आसाम रायफल्स आता चीन सीमेवर!

ब्रिगेडियर हेमंत महाजन,   [email protected]

हिंदुस्थानम्यानमार सीमा प्रचंड स्मगलिंग होणारी सीमा बनली आहे. म्हणून या सीमेवरसुद्धा लक्ष ठेवावे लागेल. मागच्या काही वर्षांमध्ये आसाम रायफलने या सीमेवर 900 कोटींहून जास्त रुपयांचा स्मगलिंग माल आणि ड्रग्स पकडले आहे. बंडखोरी थोडय़ा प्रमाणामध्ये मणिपूरमध्ये सुरू आहे, चिनी सैन्याचे आव्हान ईशान्य हिंदुस्थानच्या सीमेवर ती येऊ शकते. आसाम रायफल हिंदुस्थानी सैन्याच्या मदतीला दिल्यामुळे ही आव्हाने स्वीकारणे जास्त सोपे झाले आहे.

आसाम रायफल्स हे हिंदुस्थानातील सगळ्यात जुने निमलष्करी दल आहे. या दलास 1913 साली आसाम रायफल्स हे नाव देण्यात आले. या दलाने अनेक कारवायांमध्ये भाग घेतला. या दलात 46 बटालियन असून त्यांत एकूण 66,411 सैनिक आहेत. हे दल हिंदुस्थानच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. मात्र लढाईकरिता हे हिंदुस्थानी सैन्याच्या हाताखाली काम करते. या दलाने दहशतवादविरोधी कारवाया तसेच सीमा सुरक्षा कार्यात आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरी दलांना मदत करण्यात भाग घेतला आहे. याशिवाय आसाम रायफल्स दुर्गम भागात दळणवळणाची, वैद्यकीय व शैक्षणिक मदत करते. युद्धकालीन परिस्थितीमध्ये देशाच्या सीमेच्या आतल्या भागांत सुरक्षा पुरविण्यासाठी या दलाचा उपयोग होतो. 2002 सालापासून आसाम रायफल्स म्यानमार सीमेवर तैनात आहे.

निमलष्करी दल ‘आसाम रायफल्स’चे नियंत्रण गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत आणण्याच्या मंत्रालयाच्या प्रस्तावाला लष्कराने विरोध दर्शविला आहे. असे केल्याने हिंदुस्थान-चीनच्या संवेदनशील सीमेवरील टेहळणीवर परिणाम होऊ शकतो. चीन सीमा भागात सैन्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे धोकादायक ठरू शकते असे हिंदुस्थानी लष्कराने म्हटले आहे. ‘आसाम रायफल्स’चे इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीसमध्ये विलीनीकरण करून त्याचे नियंत्रण गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत आणण्याचा मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. सध्या आसाम रायफल्सची प्रशासकीय जबाबदारी गृहमंत्रालयाकडे आहे, तर लष्करी कामगिरीकरिता नियंत्रण लष्कराकडे आहे. 1965पासून आसाम रायफल्सवरील नियंत्रण लष्कराच्या अखत्यारीत आहे.

आसाम रायफलने 1947 नंतर विविध मोहिमांमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांना त्याकरिता अनेक शूरता पुरस्कार मिळालेले आहेत. यामध्ये 4 अशोकचक्र, 5 वीरचक्र, 41 कीर्तिचक्र, 144 शौर्यचक्र, 11 परमविशिष्ट सेवा मेडल, 17 अतिविशिष्ट सेवा मेडल, 369 सेना मेडल, 81 विशिष्ट सेवा मेडल, 5 युद्ध सेवा मेडलनी  गौरविण्यात आले आहे. आसाम रायफलचे डायरेक्टर जनरल राजपूत रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल प्रदीप सांगवान आहेत.

याआधी आसाम रायफलचा वापर ईशान्य हिंदुस्थानातील बंडखोरी आणि हिंदुस्थान-म्यानमार सीमा यांच्या रक्षणाकरिता व्हायचा. आता चीनच्या वाढत्या आव्हानामुळे त्यांच्या कामकाजामध्ये फरक केला जात आहे. आता आसाम रायफल बंडखोरविरोधी अभियानातून काढून हिंदुस्थान-चीन सीमेवर ती तैनात केले जाईल. याशिवाय पारंपरिक युद्धात लढण्याकरिता त्यांना मोठी शस्त्र म्हणजे मोटर्स, तोफखाना दिला जाईल. जी मोठी आणि महत्त्वाची अतिरिक्त शस्त्र त्यांना दिली जातील त्यामध्ये ग्रेनेड लॉन्चर, मिसाईल, 105 मिलिमीटर जुन्या तोफा त्यांना दिल्या जातील. त्यांच्या मदतीला रणगाडय़ांची एक ब्रिगेडसुद्धा तैनात केली जात आहे, जिचा वापर सिक्कीम सीमेवरच्या पठारावर केला जाणार आहे. पुढच्या तीन महिन्यांत आसाम रायफलला आसाममधून अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती पाठवण्यात येईल. अर्थातच ते हिंदुस्थानी सैन्याच्या ऑपरेशनल कंट्रोलखाली असतील. म्हणजेच अरुणाचल प्रदेशच्या सीमांवर आता हिंदुस्थानी सैन्य आणि आसाम रायफल दोन्ही मिळून लक्ष ठेवतील. महत्त्वाच्या ठिकाणी हिंदुस्थानी सैन्य तैनात असेल व इतर ठिकाणी  आसाम रायफलला तैनात केले जाइल.

