावसाचे प्रयोग सपशेल अयशस्वी ठरले आहेत. यापूर्वी कर्नाटकात 2003 मध्ये, महाराष्ट्रात 2003 आणि 2004 तर आंध्र प्रदेशात 2007 आणि 2007 मध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग अमेरिकन कंपनीद्वारे करण्यात आले होते. 2009 ते 2011 मध्ये पुण्याच्या आयआयटीएमतर्फे कायपिक्स नावाचा प्रयोग हाती घेण्यात आला. त्यानंतर 2010 व 2011 मध्ये तिन्ही राज्यांतील दुष्काळी भागात प्रयोग करण्यात आले, 2015 आणि 2017 मध्ये अनुक्रमे संभाजीनगर व सोलापूर येथे कृत्रिम पावसाचे प्रयोग केले होते. मात्र हे सर्व प्रयोग अयशस्वी ठरले आहेत.

जगभरातही कृत्रिम पावसाचे प्रयोग अयशस्वी ठरल्याचा इतिहास आहे. ढगांवर रसायन फवारल्यानंतरही ते ढग पुढे वाहून निघून गेल्यास त्याचा काहीच उपयोग नाही. फक्त चीनने कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वीरीत्या केला आहे, पण त्यांनी या प्रयोगाचा फॉर्म्युला जगाला न देता लपवून ठेवला आहे.

पारदर्शकता हवी
आयआयटीएम संस्था फक्त प्रयोग म्हणून या गोष्टीकडे पाहते. कायपिक्स प्रयोगावर सुमारे 250 कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च आतापर्यंत करण्यात आला आहे. हिंदुस्थानसारख्या गरीब देशाला हे प्रयोग परवडणारे नाहीत. अमेरिकेतली विमान भाडय़ाने घेऊन हे प्रयोग करण्यात येत आहेत. प्रयोगानंतर किती पाऊस झाला याची नोंद पर्जन्यमापकावर ठेवली जात नाही. कोणते ढग निवडण्यात आले, प्रयोग कधी आणि कशा प्रकारे होईल याची माहिती दिली जात नाही. कृत्रिम पावसाचा प्रयोग हा केवळ पैशांचा चुराडा आहे.

कसा पाडतात कृत्रिम पाऊस ?
कृत्रिम पाऊस ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. ज्या भागात कृत्रिम पाऊस पाडायचा आहे, तिथल्या आकाशात बाष्पयुक्त ढग असणे आवश्यक आहे. रडार यंत्रणेच्या माध्यमातून पावसासाठी अनुकूल असणाऱया ढगांचा शोध घेण्यात येतो. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी परिसरात आर्द्रता 70 टक्के असणे आवश्यक आहे. योग्य त्या ढगांची निवड करून त्यात ठराविक प्रकारच्या कणांचं बीजारोपण करण्यात येतं. हा कण पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होत जाते. याचा आकार वाढला की, तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. उष्ण तसंच शीत ढगांसाठी कृत्रिम पावसाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

उष्ण ढगात 14 मायक्रॉन त्रिज्येच्या आकाराचे थेंब नसतात. अशावेळी ढगामध्ये सोडियम क्लोराईड किंवा मिठाच्या 4 ते 11 मायक्रॉन त्रिज्येच्या आकाराची पावडर फवारली जाते. मिठाला पाण्याचे आकर्षण असल्यामुळे हे कण ढगात पसरतात. ढगातील बाष्प शोषल्यानंतर थेंबाचा आकार 14 मायक्रॉनपेक्षा वाढून पाऊस पडायला सुरुवात होते, तर शीत ढगांमध्ये हिमकण तयार होण्यासाठी लागणाऱया केंद्रबिंदूंचा अभाव असतो. अशावेळी ढगांवर सिल्व्हर आयोडाईड फवारले जाते. त्यावर हिमकण वेगाने तयार होऊन त्यांचा आकार वाढल्यानंतर ते खाली पडू लागतात. अशा पद्धतीने पाऊस पाडण्यास असमर्थ असलेल्या ढगातून पाऊस पाडता येऊ शकतो अशी कृत्रिम पावसासाठी ’थिअरी’ आहे.
विमानाने फवारणी करणे, रॉकेटने ढगात रसायन सोडणे आणि जमिनीवर रसायनाचे ज्वलन करणे अशा तीन पद्धती वापरून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जातो. मात्र या प्रयोगाद्वारे पाऊस पडेलच याची शाश्वती नसते हे अंतिम सत्य आहे.

