
>>नीलेश कुलकर्णी<<
इसवी सन 2012 च्या आसपास देशभरात भ्रष्टाराचाराविरोधात ‘मोदीलाटे’पेक्षाही मोठी लाट आली होती. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात बोंब मारत दिल्लीतील जंतरमंतरवर ‘अण्णा मंडळां’च्या सहकार्याने ‘आम आदमी पक्षा’चा पाळणा हलला होता. ‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अण्णांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीसाठी त्याच काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी केजरीवाल अक्षरक्षः घायकुतीला आले होते. ‘कुछ भी करो जी हमे साथ में ले लो’ अशी आर्जवे करत केजरीवाल 10 जनपथपुढे उभे राहिले. ज्या काँग्रेसला भ्रष्टाचाराची जननी म्हटले त्याच काँग्रेसच्या मांडीवर बसण्याची घाई का झाली होती याचे उत्तर आता केजरीवालांना द्यावे लागणार आहे.
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे तर भ्रष्टाचाराची गटारगंगा साफ करणारे अवतारी पुरुष आपण आहोत याच आविर्भावात वावरत असतात. मात्र आता लोकसभा निवडणुकीसाठी तेच केजरीवाल भ्रष्टाचाराचा ‘आदर्श’ म्हटल्या गेलेल्या काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यासाठी आतुर झाले होते. काही वर्षांपूर्वी हे महाशय काँग्रेसवर भ्रष्टाचारावरून सतत तोंडसुख घेत होते. त्यातूनच ते दिल्लीत सत्तेत आले. मात्र या सत्ताकाळात राजकीय साधनशुचिता, पारदर्शक कारभार त्यांनी यमुनेत केव्हाच विसर्जित केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लढतील तिथे त्यांना जाऊन नडण्याची ‘कर्तबगारी’ त्यांनी जरूर दाखवली. मात्र फुकटय़ा प्रसिद्धीचा झोत स्वतःवर पाडून घेण्याची हौस भागण्यापलिकडे केजरीवालांना फारसे काही साध्य झाले नाही. दिल्लीतील सत्तेत त्यांनी अशाच अनेक नौटंक्या आणि करामती केल्या. नुसत्या ‘नौटंकी’वर पक्ष आणि राज्यकारभार चालत नाही. त्यासाठी केडर भक्कम करावे लागते, पक्षाला एक कार्यक्रम असावा लागतो. मात्र पक्षाला दिशा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे आता ‘आप’च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळेच लोकसभेत किमान एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे तरी आपले खासदार निवडून यावेत यासाठी केजरीवालांनी ‘आ गले लग जा’ अशी खुल्लमखुल्ला ऑफर काँग्रेसला दिली होती. मात्र काँग्रेसने हे प्रपोजल धुडकावल्याने राजकीय प्रेमभंगाचे दुःख पचवत केजरीवालांना आता आपले अस्तित्व वाचविण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी 46.63 टक्के इतकी होती. त्याच वेळी ‘आप’ची मतांची टक्केवारी 33.8 तर काँग्रेसची मत टक्केवारी 15.22 टक्के होती. काँग्रेस व ‘आप’ची आघाडी झाली असती तर मतांची टक्केवारी सध्याच्या निवडणुकीतही भाजपपेक्षा वरचढ ठरली असती आणि त्याचा राजकीय फायदा काही जागा पदरात पडल्या असत्या. तीच बाब हरयाणा व पंजाबची. या दोन्ही राज्यांत काही वर्षांपूर्वी ‘आप’ने मोठी ‘हवा’ केली होती, मात्र ती कधीच विरून गेली. त्या राज्यांमधूनही एक-दोन खासदार निवडून यावेत असा या आघाडीमागचा केजरीवालांचा हेतू होता, मात्र भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शीला दीक्षितांना तुरुंगात डांबू अशा राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा करणाऱ्या केजरीवालांना शीला आंटीनाच शरण जावे लागले आणि त्यातूनही त्यांच्या हाती पदरी काही पडले नाही. ‘कालाय तस्मै नमः!’