सध्या आसाम रायफलच्या 46 बटालियनपैकी 20 या हिंदुस्थान-म्यानमार सीमेवर तैनात आहेत. जनरल नरवणे यांनी सांगितले आहे की, अजून नऊ बटालियन या सीमेवर येणाऱया काळामध्ये वाढवल्या जातील. बाकीच्या हिंदुस्थान-चीन सीमेवर तैनात होतील. गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदुस्थानी सैन्याच्या 14 बटालियन म्हणजे दोन डिव्हिजन, ज्या बंडखोरांविरुद्ध अभियानाकरिता तैनात केल्या होत्या, त्यांना आता हिंदुस्थान-चीन सीमेकडे नेले जात आहे. कारण हिंदुस्थानी सैन्याच्या आक्रमक कारवाईमुळे बंडखोरांचे आता कंबरडे मोडले आहे. सध्या ईशान्य हिंदुस्थानात या वेगवेगळ्या राज्यांमध्ये खास, तर नागालँड, मणिपूर आणि आसाममध्ये 18 इंडिया रिझल्ट बटालियन उभ्या केल्या जात आहेत. याशिवाय अजून  चार सीआरपीएफच्या चार बटालियन तयार केल्या जात आहेत.

चीन अरुणाचल प्रदेशच्या समोरील भागात आपले रस्ते, रेल्वेलाइन, पाइपलाइन अजून जास्त मजबूत करत आहे. या भागात असलेले रस्ते आता चीन सीमेपर्यंत पोहोचवले जातील. अरुणाचल प्रदेशमध्ये भूरचना अशी आहे की, तिथे वेगवेगळ्या नदीच्या खोऱ्यांमुळे अरुणाचल प्रदेश वेगवेगळ्या भागांत वाटले गेले आहेत. जसे की लोहित नदीचे खोरे, सियांग नदी, सियोम नदी, सुबानसरी नदी, सरली, हुरी नद्या यांच्या खोऱ्यांमध्ये अरुणाचल प्रदेश विभाजित गेलेले आहे. एका खोऱयातून दुसऱया खोऱयात जायचे असेल तर अरुणाचल प्रदेशमधून जाता येत नाही. पहिले त्या खोऱयातून आसाममध्ये यावे लागते आणि आसाममधून सपाटी भागातून दुसऱया खोऱयामध्ये प्रवेश करावा लागतो. आता सगळ्या खोऱ्यांच्या मध्यभागी एक जाणारा रस्ता बांधला जात आहे, ज्यामुळे आसाम रायफल आणि सैन्याची तैनाती जर एका खोऱयातून दुसऱया खोऱयात करायची असेल किंवा लढाईकरिता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची असेल तर ते सोपे पडेल. याशिवाय लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडच्या देशांकडे या धोरणाप्रमाणे म्यानमार, बांगलादेश, थायलंड यामुळे या भागात रस्ते अतिशय चांगले होतील, जे सैन्याच्या हालचालीकरिता उपयुक्त ठरतील.

हिंदुस्थान-म्यानमार सीमा पुरेशी सुरक्षित नाही. कारण या भागात सीमेजवळ राहणाऱया दोन्ही देशांच्या जाती आणि जमातींना दोन्ही देशात जायला परवानगी आहे. याला ‘मुव्हमेंट रिजिम’ असे म्हटले जाते. त्यामुळे हिंदुस्थान-म्यानमार सीमा प्रचंड स्मगलिंग होणारी सीमा बनली आहे. म्हणून या सीमेवरसुद्धा लक्ष ठेवावे लागेल. एकाच वेळेला आपल्याला हिंदुस्थान-म्यानमार आणि हिंदुस्थान- चीन सीमेकडे लक्ष द्यावे लागेल. बंडखोरी थोडय़ा प्रमाणामध्ये मणिपूरमध्ये सुरू आहे, त्यावर लक्ष ठेवावे लागेल आणि चिनी सैन्याचे आव्हान ईशान्य हिंदुस्थानच्या सीमेवर ती येऊ शकते. या सगळ्या आव्हांनाना लगेच उत्तर देण्याकरिता तयार राहावे लागेल. आसाम रायफल हिंदुस्थानी सैन्याच्या मदतीला दिल्यामुळे ही आव्हाने स्वीकारणे जास्त सोपे झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या