असेही टीमवर्क
2015 मध्ये संभाजीनगर येथे ख्याती वेदर मॉडिफिकेशन या संस्थेला प्रयोगाकरिता कॉन्ट्रक्ट दिले गेले होते, तर मागील वर्षी ते सोलापूरसाठी दिले गेले. विशेष म्हणजे संभाजीनगरमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला होता.s मराठवाडय़ात केलेल्या प्रयोगातून जवळपास 200 मिमी पाऊस त्या भागात पडल्याची नोंद कंपनीने केली होती. प्रत्यक्षात मात्र प्रयोगासाठी वापरण्यात आलेली पद्धत व साधनसामग्रीच चुकीची होती. त्यामुळे प्रत्यक्षात या भागामध्ये दोन मिमी पावसाचीदेखील नोंद झाली नव्हती. तहानलेल्या नागरिकांना दोन घोटसुद्धा कृत्रिम पावसाचे पाणी मिळू शकले नाही. साधे नळकांडे सांभाळताना घेतली जात असलेली काळजी पाहता कृत्रिम पावसाचा हा प्रयोग किती ‘टीमवर्क’ने किती ‘काळजीपूर्वक’ होत असेल याची कल्पना आल्यावाचून राहत नाही.

येथे प्रयोग का नाही?
केंद्र सरकारनच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे आय आय टी एम या संस्थेची मेघ भौतिकिय प्रयोगशाळा महाबळेश्वर येथे आहे. अब्जावधी रुपये खर्च करून बांधलेल्या या प्रयोगशाळेत उपकरणे धुळखात पडून आहेत. पुणे विद्यापीठाच्या आवारातच ढगातील घडामोडींचा अभ्यास करता येईल असे कोल्ड क्लाउड चेंबर आहे. कृत्रिम पाऊसाचे प्रयोग करणारे या ठिकाणी प्रयोग करुन यश का प्राप्त करू शकत नाही? येथे प्रयोग करत ते नवीन शोध का लावत नाही? प्रत्येक वेळी घातक रसायने फवारणी ही अमेरिकेतून विमाने भाडेतत्त्वावर घेऊन किंवा विमाने खरेदी करण्याचा हट्ट का? करोडो रुपयांचे कृत्रिम पावसाचे प्रयोग महाराष्ट्रातील जनतेवर का लादले जातात? हे गंभीर प्रश्न आहेत.

वैज्ञानिक प्रयोग हे मानवजातीच्या विकासासाठी गरजेचे आहेत याबद्दल वाद नाही. मात्र कृत्रिम पावसाचे प्रयोग प्रयोगशाळेत करावेत, महाराष्ट्रातील जिवंत माणसांवर आणि शेतकऱयांवर नव्हे. हिंदुस्थानसारख्या देशाला अब्जावधी रुपयांचे हे प्रयोग झेपणार आहेत का? की चीनची बरोबरी करण्यासाठी हा दिखावा केला जात आहे याबाबत विचारमंथन होणे गरजेचे आहे. प्रयोग कोण करीत आहे आणि कशा पद्धतीने ते राबविले जात आहेत याची दखल घेणेदेखील क्रमप्राप्त आहे. हवामान खात्याच्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची पद्धती आणि दर्जा अतिशय सुमार आहे. त्यामुळे मागील प्रयोग फसले आणि कोटय़वधी रुपये खर्च ढगात गेला. यंदा पुन्हा 30 कोटी रुपये खर्च करून हाच प्रयोग पुन्हा करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे ‘दुष्परिणाम’!
ढगांची चोरी अथवा कृत्रिम पावसाच्या प्रयोगात ढग खर्ची पडल्याने पुढील भागात ढग जात नाही आणि त्यामुळे पुढील प्रदेशात पाऊस न झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होऊ शकते. इतकेच नव्हे तर ढगामध्ये फवारणी करण्यात येणारे रसायन प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात फवारले गेले तर असलेले ढगदेखील विरून जाऊन नष्ट होतात आणि नैसर्गिक होणारा पाऊसदेखील मग होत नाही. कृत्रिम पावसाच्या प्रयोगात वापरले जाणार सिल्व्हर आयोडाईड हे रसायन विषारी असल्याने पर्यावरण आणि सस्तन प्राण्यांसाठी घातक आहे. शेतजमिनीतील मातीत मिसळल्यामुळे मृदा प्रदूषण होऊन पिकांसाठीदेखील घातक ठरते. त्यामुळे शेती नापीक होण्यात जास्त परिणाम होतो.
विमानाने कृत्रिम पाऊस पडण्याचा प्रयोग मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर काळात करणे अतिशय धोकादायक आहे. वातावरणात असणारी अस्थिरता आणि हवेचा ऊर्ध्व झोत यामुळे विमान अपघात होण्याची शक्यता असते. हिंदुस्थानात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगात गरम ढग आणि थंड ढग अथवा ढगांचा भाग असे वर्गीकरण न करता सर्रास एकाच प्रकारचे रसायन फवारले जाते. परिणामी नैसर्गिक ढग वाढण्याऐवजी ते नष्ट होऊन पडणारा नैसर्गिक पाऊसदेखील पडत नाही आणि गंभीर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

[email protected]

(लेखक इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मीटरिऑलॉजी, पुणेचे (IITM) माजी शास्त्रज्ञ आंहेत.)