‘संकटमोचक’ हनुमान…

बेताल विधाने केल्यामुळे निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर 72 तासांची प्रचारबंदी घातल्यानंतर ‘मैं हनुमानजी का भक्त हूं. इसलिए वाराणसी जा रहा हूं’ असे सांगत योगी वारणसीच्या पुरातन हनुमान मंदिरात पोहचले. अर्थात आता संकटमोचक हनुमानाचा बहाणा करत योगी तिकडे का पोहोचले याची मनोरंजक माहिती उघड झाली आहे. वाराणसीमधून पंतप्रधान निवडणूक लढवत असल्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे. सुरुवातीला प्रियंका गांधी इथून लढतील अशी चर्चा रंगली होती, मात्र ती अफवा ठरली. मात्र भाजपाचे खरे टेन्शन वाढवले होते ते संकटमोचक हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी विश्वनाथ प्रसाद मिश्रा यांनी. हे मिश्रा ‘पंडितजी’ म्हणून वाराणसीच्या पंचक्रोशीत लोकप्रिय व आदरणीय आहेत. याच पंडितजींवर विरोधकांनी मोहिनी टाकण्यास सुरुवात केली होती. नरेंद्र मोदींविरोधात सर्वसंमतीचे उमेदवार म्हणून पंडितजींना मैदानात उतरविण्यासाठी राहुल गांधी, मुलायम, मायावतींनी सर्व शक्ती पणाला लावली होती. मुख्यमंत्री योगींच्या कारभारामुळे अगोदरच वाराणसीमधील साधू, महंत आणि पंडितांमध्ये नाराजी आहे. त्यात मिश्रा निवडणुकीला उभे राहिले तर ते मोठे आव्हान ठरू शकेल याचा अंदाज आल्यानंतर तातडीने योगी आदित्यनाथ डॅमेज कंट्रोलसाठी तिथे गेले. अर्थात योगींच्या विनंतीपेक्षा भाजपश्रेष्ठाRच्या विनंतीला मान देऊन मिश्रा यांनी ‘आपला जन्म धर्मकारणासाठी सार्थकी लावेन’ असे जाहीरपणे सांगितले. योगींना मात्र हनुमान ‘प्रसन्न’ झाल्याची अनुभूती आली असावी. त्यामुळे योगी हे हनुमानाच्या दर्शनासाठी गेले होते की पंडित विश्वनाथ प्रसाद मिश्रांच्या असा खडूस प्रश्न सध्या भाजप वर्तुळातच विचारला जात आहे.
महेंदी, सुरेंद्रन आणि राकेश सिंग

गायक हंसराज हंस यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर दुसरे प्रसिद्ध गायक दलेर महेंदी यांना भाजपने प्रवेश देऊन ‘पवित्र’ केले आहे. या महेंदींवर मानवी तस्करीचे आरोप आहेत व मामला न्यायालयात आहे. असे असताना ‘तुनक तुनक तारा रा’च्या तालावर पक्षात प्रवेश दिल्यामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे 2019 ची लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी सर्वाधिक गुन्हे ज्यांच्या नावावर आहेत ते के. सुरेंद्रन हेदेखील भाजपचे केरळमधले उमेदवार असावेत हा निव्वळ योगायोग मानायचा का? सुरेंद्रन यांच्या नावावर तब्बल 242 गुन्हे आहेत. अर्थात सर्वच गुन्हे काही गंभीर नाहीत. त्यातले तब्बल 222 गुन्हे हे शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाविरोधात केलेल्या आंदोलनातून त्यांच्यावर नोंदविण्यात आले आहेत. आता पवित्र शबरीमालेचा आशीर्वाद म्हणून मला निवडून द्या असा जोरदार प्रचार सुरेंद्रन यांनी चालवला आहे. शबरीमालाची कृपा सुरेंद्रन यांच्यावर होते का ते यथावकाश कळेलच. दुसरीकडे मध्य प्रदेशात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राकेशसिंग यांची जीभ अशी घसरली की त्यांच्यासह भाजपाची जाहीर फटफजिती झाली. जाहीरसभेत तावातावाने बोलताना राकेशसिंग यांनी ‘दहशतवाद’ हा त्याग, तपश्चर्या आणि बलिदानाचे प्रतीक असल्याचे सांगत दहशतवादाचाच ‘टीआरपी’ वाढविला. राकेशसिंग यांना ‘भगवा दहशतवाद’ म्हणायचे होते खरे मात्र ते ‘भगवा’ शब्दच विसरले आणि स्वतःसह पक्षाची अडचण केली.
























































